श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
दुपारी २.३० वाजता दारावरची बेल वाजली. रामूकाकानी दरवाजा उघडला. रवीने तिला आत बोलाविले. सोफ्यावर बसवले. रामूकाकानी पाण्याचा ग्लास भरून आणून तिच्या हातात न देता पुढे असलेल्या टेबलावर ठेवला. रवीच्या निदर्शनात ते आले तसे रवीने पुढे होऊन तो पाण्याचा ग्लास पुन्हा उचलला आणि तिच्या हातात दिला. तिच्या चेहऱ्यावर जराशी स्मितरेषा झळकली. तिच्या समोरच्या सोफ्यावर रवी बसला. ती आजूबाजूला बघून घर निरखत होती.
“बोला साहेब काय विचारायचे आहे ? ” तिनेच बोलायला सुरवात केली. रवीने तिला पहिले तिचे नाव विचारले. ती काही न बोलता काही वेळ रवीकडे बघत राहिली.
रवीने परत विचारले, ” काय झाले ? ” तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिने एक आवंढा गिळून बोलायला सुरवात केली. ” साहेब मी आता काहीच दिवस माझे वडील आजारी आहेत म्हणून कचरा न्यायला येते पण माझे वडील गेले पंचवीस वर्षे ह्या भागातला कचरा गोळा करतात पण त्यांनाही आज पर्यंत कोणी त्यांचे नाव विचारले नाही. आम्हा लोकांना जे कचरा गोळा करतात त्यांना कचरेवाला किंवा कचरेवाली हीच नाव असतात. कितीही पाऊस असला किंवा आणखी काही असले तरी आम्ही काम करतोच. आम्हाला सुटी नाहीच. कुठलाही सण असला तरी तो घरी साजरा करायच्या आधी आम्ही दुसऱ्यांच्या घरचा कचरा गोळा करत असतो॰ तरीही कोणीही आम्हांला नावाने ओळखत नाहीत. तुम्ही पहिले आहात, माझे काम माहिती असूनही माझे नाव विचारले. तर माझे नाव चिन्नू मुन्ना वाल्मिकी. आमची पूर्ण जमात ह्याच कामामध्ये आहे. आमच्या आधीच्या पिढ्यांनीही हेच काम केले आहे. कोणीतरी हे काम केलेच पाहिजे ते काम आमची जमात करत असते आणि ते ही अविरत पिढ्यान पिढ्या.” रवीला तिच्या बोलण्यातले तथ्य जानावाले.
पुढचा अर्धा तास रवी आणि तिचे बोलणे चालले होते. तिच्या बोलण्यातून तिचा स्वतः वरचा आत्मविश्वास दिसत होता. लहानपणापासून रात्री झोपतांना मोकळे आकाश बघत आलेल्या चिन्नूला आकाशाचे विलक्षण आकर्षण होते आणि त्यामुळेच कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चिन्नूला अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. पुढच्या वर्षीपासून तिला कचरा व्यवस्थापन डिप्लोमा कोर्स ही चालू करायचा आहे. रवी तर सगळे चिन्नूचे विचार आणि तिची बोलायची पद्धत ऐकून खुश झाला होता. त्याने रामुकाकांना सांगून चिन्नूसाठी जेवायला वाढायला सांगितले पण चिन्नूने त्याला नकार देऊन म्हंटले, ” साहेब नका वागू असे. नंतर तुमच्या घरच्यांना कळले की एक कचरेवाली तुमच्या घरात येऊन जेऊन गेली तर खूप अनर्थ होईल. माझ्या वडिलांचे नुसते तुमच्या घरचे नाही तर तुमच्या संपूर्ण सोसायटीचे काम जाईल. तेंव्हा प्लिज असे काही करू नका. आम्ही तुमच्या सगळ्यांपासून खूप लांब आहोत ते बरे आहोत. कृपया आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका. मला आणि तुम्हांला, आपल्या दोघांनाही त्याचा खूप त्रास होईल.”
चिन्नू जे सांगत होती ते बरोबर होते. रवीच्या मगाशीच निदर्शनात आले होते की चिन्नूला घरात घेतली तेंव्हा रामूकाकांना ते आवडले नव्हते. रवीने काहीतरी वेगळे केले अशा नजरेने त्यांनी बघितले होते. रवीने पुढची काही मिनिट्स तिला स्वतःची ओळख करून देऊन त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितले आणि तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला स्वतःचा मोबाइल नंबर दिला.
पुढे एक आठवडा त्यांचे दिवसातून चार ते पाच वेळेला फोनवरून बोलणे होत होते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती रवीला आवडायला लागली होती. तिच्या ध्येयपूर्ती करण्यासाठी चाललेल्या वाटचालीत रवीला तिला मदत कराविशी वाटत होती आणि खूप विचारांती एकदा रवीने तिला भेटून एका कॉफी रेस्टारंट मध्ये कॉफी प्यायला नेले. प्रथम कॉफीला नकार देणारी चिन्नू रवीच्या अती आग्रहामुळे तयार झाली. हॉटेल मध्ये बसल्यावर चिन्नूनेच सुरवात केली, “साहेब, काय झाले, माझ्या प्रेमात वगैरे पडला नाहीत ना! तसे असेल तर स्वतःला सावरा.” तिच्या ह्या बोलण्याने रवीने डायरेक्ट विषयाला हात घातला, ” चिन्नू, खूप विचार करून मी तुला विचारतोय, तुला प्रपोज करतोय, मला तू पहिल्यावेळी बघितल्या क्षणीच आवडली होतीस आणि गेले काही दिवस तुझ्याशी बोलून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझ्याशी लग्न करशील का ? “
रवीचे बोलणे ऐकून चिन्नू जरा जास्तच सिरिअस झाली. एकटक रवीकडे बघून तिने संथ लयीत बोलायला सुरवात केली, “साहेब जरा स्वतःला सावरा. तुम्ही नुकतेच अमेरिकेत शिकून आला आहात. तुमच्या समोर तुमचा तयार फॅमिली बिझनेस आहे. तुमच्या घरचे तुमची तुम्ही त्यांच्या बिझनेसला सामील होण्याची वाट बघत आहेत आणि तुम्हाला हे विपरीत काय सुचतंय. साहेब आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही जिला आत्ता प्रपोज करत आहात, तीची ओळख सगळ्यांसाठी कचरेवाल्याची मुलगी अशी आहे. त्यामुळे उगाच नको त्या भानगडीत पडू नका. चक्रव्यूह भेदायला शिरायच्या आधीच जरा स्वतःला आवरा. स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नका. मी काही तुमच्या प्रेमाचा स्विकार करू शकत नाही.
क्रमश:….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈