सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-3 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(कथासूत्र : बिरोजा आणि मुलांनी धावपळ केल्यामुळे, फलाटावरच्या, जिल्हा प्रशासनाच्या पूरग्रस्त मदत रजिस्टरमध्ये त्यांच्या नावांची नोंद झाली……)
‘देवा!म्हादेवा!’ बिरोजा स्वतःशीच पुटपुटतो,’मला ह्या घड्याळाचे काटे मागे फिरवता आले असते, काळाचं हे चाक थांबवता आलं असतं, तर किती बरं झालं असतं!’ पण त्याला चांगलंच ठाऊक आहे, की हे करणं त्याच्या हातात नाही. त्याच्या नशिबाशी टक्कर द्यायला तो असमर्थ आहे. फलाटाच्या खालीच हातपंपाजवळ तो बसला आहे. क्षितिजावरील शून्यात टक लावून बघतो आहे. एकच जळता प्रश्न त्याच्या मनाला व्यापून राहिला आहे,’उद्या, त्यानंतर काय होणार? पुराचं पाणी ओसरायला काही दिवस तरी लागतील. तोपर्यंत कसं चालवू शकणार मी? बायको -मुलांच्या पोटाला काय घालू?’
‘कसली डोंबलाची काळजी करतोयस, बिरोजा?’मागून कोणीतरी त्याच्या खांद्याला हात लावतो .’मी सांगितलं तसं कर.’
बिरोजा वीज पडल्यासारखा दचकतो. विडीचं उरलेलं थोटूक ओढायचंही भान त्याला राहत नाही. ते जळतं टोक त्याच्या बोटापर्यंत येतं, तेव्हा तो हादरतो.’हाssय’. तो हवेतच हात झटकतो. बोटाची आग शमवण्यासाठी बोटावर फुंकर मारतो आणि बोट तोंडात धरतो.
‘मक्याचा चालू भाव काय आहे, ते बघ. गेल्या वर्षी सातशे होता. आणि या वर्षी?तूच बघ. म्हणून तो सगळा शेतातच कुजत पडलाय. पोत्यात घालून इकडे आणलेला मकाही कुजतोय. फलाटावरून मका उचलणारं कोणीच नाही. मला तुझी काळजी वाटते. तू काय खाणार आणि तुझ्या पोराबाळांच्या पोटाला काय घालणार, काहीच कळत नाही. जरा विचार कर. आम्ही तुला चार हजार देऊ शकतो. ती काय मामुली रक्कम नाही.’
बिरोजा दगड झाल्यासारखा त्या माणसाकडे बघत राहतो.तोंडातून ब्र काढायचंही त्याला सुचत नाही.
‘बरं, बाबा. एवढ्याने तुझं समाधान होत नसेल, तर आणखी पाचशे रुपयांची व्यवस्था होऊ शकेल. पण त्याहून एक पैसाही जास्त नाही. माझ्यासाठी मग काहीच राहणार नाही. तू माझ्याच गावचा आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी म्हणून मी हे करतोय. खरं तर, यात मला खूप नुकसान सोसावं लागणार. काय म्हणतोस मग?’त्याने कमरेवरची घडी दाखवत विचारलं. धोतराच्या त्या घडीत पैसे असणार, हे उघडच होतं. त्याने बिरोजाच्या उजव्या हाताचं बोट धरून शर्टाखालच्या त्या उंचवट्यावर दाबलं.
‘हाssssय!’बिरोजा किंचाळला. त्याचं हेच बोट नुकतंच भाजलं होतं.
तो माणूस हनुवटीवरची दाढी खाजवतो आहे. हा ऑगस्टमधला दमट, उष्ण दिवस आहे. त्याला घाम आला आहे. त्याचा शर्ट पुढून, मागून चिंब भिजला आहे. त्याच्या शर्टाची डागाळलेली कॉलर तो वर करतो आणि आजूबाजूला बघतो. नंतर खिशातून एक छोटी डबी काढतो. डाव्या तळहातावर थोडा तंबाखू टाकतो. बोटाच्या टोकाने एवढासा चुना काढतो आणि दोन्ही चोळायला सुरुवात करतो. काही मिनिटं चोळल्यावर मिश्रण तयार होतं. त्यावरची खर उडवण्यासाठी तो त्यावर फुंकर मारतो आणि बिरोजाला देऊ करतो ,’हे घे. उपाशी माणसांना प्रसादाची भीक कधी मिळणार, ते स्वर्गातल्या त्या देवांनाच ठाऊक. तुझ्या लक्षात कसं येत नाही? ही जून महिन्यातली लूट आहे. बऱ्याच लोकांना घबाड मिळणार. बंधारा पडला नाही, तर त्याची डागडुजी कशी होणार? आणि डागडुजी झाली नाही, तर पाटबंधारे मंत्र्याच्या मेव्हण्याला डागडुजीच्या कामाचं कंत्राट कसं मिळणार? यात फक्त आपण, गरीब लोक मरणार. खरं आहे ना? तुझ्या पोरांच्या पोटाला काय घालणार, याचा विचार तू केला पाहिजेस. त्यांची लग्नं कशी करणार? म्हणूनच दोस्ता,मी तुला आग्रह करतोय, माझा सौदा कबूल कर. तुझ्या खांद्यावरचं जोखड थोडं हलकं होईल.’
बिरोजा काहीच बोलूच शकत नाही. जणू त्याला साप डसला आहे. त्याच्या डोळ्यांत तीच अस्वस्थता आहे. आता त्याची नजर, दुथडी भरून वाहणाऱ्या कोसीच्या पाण्यात तरंगणाऱ्या मेलेल्या गुराच्या डोळ्यांवर खिळली आहे.
‘हे बघ. आज संध्याकाळी गाडी सुटणार आहे. एकदा का ती गेली, की तुला दुसरी संधी मिळणार नाही. चल, तयार हो. सौदा पक्का झाला, असं मी समजू ना?’ एखाद्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे, तो माणूस गर्दीच्या समुद्रात हरवून गेला.
क्रमश: ….
मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी
अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈