श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ गटुळं – भाग-1 ☆ श्री आनंदहरी 

ग्रामीण एकांकिका :- गटुळं

लेखक :- आनंदहरी

पात्रे –

धुरपदा :-  सासू :- वय साधारण 65 ते70 च्या जवळपास काहीशी थकलेली

यशवदा :-  धुरपदाची समवयस्क शेजारीण

रंगा :-  धुरपदाचा मोठा मुलगा 40 च्या दरम्यान

भामा ;- रंगा ची बायको मोठी सून

यशवंता :- धुरपदा चा धाकटा मुलगा 35 च्या जवळपास

सारजा :-  यशवंतांची बायको..

सागर :-  स्वतःला पुढारी समजणारा गावातील एक रिकामटेकडा

(रंगाचे साधेच घर.. पुढे अंगण.. शेजारी गोठ्याचं छप्पर .. यशवंताचे घर.. रंगा रानात कामे करणारा.. यशवंता छोट्याशा कारखान्यात काम करणारा कामगार.  घरे साधीशीच .. फर्निचर असे फारसं काहीही नाहीच)

प्रवेश पहिला..

(विंगेतून धुरपदाला हाताला धरून ओढतच तिची सून बडबडतच तिला अंगणात  घेऊन येते…)

धुरपदा :-  (गयावया करीत) आगं ssआगं.. असं काय करतीयास गं..?

भामा :- (ठामपणे काहीसे निर्धाराने) आगुदर भायेर हुयाचं.. लय झालं. पार डूईवरनं पानी गेलं…

धुरपदा :-  आगं,  पर झालंय तरी काय ?

भामा :- आदी माज्या घरातनं भायेर हुयाचं.

धुरपदा :- (काहीसे आश्चर्याने,काहीसं चिडून) तुजं घर ? कवापासन घर तुज झालं गं ?     घर काय म्हायेरासनं घिऊन आलीवतीस व्हय गं ? लगी लागली माजं माजं कराय ? आगं , नवऱ्यासंगं रात-दिस राबून काडी काडी गोळा करून बांधलय म्या ती.. आन मलाच भाईर काडतीस व्हय गं ?  म्हणं, माज्या घरातनं भायेर हुयाचं..

भामा :- माज्या म्हायेराचं नाव काढायचं काम न्हाय .. सांगून ठयेवते… ही घर बगूनच माज्या बा नं दिलीया मला… पार फशीवलंसा तुमी, मला नं माज्या बा ला… माजा बा लई भोळा, फसला.. आन तालेवाराची  सोयरीक आल्याली सोडून हितं दिली मला…

धुरपदा :- व्हय गं व्हय… पार पालखीच घ्येवून आला आसंल न्हवं , एकांदा राजा तुज्यासाठनं ..  मग जायाची हुतीस… आमी काय मेणा न्हवता धाडला ? मेल्याली म्हस म्हणं आठ शेर दूध देत हुती ..उगा आपलं कायबी बोलायचं..

भामा :-  म्हस आठ शेरांची असूनदेल न्हायतर धा शेरांची…बास झालं तुमचं..आदी भायेर हुयाचं आन आजाबात घरात याचं न्हाय…न्हाय म्हंजी न्हायच..

धुरपदा :- (ती घरातून बाहेर काढणारच हे जाणवून गयावया करीत) आगं पर मला म्हातारीला कशापाय काडतीयास गं भाईर..? ऱ्हाऊदेल की ग  घरात मला.. म्या म्हातारीनं कुटं जायाचं गं..?

भामा :- त्ये मला कशापायी ईचारतायसा ?  … कुटं बी जावा पर माज्या घरात रहायचं न्हाय… आजपातूर लई झालं.. पर आता म्या कुणाचंच ऐकायची न्हाय..  भाईर म्हंजी भाईंरच..

धुरपदा :- (गयावया करत ) आगं..नगं गं आसं करुस….. ऐक माजं ? आगं, असं किस्तं दिस ऱ्हायल्यात माजं म्हातारीचं ?

(धुरपदाचं काहीही न ऐकून घेता तिला झिडकारून भामा आत जाते.. आतून वाकळ बाहेर टाकते आणि दार बंद करते ..  धुरपदा दुःखी कष्टी होऊन बाहेर तशीच बसली आहे… भामाने तिच्या जवळच वाकळ टाकली तशी ती बसूनच जरा वाकळेकडं सरकली काही क्षण तशीच बसून राहिली)

धुरपदा:- ( काहीसे आठवण होऊन  वाकळ उलटी सुलटी करून शोधत..) माजं गटूळं ss ? माजं गटूळं कुटं गेलं…?

(काहीसं आठवून तिरमिरीत उठते..[ विंगेजवळ जात ] भामाचे दार ठोठावत)

भामे ss ए भामे ss ! माजं गटूळं दे आदी… आदी माजं गटूळं दे.. ( पुन्हा दार ठोठावते ) सांगून ठयेवते …आदी माजं गटूळं दे..

(जरा बाजूला होत बडबडू लागते..)

मला भायेर काडतीया आन माजं गटूळं बी दिना झालीया …

तू ब्येस काडशील गं… पर माझा रंगा आला का पेकटात लाथ घालून तुलाच भायेर काडतुय का न्हाय त्ये बग….

भामा :- (विंगेतूनच – फक्त आवाज) माजं गटूळं ss माजं गटूळं ss ! म्हातारी पार जीव खाया लागलीय गटूळयासाठनं..  गवऱ्या मसनात गेल्या तरीबी गटूळं गटूळं कराय लागल्यात.. येवडं काय अस्तंय त्या गटूळ्यात कुणाला ठावं ?..ही घ्या तुमचं गटूळं..

(दार उघडून भामा गटूळं बाहेर फेकते .. धुरपदा झटकन पुढं होऊन गटूळं घेते)

धुरपदा:- (बंद दाराकडे [विंगेकडे] पहात, हातवारे करीत .. काहीसं स्वतःशीच बोलल्यासारखं पण भामाला उद्देशून)

व्हय बाई व्हय… माज्या गवऱ्या मसनात गेल्याती…समद्यांच्याच कवा ना कवा जात्यातीच… आता तुज्या  नसतील जायाच्या तर ऱ्हाउंदेल बाई.. तू ऱ्हा जित्तीच .. न्हायतरीं गवऱ्या मसनात धाडाय कुणीतरी पायजेलच …

मला घरातनं भायेर काढतीया.. वाईच कड काढ.. माजा रंगा आला म्हंजी कळंल ..कसं भायर काढायचं असतंय ती.. ( स्वगत) तवर आपलं सपरात जावं आन वाकाळ हातरुन पडावं …

 (धुरपदा वाकळ आणि गटूळं घेऊन छपरात/ गोठयात जाते… काहीवेळ अस्वस्थच.. उठून तिथंच  माठावर असणाऱ्या तांब्यातून पाणी पिते . अंगणात येते , बंद दाराकडं आशाळभूतपणे पाहते… चहाची तल्लफ आली असावी असा अविर्भाव ,….अंगणात फिरता फिरता…)

(स्वगत)

कवा दाराम्होरनं जाणारा कुणीबी च्या पेल्याबिगर गेला न्हाई आन आता दोन दोन सुना आसूनबी मला म्हातारीला च्या चा घोट बी मिळंना झालाय…

(आकाशाकडे बघून हात जोडते.. जीवाची घालमेल होतेय..हळू हळू चालत छपराकडे जात असतानाच प्रकाश कमी होत अंधार होतो)

अंधार

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments