सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ व्हॅलेंटाईन डे भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(14 फेब्रुवारी हा प्रेमी जोडप्यांचा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची तिकडे पद्धत आहे…. आता पुढे)
“हा जुन्या काळापासून चालत आलेला सण नां.. एक आपलं सोडा हो, पण आपल्या मुलांकडून हे असलं कधी काही मी कसं ऐकलं नव्हतं?”नानी शंका समाधान करून घेत होत्या.
“काय आहे नानीजी, ग्लोबलायझेशन मुळं सगळं जग हल्ली एक झालंय ना…. शिवाय सगळं डंका पिटत मोठ्या प्रमाणात साजरं करायची पद्धत आलीय त्यामुळे!… आता तर एक दिवसाऐवजी पुरा आठवडा धुमाकूळ चालू असतो…
पुन्हा दोघं गप्प होऊन अंथरुणावर बसून राहिले. त्यांना काहीच सुचत नव्हतं. टीव्ही बघणं तर दूरच…. पण झोपावसं ही वाटत नव्हतं. दहा वाजून गेले होते. तेवढ्यात अमर महाशय धाड्दिशी दरवाजा उघडून घरात दाखल झाले. त्यांनी हातातला मोठा गिफ्ट बॉक्स सोफ्यावर आदळला ….आणि ते बेडरूम मध्ये अंतर्धान पावले.
अन् दोघांचं जोरजोरात भांडण ऐकू येऊ लागलं. कानावर आदळलेल्या तुटक-तुटक शब्दांचा त्यांनी लावलेला अर्थ असा होता… की ठरलेल्या जागी… ठरलेल्या वेळी… अमर पोहोचू शकला नव्हता.एक तर त्याची ही स्वतःची नवी कंपनी होती आणि अचानक कंपनीमध्ये खूप मोठं एक महत्त्वाचं काम आलं. त्यामुळे लवकर त्याची सुटका झाली नाही. आणि कधी नव्हे ते त्याला आपल्या जीवनात पहिल्यांदाच लोकलच्या मरणाच्या गर्दीत उभा राहून प्रवास करावा लागला. त्यातच त्याचा मोबाईल चोरीला गेला. व्यवस्थित संभाषण होऊ शकलं नव्हतं. त्यामुळं दोघांची चुकामूक …मग गैरसमजावर गैरसमज ….शब्दाला शब्द वाढणं ….आरोप-प्रत्यारोप…. नताशाचं रडणं… अमरचं तिरसटणं…सगळं चालू होतं. एका दृष्टीने पाहिले तर दोघांचंही आपापल्या परीने बरोबर होतं. पण हे कबूल कोण करणार?.. समोरच्याला समजून घेण्याचा दृष्टीकोन कोणातच नव्हता. फक्त एकाच वाक्यात दोघांच्या बोलण्यामधे समानता होती. “माझ्यावर तुझं प्रेमच नाहीय.”
मियाॅं बिबीच्या भांडणात पडण्यात काहीच अर्थ नव्हता.
थोड्या वेळानं सगळं शांत… शांत झालं. न खाता-पिता दोघं तशीच रागारागानं झोपली होती.
बारा वाजत आले होते.
‘नानाजी अहो ,पण हा लग्नाआधी प्रेम करणाऱ्यांचा सण नां ‘वगैरे मनात आलेले विचार त्या फुलांकडे पाहता पाहता नानी विसरून गेल्या. टेबलावरून मोठ्या प्रेमानं त्यांनी बुके हातात घेतला. आणि त्या म्हणाल्या,” बघाना ही दोघं यडी पोरं कशी भांडून झोपली… आता काय.. पुन्हा उद्या याहून महाग बुके आणतील.. आणिअधिक किंमती गिफ्टही… पण मला उद्या ही उदास, दुःखी कष्टी मलून झालेली बुकेतली फुलं बघवणार नाहीत. आपण असं करू या का?… बोलता बोलता त्या वळल्या.समोर बघताहेत तर नाना कपाटातून मोठा चॉकलेट बार काढून घेऊन उभे होते. नाना आणि चॉकलेट?.. जगातली ती एकमेवचअशी व्यक्ती असावी जिला चॉकलेट आवडत नाही. आपण दोघं एकच विचार करतोय नां ! नाना हसत म्हणाले,”चलो फिर… मौका भी है और दस्तूर भी”
मग काय पिक्चरचा सीनच साकार झाला. नानांनी मोठ्या आदबीनं गुडघ्यावर बसत नानींना बुके दिला. नानी थँक्यू म्हणाल्या. त्यांनी दिलेल्या चॉकलेटचा एक बाईट घेतला. उरलेलं चॉकलेट नानांच्या तोंडात भरवत त्या म्हणाल्या, “नानाजी हॅपी व्हॅलेंटाइन डे!”पुन्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटल्यामुळे त्या म्हणाल्या,” मी हे बरोबर बोलतेय ना? का मेरी क्रिसमस सारखं मेरी व्हॅलेंटाइन ….आणि त्यांचं कुजबुजून बोलणं चालूच राहीलं……
एरवी इतिहासाच्या पानात लपलेला पण या आठवड्यात बाहेर आलेला तो महान संत ‘श्री व्हॅलेंटाईन बाबा’ जरूर लग्नाच्या पासष्टीत पहिलावहिला व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करणार्या या जोडप्याला ब्लेसिंग देत असेल.
समाप्त
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈