श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ गटुळं – भाग-1 ☆ श्री आनंदहरी 

ग्रामीण एकांकिका :-   गटुळं

(रंगाचे घर.. सोपा .. नेपथ्य पहिल्या प्रवेशा सारखे..)

भामा :- (आतूरतेनं रंगाची वाट पाहत.. सोप्यात फेऱ्या घालतेय .. मधूनच दारातून बाहेर पाहते.)

अजून कसं आलं न्हायती ? आज  याला लईच वखुत झालाय ह्यास्नी…

( दारातून रंगा येताना दिसतो.  भामा खुश होते .. रंगा आत येताच ती दार लावते..)

आज लईच येळ काम करीत हुतासा वी..

का वाटत कुनी गाठ पडलंवतं ?

रंगा :- तसं कायच न्हाय.. पर आसं का वाटतंया तुला ?

भामा :-  तुमास्नी याला लईच येळ झाला न्हवका …

रंगा :-   ( आश्चर्याने ,तिच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत )

आग..रोजच्याच येळंला तर आलूय न्हवका..

भामा :-  बरं ती जाऊदेल.. म्या काय म्हनते.. अवो, आज म्हातारीकडं शंभर रूपै बघितलं म्या.. आन त्या गटूळ्यात  का न्हाय सोन्याचा डाग बी हाय..

रंगा :- भामे, काय सांगतीयास काय ? सपान बिपान तर बघितलं न्हाईस न्हवंका ?

भामा :- तुमी कवा इसवासच ठयेवत न्हाईसा माज्याव.. अवो, म्या ह्या डोळ्यानं बगीतलंया .. म्हातारीनं गटूळयातनं पैका काडताना. अवो, तवा धाकली नव्हती ततं.. ही लई ब्येस झालं बगा .. न्हायतर म्हातारीला लगीच घरला न्हेलं असतं तिनं… अवो, पैशाला लै हावरी हाय ती… ह्ये बगा ..

रंगा :- (हसत ) व्हय ! कवाधरनं तुज्याकडंच  बगतुय..

भामा :- (रंगाचं वाक्य न ऐकल्यासारखं दाखवत  )   म्या काय म्हनते.. लगुलग म्हातारीला घिऊन या जावा..

रंगा :- आगं, तशी न्हाय याची ती… आन तसंबी तू भायेर काडल्याधरनं गेलो न्हाय न्हवं तिच्याकडं..… आता कंच्या तोंडांनं जायाचं गं तिच्या म्होरं  ?

भामा :- (काही क्षण विचार करून ) आसं करा…तुमी भांडान काडा माझ्यासंगं.. म्हातारीला भायेर काडली म्हणूनश्यान..

रंगा :- ( स्वगत ) सपनातबी जमायचं न्हाय ती कराय घावतंय.. व्वा ! रंगरावss तुमी लईच नशीबवान हायसा.. रंगराव, हून जाउंदेल दणक्यात..आन आय बी घरात ईल ती येगळंच .. ( भामाकडे पहात ) भांडान आन तुज्यासंगती.. छया ss छया ss! आगं, मला  जमतंय वी ती ?.

भामा :- ( काहीसं लाडिक आवाजात ) अवो, म्याच सांगतीया न्हवं .. माजं येवडंबी ऐकणार न्हायसा व्हय ? भांडान मातूर खरं वाटाय पायजेल बरं का … ध्येनात ठेवा.

रंगा :- ( स्वगत ) रंगराव, कवा न्हाय त्यो चॅनस घावलाय.. घ्या हात धून.. ( भामाला ) भामे, तुजंच खरं हाय बग… समदं कसं खरं वाटाय पायजेल..तूच म्हंतीयास म्हनुन.. आन तूज्या शब्दाभाईर हाय व्हय म्या…( जरा मागे सरून एक जोराची थप्पड लगावतो )

भामा  :- (ओरडते.. ) आय आय गं..

(हळू आवाजात ) अवो, केवडया जोरानं मारलंसा..

रंगा :- लागलं न्हाय न्हवं तुला लई.. आगं, तूच म्हनलीस न्हवं खरं वाटाय पायजेल… म्हणूनश्यान..

भामा :-  ( उगाचच मोठ्याने ) आय गं.. मेले मेले.. सोडा हो..

रंगा :- ( अंगावर धावून जात ) माज्या आयला घराभाईर काडतीस ? ही घर काय तुज्या बा चं हाय व्हय गं ? आँ ss ? माज्या .. माज्या आयला घरातनं भाईर काडतीस ?

भामा :- आय आय गं..मारू नगा मला.. चुकलं माजं..  पुन्यांदा न्हाय तशी करायची ? चुकलं हो .. मारू नगा..आय  आय गंss !..   तुमच्या पाया पडत्ये.. पर मारू नगासा..

रंगा :- पुन्यांदा ? पुन्यांदा आसं वागाय तुला घरात ठेवतुय वी…चल हो घराच्या भायर.. नांदवीतच न्हाय आता तुला म्या.. चल हो भाईर घरातनं..

भामा :- न्हाय वो..चुकी झाली.. मला नगा वं भायेर काडुसा..  पाया पडत्ये मी..

रंगा :-  काय नगं पाया पडाय… तुला का मी वळखत न्हाय वी.. चल उठ, आन वाट धर म्हायेराची..

(यशवंता आणि सारजा त्यांचं भांडण ऐकून दबकत दबकत येतात त्यांना पाहून रंगा अधिकच जोरात…)

उटायचं आन आगुदर भायेर हुयाचं..

(भामाच्या हाताला धरून बाहेर काढत असल्याच्या अविर्भावात ओढत )

माज्या आयला घराभाईर काडतीस व्हय ?

भामा :- ( बाहेर काढण्यास विरोध करीत.. हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत.. गयावया करीत )  चुकलं माजं.. येकडाव माफ करा.. पुन्यांदा न्हाई असं करायची म्या..!

यशवंता :- ( दबकत ) दादा, नवरा-बायकूच्या भांडणात बोलायचं नसतं म्हंत्यात… पर काय  झालं रं येवडं भांडाय..?

रंगा :- (खूप चिडलेला आहे ) ( भामाला ) तू आगुदर भायेर हुयाचं..

ऐकतुय म्हणल्याव पार डोसक्याव बसाय लागलीस म्हन की ..  आयला घरभाईर काडतीस व्हय..  थांब वाईच ..आतलं टिकारनं आनतो आन डोसकंच फोडतो तूजं…( आत जायला वळतो )

यशवंता :- (घाबरलेला आहे) ( झटकन पुढं होऊन आत निघालेल्या रंगाला कवळा घालुन थांबवत ) दादा, लईच चिडलायस तू… थांब वाईच .. उगा हातनं कायबाय वंगाळ हुया नगं… सारजे,  वैनीला आत न्हे जा.. आन च्या बी टाक वाईच.

(सारजा भामाला आत न्हेते.. भामा भीतीने थरथरत /  रडत असते )

दादा, शांत हो.. बस खाली…. सारजे वाईच पानी आन.. .( सारजा पाणी आणते ..यशवंता रंगाच्या हातात तांब्या देतो ) दादा पानी घे.. आन शांत हो..

(रंगा पाणी पितो तोवर सारजा चहा देऊन आत जाते.. रंगा.. यशवंता दोघेही चहा पितात..)

दादा , लय राग बरा न्हवं..

रंगा :- (रागातच ) मंग.. आरं , तिनं आयला घराभाईर काढलंय आन म्या गप बगीत बसू व्हय रं..?

यशवंता :- समदं खरं हाय दादा, पर चिडू नगं..

रंगा :-  (शांत आवाजात )  हं !

यशवंता :-  सारजे, वैनी च्या पिली का ? च्या पिऊन झाला आसंल तर चल घरला.. दादा, शांत हो..

सारजा :- ( आतून येत ) चला

यशवंता :- दादा, वैनीला काय बोलू नगं हां.. आमी जातो.. लय कामं पडल्याली हायती..

(यशवंता आणि सारजा गेल्याची खात्री होताच भामा आतून बाहेर आली.. पार दारापर्यंत जाऊन तिने पाहिलं..)

भामा :- ( रंगाकडे पाहून हसत ) गेली बगा धाकली.. खुशीत गेली.. सासूला सांबळाय लागायचं न्हाय न्हवं .. पर तुमी मातूर ? म्या लईच भ्याले हुते.. खरुखरंच टिकारनन्यानं हानताय का काय असंच वाटाय लागलवंत.. आन व्हय वो.. किस्तं जोरात मारलंसा ?

रंगा :- (स्वगत ) सासुसंगं आस वागतीयास .. तुला त्येचं पायजेल ..पर.. ( भामा कडे  पहात ) आगं, तूच तर सांगितलंस न्हवका.. भांडान खरं वाटाय पायजेल… सारजी लय बेरकी हाय… तिला बी खरं वाटाय नगं ?  लय लागलं न्हाय न्हवका तुला ? भामे,  झालं न्हवका तुज्या मनाजोगतं..

भामा :- ( गाल चोळत ) व्हय.. आता तुमी जावा आन आत्तीस्नी म्होरं घालून घिऊन या जावा.

रंगा :- ( स्वगत ) कंच्या बी काटीनं का आसंना इच्चू मेला ही बरं झालं … (भामाला ) व्हय.. जातो..

(भामा आत जाऊ लागते.. रंगा बाहेर जाऊ लागतो.. हळूहळू प्रकाश कमी होऊ लागतो )

अंधार

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments