जीवनरंग
☆ अतिलघुकथा – सकारात्मक ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆
लघुतम कथा – – १
आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकडे मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.
लघुतम कथा ..२.
शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले; कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.
लघुतम कथा – -३.
आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पडीन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.
लघुतम कथा – – ४.
आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवालदाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक; पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.
लघुतम कथा – -५.
ऑफिसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात.
संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈