श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
दुसर्याल दिवशी रवी सकाळी लवकर उठून तयार होऊन बसला. नेहमीप्रमाणे सगळे आपापल्या कामाला बाहेर पडले तसे त्याने रामूकाकांना काहीतरी आणायला बाहेर पाठविले आणि ती कचरेवाली यायची वाट बघत बसला. ठराविक वेळेला घरच्या बेलचा आवाज आला. त्याने लगेच दरवाजा उघडला. तीच होती. तिचे निखळ सौंदर्य कालच्यापेक्षा आज जास्तच उठून दिसत होते. पिवळा पंजाबी ड्रेस आणि त्याच कलरची ओढणी तिने तिच्या डोक्यावरून घेतला होता. कपाळावर बारीक पिवळ्या रंगाची टिकली लावल्यामुळे शालीनता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. कालच्यासारखेच तिने, ” साहेब कचरा” असे म्हंटले. रवीने कचरा आणून दिला आणि तिला विचारले, ” जरा तुझ्याशी बोलायचे होते. तुझे नाव काय आहे?” रवीने बोलायला सुरवात केली.
तिने एकच क्षण रवीकडे बघितले आणि गालातल्या गालात हसत म्हणाली, ” साहेब मला बोलायला वेळ नाही. साडे दहा वाजेपर्यंत मला सगळ्यांचा कचरा जमा करायचा असतो. ती कचऱ्याची मोठी गाडी एकदा येऊन गेली तर माझी पंचाईत होईल.” रवी थोडा हिरमुसला पण लगेच त्याने तिला सांगितले, ” तू मोकळी झाली की येशील का ? तुझ्याविषयी मला खूप जाणून घ्यायचे आहे. तुझ्या बद्दलचे खूप प्रश्न माझ्या मनात आहेत. तू तुझी सगळी कामे आटपून येऊ शकशील का ? ” भराभर बोलत रवीने तिला सांगितले तिनेही लगेच उत्तर दिले, ” आज तरी नाही जमणार साहेब. नंतर मला कॉलेजला जायचे आहे. रविवारी वेळ काढता येईल. तेंव्हा बघू. ” आणि ती तिचे नावही न सांगता तशीच गेली.
रामूकाका बाहेरून आल्यानंतर रवीने त्यांच्याकडे कचरेवाल्याचा विषय काढला. तो कुठे राहतो, त्याच्याघरी कोण कोण आहेत ह्याची माहिती काढण्याचा रवीने प्रयत्न केला पण रामूकाकानाही कचरेवाल्याबद्दल काहीच माहित नव्हते. तो रोज सकाळी येतो आणि काही न बोलता दिलेला कचरा त्याच्या डब्यातून घेऊन जातो. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीनशे रुपये घेऊन जातो. कधीही खाडा करत नाही. एवढीच माहिती रवीला मिळाली.
दुसऱ्या दिवशी ती कचरा न्यायला आल्यावर रवीने तिला सांगितले, “आज तुझे कचरा गोळा करण्याचे काम झाल्यानंतर कॉलेजला जाताना मी तुझ्याबरोबर येऊ का ? तू कॉलेजला जातांना आपल्याला बोलता येईल.” तिने आज गालातल्या गालात हसत उत्तर न देता जरा खडसावूनच विचारले,” साहेब, एवढे काय काम काढलेत. अहो मी साधी कचरेवाली आहे. कचरेवाल्याची मुलगी. माझ्याकडे कसले तुमचं काम. साहेब आम्ही लहान जातीतले असलो तरी आम्हालाही इज्जत आहे. तुमच्या बरोबर मला कोणी बघितले तर लोक काहीतरी वेगळेच समजतील. तुमच्याही सोसायटी आणि समाजात तुमची नालस्ती होईल. तुम्हांला खरेच काही बोलायचं असेल तर दुपारी २ वाजता कॉलेज सुटल्यावर मी येथेच येते पण ते तुमच्याकडे काका आहेत त्यांना घरीच असू दे. मग आपण सविस्तर बोलू.”
क्रमश:….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈