श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ नाट्यछटा ☆ श्री आनंदहरी ☆

” आलिया भोगासी असावे सादर !….”

(रेडिओवर गाणे लागले आहे, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई…गाणे बंद करते )

अगदी खरं आहे बाई तुझे.. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई.. अगदी असंच वाटतं बघ..

काय म्हणालात ‘ असं का गं ?’ काय सांगायचं तुम्हांला ? अहो, आमच्या ह्यांशी संसार करणे म्हणजे सोपी का गोष्ट आहे..

“अहो,  एक काम धड करतील तर शपथ..साधे कपडे धुवायला टाकताना कपडे सरळ सुद्धा करणार नाहीत.. जीव अगदी मेटाकुटीला येतो हो !…हा संसाराचा गाडा ओढायचा ओढायचा म्हणजे किती ओढायचा एकटीने.. (कपडे उचलण्याचा,सरळ करण्याचा अभिनय )

दोन दिवस वाण सामान आणण्यासाठी यांच्या कानी-कपाळी ओरडतेय.. पण ऐकू जाईल तर शप्पत ! आले आपले हात हालवत.. विचारलं तर म्हणतात कसं ?. अगं ऑफिसमध्ये काम जास्त होतं .. गडबडीत विसरलो… बरं झालं बाई, आज ऑफिसला जातानाच वाणसामानासाठी हातात पिशव्या दिल्या यांच्या ते… पिशव्या पाहून तरी आठवणीनं आणतील सामान..

अहो, वाणसामानाचं दुकान का जवळ आहे ? आणि घरातलं सारं आवरून परत इतक्या लांब जायचं म्हणजे खूप वेळ जातो हो.. दुपारची झोप सुद्धा मिळत नाही.. तशी मी दुपारी झोपत नाहीच म्हणा.. ? अहो ,वेळच कुठं मिळतो ? सारं आवरेपर्यंत बारा तरी वाजतातच.. ती ही धुण्याभांड्याची सखू वेळेवर आली तरच हं … पण स्वैपाकाच्या काकू  मात्र अगदी वक्तशीर हो .. सकाळी सात म्हणजे सात.. अगदी घड्याळ लावून घ्यावं त्या आल्या की.. काय करणार हो ? एवढ्या सकाळी स्वैपाक आवरवाच लागतो.. ऑफिसला जाताना यांना डबा द्यायचा असतो ना ..  हे अगदी नऊच्या ठोक्याला जातात ऑफिसला..  ते ऑफिसला गेले की सखूची वाट बघत बसायचं.. नुसता वैताग येतो हो.. बाईसाहेब कधी दहाला उगवणार तर कधी अकराला.. वेळेचं काही भानच नाही तिला ..वर तिला काही बोलायची पंचाईत..  म्हणतात ना ‘फट म्हणता ब्रह्महत्या..’ तशातली गत व्हायची.  अहो, काम सोडून गेली तर दुसरी कुठून बघू..? मोकळा वेळ असा मिळतोच कितीसा मला ?  त्यात पुन्हा दुसरी कामवाली शोधत बसायचं म्हणजे.. ? माझा काही जीव आहे की नाही.. सखू आली की झाडलोट करणार, मग कपडे धुणार.. भांडी घासून झाली की निघाल्या राणीसाहेब तरातरा.. एखादं जादाचं काम सांगावं तर म्हणते कशी..

‘ केलं असतं हो पण वाडकरांकडे उशीर होतो कामाला.. आणि वाडकर वहिनी किती कजाग आहेत ते तुम्हांला माहितीच आहे..

जरा उशीर झाला की लगेच बडबडायला सुरवात करतात … ‘

सगळे खोटे..  मी काही वाडकर वहिनींना ओळखत नाही होय ? हीच मेली कामचुकार.. हिलाच काम करायचं नसतं ..मला काही कळत नाही होय..? पण बोलणार कसं ? 

सखू गेली की जरा आडवं व्हावं म्हणून आडवे व्हायला जावं तर.. डोळे मिटतायत, न मिटतायत तोवर घड्याळात चार वाजतात.

तुम्हाला सांगते, ही घड्याळे पण एवढी आगाऊ असतात.. आपण जरा विसावा घ्यावा म्हणलं की पळतात पुढं पुढं.. अगदी वाघ मागे लागल्यासारखी ! स्त्री द्वेष्टी मेली. जाऊद्या.. आता उठलं तर पाहिजेच.

पण आता काय करावं बरं ? हं ! रंजनाला कॉल च करते , रंजना म्हणजे माझी मैत्रीण हो ! 

(मोबाईल वर कॉल लावते)

अं ss उचलत कसा नाही.. झोपली असेल .  दुसरे काय ? पुन्हा लावून बघते ? (परत कॉल लावते )

“हॅलो ss!”

काय म्हणालीस , कामात आहेस? नंतर करतेस?

कामात आहे म्हणून कट केला हो तिने ..

अहो, कामात कसली ? घरात इकडची काडी तिकडे करत नाही.  धुणे भांडी, स्वैपाक , झाडलोट सगळ्याला बायका आहेत कामाला , उरले सुरले सासूबाई करतात अजून… नटमोगरी मेली.. परवा परेरांची लेक गेली कुणाचा तरी हात धरून पळून … तेंव्हा दहादा फोन करीत होती.. चौकशी करायला.. तिला कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढायच्या असल्या की बरा वेळ असतो.. आणि आत्ता…? जाऊद्या …

आले वाटतं, चहा टाकते .. आमच्या ह्यांना की नाही,  आल्या आल्या हातात चहाचा कप लागतो..  आयता ..स्वतःहून कधी करून घेतील.. मला देतील .. पण नाव नाही. अहो घरात कशाला हात लावतील तर शपथ..!  नुसता वैताग येतो हो.. एखाद्यानं करायचे करायचे म्हणजे किती करायचे.. पण यांना त्याचं काही आहे का?

“अहो, आणलंत का सामान..?  काय म्हणताय? विसरलात ? अहो पिशव्या दिल्या होत्या ना आठवणीसाठी.. त्या कशासाठी दिल्या ते ही विसरलात की काय ?  बरे झाले बाई, नोकरीवर जायचे, घरी यायचे विसरत नाही ते..  आपल्याला घर आहे बायको आहे हे विसरत नाही ते काही कमी आहे का. ?

“काय म्हणालात ? काम जास्त होते..निघेपर्यंत दुकाने बंद झाली ? “

तुम्हांला सांगत्ये नुसती कारणं हो एखादं काम सांगितली की..काम कुठलं हो.. बसायचं मित्रांसोबत चकाट्या पिटत.. मला का कळत नाही होय? आणि नेमकं  काम सांगितलं की बरं यांच्या ऑफिसातील काम वाढतं ? कामचुकार मेले.. नुसता वैताग येतो हो .. पण करणार काय ? पदरी पडले आणि..

.. बघा बघा, दुसऱ्यांचे नवरे घरात कित्ती कामं कर असतात ते आणि आमचे हे ध्यान..

कधी कधी वाटतं बिन लग्नाची राहिले असते तरी बरं झाले असतं.. पण असला नवरा.. नको नको ग बाई !

काय म्हणालात? अगं बाई ,ऐकू गेलं वाटतं… बोलणं…” हो हो  अहो मी आहे म्हणून.. दुसरी तिसरी कुणी असती तर कधीच सोडून गेली असती हो…पण काय करणार ? लग्न केलयं ना तुमच्याशी…

ऐकू येतंय म्हणलं मला..

हो हो .. पण तुमचे कसले भोग हो ..? भोग तर माझे आहेत…

अहो, लग्न केलंय ना मग  भोगतेय आता..भोगायलाच हवं..

आता बोलून तरी काय उपयोग आहे ? ..म्हणतातच ना…

आलिया भोगासी असावे सादर ..!

◆◆◆◆◆

© श्री आनंदहरी

अद्वैत, मंत्रीनगर, इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099/9422373433

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments