सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ कोनाडा… भाग 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
पण ती जगतच राहिली. प्रत्येकवेळी तिच्या जगण्याला कारणच मिळायचं जणु.
आजारपणात ती देवाला विनवायची,
“बाबारे! या निशाचं एव्हढं बाळंतपण होऊ दे!पहिल्या खेपेस तिचं आॅपरेशन झालं.. आतां काय होतंय् कोण जाणे! सारं सुखरुप होऊदे रे बाबा! तिला धडधाकट पाहू दे मग ने मला…
पपांना पहिला हार्ट अॅटॅक आला तेव्हांही ती अशीच आजारी होती..गादीत पडल्या पडल्याच पुटपुटायची,
” माझा जना असा गादीवर..माझं काही झालं तर हा उठेल..खांदा देईल..मग नंतर याला काही झालं तर..?नको आधी माझ्या जनाला बरं कर..मग मला ने.
जीजीच्या आयुष्याची दोरी अशी वाढतच गेली.ती इतकी लांबली की तिच्या आयुष्यातली एक शोकांतिका टळली नाही.
पपा गेले.ती राह्यली.
देवळातला घंटानाद,आणि तळ्यातल्या कमळांना साक्षी ठेवून तिनं तिच्या बाळाला वाढवायचं व्रत घेतलं होतं .ते व्रत तिने आयुष्यभर पाळलं.
ती आम्हाला अनेक गोष्टी वारंवार सांगायची..त्यातलीच एक गोष्ट ही होती.
“जना लहान असताना त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं.आपली आई सोडून गेली.
मग तो स्वप्नातून जागा व्हायचा.माझ्या कुशीत शिरायचा. म्हणायचा,”आई तू मला सोडून कधीही जाऊ नकोस. “मग ती म्हणायची”नाही रे बाबा!मी तुला अगदी जन्मभर पुरेन! घाबरू नकोस.”
जणु जीजीचे शब्द खरे ठरले की पपांना दिलेलं वचन तिने पाळलं.?
पण आमचे पपा गेले आणि आम्ही दु:खात बुडालो.पपा आमचे सर्वकाही होते.वडील. मार्गदर्शक. मित्र.
आम्हां सगळ्यांना शोकाकुल बघून ती कळवळली.तिनं आम्हां सार्यांना जवळ घेतलं.
“बाबांनो! वडीलांच्या मृत्युचे दु:ख नका करु. पिकलं पान गळणार. मुलांच्या आधी बापानं जावं… हाच जगाचा नियम. माझा बाबा गेला. मी मागे उरले. उलट झालं. माझ्या मरणाचं दु:ख बाबाला सहन झालं असतं का.. माझ्यात दु:ख सोसण्याची ताकद आहे.. त्याला नसतं सोसलं… म्हणून मी राहिले..”
९७वर्षाची होती ती! पण हिंडती फिरती होती.. मी माहेरी येणार असले की तिची फार धावपळ असायची.. माझ्यासाठी माझ्या आवडीचे खाद्यपदार्थ करण्याचा तिचा केव्हढा आटापिटा असायचा..
पहाटे दारात रिक्षा थांबली तर लगबगीने दार उघडायला तीच यायची.. दारातच विळखा घालायची.. पापे घ्यायची.. इतकी कृश झाली होती.. नजरही अंधुकली होती.
पण आम्हाला ती डोळ्यांच्या पलीकडे बघू शकत होती…
जातांना निरोप घेताना तिला म्हणावं,
“येते हं जीजी..”
“नीट जा हं!परत कधी येशील..?”
मनात यायचं परत येईन तेव्हां ही असेल का?
ती म्हणायची, “आता देवानं मला न्यावं ग!! कधी मरेन मी?”
तिचा हा प्रश्न किती केवीलवाणा असायचा..
ती गेली…
त्यादिवशी मला दार उघडायला ती नव्हती.
दाराला लटकलेलं तिच्या अस्थींचं गाठोडं पाहिलं अन् प्रवासात धरुन ठेवलेला बांध तुटला…
जाणवलं..
आयुष्यातला एक निस्सीम प्रेमाचा कोनाडा रिकामा झाला…
समाप्त..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈