श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 4 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

‘मी गेले तीन वर्षे कॉलेजला जात आहे पण माझा एकही मित्र काय एकही मैत्रीण सुद्धा नाही. ‘ चिन्नू सांगत होती. जर मी कोणाशी मैत्री केली असती, तर काही दिवसांनी त्यांना माझी खरी ओळख ‘कचरेवाल्याची मुलगी’ ही  कळली असती. त्या ओळखीची मला लाज वाटत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला नावे असतात आणि आम्हीही माणूस म्हणूनच जन्माला आलो आहोत याचा लोकांना विसर पडलेला असतो. आज मी कितीही चांगले मार्क्स मिळवून कॉलेजमधून पहिली आलेव, तर उद्या न्यूज पेपरला हेडिंग येणार ‘एका कचरेवाल्याची मुलगी पहिली आली’. आमची ओळख तेवढयापुरतीच सिमीत रहाते. पुढे मी तुमचा स्विकार केला काय किंवा दुसऱ्याशी लग्न केले काय तरी सगळ्यांसाठी, तुमच्या घरच्यांसाठी माझी ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी म्हणूनच राहणार आणि म्हणूनच मला खूप शिकून अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. मलाच माझे नाव मोठे करून माझ्या खऱ्या नावाने जगायचे आहे.” चुन्नीने मनापासून तिच्या मनातली सल रवीला बोलून दाखवली.

चुन्नीने रवीच्या प्रेमाचा स्वीकार नाही केला तरी रवीच्या  डोक्यातून काही चुन्नी जात नव्हती. तिच्या विचाराने रवी अधीकच प्रभावित झाला होता. त्याला ह्यातून काहीतरी मार्ग काढावासा वाटत होता. दोन दिवस सतत त्याच्या डोक्यात चुन्नीचाच विचार चालू होता आणि त्याने एक वेगळाच मार्ग निवडला.

चुन्नीच्या नकाराने अस्वस्थ झालेल्या रवीने दुसऱ्याच दिवशी आपल्या आईवडिलांना सांगितले, मला काही येथे रहायला आवडत नाही. माझे सगळे मित्र मैत्रिणी अमेरिकेत आहेत तर मी परत अमेरिकेत जातो आणि आपले अमेरीकेतील ऑफिस सांभाळून मी आपल्या निर्यात वाढीवर जोर देईन. रवीच्या ह्या निर्णयाचे त्याच्या घरून स्वागतच झाले. पुढच्या आठवड्यात रवी परत अमेरिकेत परतला. अमेरिकेत स्वतःचे बस्तान  बसविल्यानंतर त्याच्या डोक्यात चुन्नीचे विचार चालू झाले. तसे दोन एक दिवसातून तिच्याशी चाट करणे त्याचे चालूच होते आणि त्यातूनच त्याने चुन्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचे सूचित केले. चुन्नीला तिच्या शिक्षणासाठी अमेरिकेचा विचार करणे म्हणजे जरा जोकच वाटला पण रवीने तिला मार्गदर्शन करून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करायला लावले. रवीही  तिकडून तिला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची माहिती पुरवीत होता. दोघांच्या प्रयत्नाला यश येऊन थोड्याच दिवसात चुन्नीला तिच्या पुढील शिक्षणासाठी चांगल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली. तिला तिथे स्कॉलरशिप मिळेल ह्याची रवीने सोय केली. आता प्रश्न होता विमानभाड्याचा. तेवढे पैसे काही चुन्नीकडे नव्हते. त्यासाठीही रवीनेच तोडगा काढला. स्वतःच्याच अमेरिकेतल्या कंपनीत तिला अर्धवेळ काम देऊन तिचा व्हिसा आणि तिकीट पाठविले. रवीने चुन्नीच्या मनातील अवकाश शास्त्रज्ञ होण्यासाठीचा मार्ग सुकर केला होता.

आता त्याला खात्री होती अमेरिकेत चुन्नीला कचरेवाल्याची मुलगी असे न ओळखता सगळे चुन्नी या नावानेच ओळखतील आणि ती शास्त्रज्ञ झाल्यावर जर तिला वाटले तर रवीशी नाहीतर कोणाशीही लग्न करून भारतात जाईल तेंव्हा चुन्नीची ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी अशी न रहाता शास्त्रज्ञ चुन्नी अशी असेल आणि मुन्ना वाल्मिकी ह्या कचरेवाल्याची ओळख एका शास्त्रज्ञ मुलीचा बाप अशी होईल. 

खरचं मनात असले तर कुठच्याही कठीण प्रसंगात, आहे त्या परिस्थितीत मार्ग  काढता येतो…..फक्त नीट विचार करून समोर आलेल्या प्रश्नाला संयम ठेऊन सामोरे जायला लागते….. अगदी आपल्या रवी सारखे.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments