श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ गटुळं – भाग-6 ☆ श्री आनंदहरी 

ग्रामीण एकांकिका :-   गटुळं

(धुरपदा अंगणात कडेलाच थाटीत तांदूळ निवडत बसलेली असते .. रंगा अंगणात येतो…तिच्याजवळ जाऊन बसतो.. )

रंगा :- आयेss काय करतीयास गं ? “

धुरपदा :- काय न्हाय रं .बस वाईच..चुलीवं भात ठेवायचा हाय.. तांदूळ निवडाय घेतल्यात….   खातूस का वाईच गरम गरम ?

(रंगा काहीच बोलत नाही . गप्प राहून जमिनीकडं बघत बसतो.)

धुरपदा :-  ( मायेने, काळजीने ) रंगा, लेकरा,  गपगुमान का रं बसलायस ? काय हूतंय काय तुला ? “

रंगा  :- काय न्हाय ग आये , काय हुतंय मला..? ती  तांदळाचं ऱ्हाऊंदेल…. चल आदी घरात ..

धुरपदा :-     आरं , माजी लाकडं ग्येलीती म्होरं मसनात, आता घरात काय आन दारात काय ?..येकच की रं “

रंगा :-   आये, उगा कायबाय कशापाय बोलाय लागलीयास  गं ? चल, घरात चल..

धुरपदा :-  लेकरा,  माजं काय रं , तूमी ठयेवशीला ततं आन तसं ऱ्हायाचं… पर बायकूला ईचारलंस का आगुदर ?

रंगा :-   तिला काय ईचारायचं हाय ? घर काय तिच्या बा चं हाय वी ? तू चल …

धुरपदा :-  तसं नगं ल्येकरा , जा. तिला ईचारून ये…   उगा माज्यासाठनं तुमा नवराबायकूत भांडान नगं बाबा.”

रंगा :- ( तिथूनच काहीसं रागाने… अधिकारवाणीने ) भामे ss ए भामेss ! भायेर ये आगुदर .. ( भामा अपराध्यासारखी खाली मान घालून बाहेर येते ) आय ला घरात घिऊन जा..

भामा :- आत्ती, चुकलं माजं.. चला ..घरात चला…

धुरपदा :- ( रंगाला ) आरं, माजं काय हाय रं ?  तुमी म्हंशीला तसं… चल रं लेकरा..ती वाकाळ घे ..( रंगा वाकळ घेऊन भामाकडे देतो..)

रंगा :- आये, ती गटूळं दे की माज्याकडं..

धुरपदा :-  असू दे बाबा.. आगुदरच माजं वजं तुमच्याव हाय .. त्यात आनी गटूळयाचं वजं कशापायी रं ? … ऱ्हाऊंदेल घेत्ये म्याच..

 (पुढं भामा, मागून रंगाचा हात धरून  गटूळं घेतलेली धुरपदा असे आत जात असताना प्रकाश कमी होत होत अंधार होतो )

अंधार

क्रमशः…

© श्री आनंदहरी

अद्वैत, मंत्रीनगर, इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099/9422373433

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments