सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-4 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र :सौदा पक्का झाला, असं मी समजतो, असं म्हणून तो माणूस गर्दीत हरवून गेला…….)

कटिहारहून हॅरिसनगंजला रोज दोन गाड्या येतात. दिल्लीला जाणारी गाडी फलाटाला लागताक्षणी लोकांनी एकच गर्दी केली. काही जणांच्या डोक्यावर संसाराच्या चीजवस्तूंची गाठोडी आहेत. काही जण,आपल्याकडे होतं -नव्हतं ते सगळं पत्र्याच्या  ट्रंकेत घालून,त्या ट्रंका डोक्यावर घेऊन  चालले आहेत.आपली वडिलोपार्जित घरं सोडून ते जीवनाच्या नव्या क्षेत्राच्या शोधात चालले आहेत. त्यात बरेचसे तरुण आणि मध्यमवयीन लोक आहेत. त्या गर्दीत काही म्हातारेही आहेत.फक्त थोडेच लोक सहपरिवार चालले आहेत. या मोहमयी आयुष्यात त्यांना एकत्रच पोहायचं आहे. बोटी उलटल्याच, तर सगळ्यांनी बरोबरच बुडून मरूया, असं त्यांना वाटतं. जीवन वा मरण – याला एकत्र राहूनच तोंड द्यायचं आहे.

वाल्मिकी ऋषींनी रामवनवासाविषयी लिहिलं. महाभारतासारख्या महाकाव्याचे कवी वेदव्यास यांनी पांडवांच्या वनवासाची गाथा लिहिली. पण या हजारो दुःखी माणसांच्या हद्दपारीविषयी कोण लिहिणार? एवढी आग, एवढे अश्रू पेलायची ताकद कोणाच्या लेखणीत आहे?

‘बा, आपण जाऊन तायडीला घेऊन येऊ या.’ बापाच्या घामेजलेल्या पाठीला मुरली चेहरा पुसतो.

‘ही गाडीपण सुटेल. ते जेवणाची पाकिटं घेऊन कधी येणार कोणास ठाऊक!’ माधोच्या पोटात कावळे कोकलताहेत. तो उतावीळपणे बापाच्या सदऱ्याच्या बाहीला हिसका देतो.

‘ते जीप नायतर ट्रकमधून येणार. गाडीतून नाही.’ मोठा मुरली धाकट्या भावाला दिलासा द्यायचा प्रयत्न करतो.

बिरोजा उठतो. तिघेही कालव्याकडे जायला निघतात. इकडे असणाऱ्या दहांपैकी नऊ लोक सद्या तिथेच राहत आहेत.

जनकदुलारी सगळ्यात धाकट्या भावाच्या -छोटूच्या -डोळ्यांच्या खालच्या कडेला काजळ लावत आहे. या तिघांना येताना बघताक्षणीच ती त्यांच्याकडे धावते. भावांच्या कानात कुजबुजत ती विचारते,’मला वाटतं, आज ते तिकडे वाटणार आहेत. हो ना?’

‘म्हणूनच आम्ही आलो आहोत. चल. लवकर चल.’

मुरली आणि माधो लहान असले, तरी त्यांना चांगलंच ठाऊक आहे – फलाटावर खिचडी वाटणार आहेत, याचा सुगावा इतर कोणालाही लागता कामा नये. ही बातमी फुटली, तर यांचंच नुकसान होणार. त्यामुळे इकडे येतानाच बिरोजा त्यांना पुन्हापुन्हा   आठवण करून देत होता, ‘कोणालाही काहीही सांगू नका.’ त्यामुळे जरी त्यांची तोंडं बंद असली, तरी ही सुखद अपेक्षा त्यांच्या डोळ्यांत काठोकाठ भरली आहे. आणि त्यांची बहीण ती पटकन ओळखते.

‘माय , छोटूला घे.’ जनकदुलारी भावाला आईच्या मांडीवर ठेवते आणि ‘आम्ही लगेचच परत येतो’ असं सांगून त्यांच्याबरोबर निघते.

ती चौघं स्टेशनवर येतात, त्यापूर्वीच  मदतीच्या सामानाचा ट्रक येऊन पोहोचलेला असतो. इतरांपूर्वी, थोडासा का होईना, पण आपला वाटा मिळावा, म्हणून स्त्री-पुरुष रेटारेटी करत असतात. झोंबाझोंबी, शिवीगाळ, मारामारी चालूच आहे. असाहाय्यता आणि भूक यापुढे  माणुसकी थिटी पडते आहे.

कोणालाच धीर धरवत नाही. ते थाळीतून खायला सुरुवात करतात. मुरली म्हणतो,’माय , आजा , आजीसाठी काहीतरी नेऊया.’

‘हो.’ बिरोजा म्हणतो. पण तो उठायच्या आतच त्याला पुन्हा त्याच्या खांद्यावर पकड जाणवते. तो माणूस त्याच्या मागेच उभा असतो. तो डोळे मिचकावून बिरोजाला इशारा देतो. बिरोजा थाळी माधोकडे सरकवतो आणि त्या माणसाच्या पाठोपाठ जातो. तो माणूस फलाटाच्या टोकापर्यंत जातो. बिरोजा भारलेल्या सापासारखा त्याच्या मागून जातो.

‘यार, बघ. ही कोसी सतलज एक्सप्रेस कोणत्याही क्षणी सुटेल.हे ठेव. साडेचार हजार आहेत. काळजी करू नकोस.नंतर तू तुझ्या मुलीला कधीही भेटू शकतोस.’ तो माणूस बिरोजाच्या हातात एक गठ्ठा द्यायला जातो. बिरोजा हात मागे घेतो.

‘नको नको. भलतंच काहीतरी काय बोलतोयस? मी -मी नाही घेणार हे.’ बिरोजा गोंधळला आहे. त्याच्या आवाजात दम नाही. एवढे पैसे!एकगठ्ठा!देवानेच धाडल्यासारखे. भगवंता !वाचव मला.

‘चल.ठेव हे. बघ, विचार कर. एवढ्या पैशात तुझ्या कुटुंबाला किती दिवस रोजचं चारीठाव जेवण देऊ शकशील!अरे बाबा, भरल्या पोटावर ढेकर कसा येतो, ते तरी आठवतंय का तुला?’ तो माणूस बिरोजाचा हात पकडतो आणि त्यात जबरदस्तीने पैसे कोंबतो.

क्रमश: ….

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments