श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
अखेर माझे पैसे आणि सुबोध व नकुल या सख्ख्या नि वश्या व शऱ्या या चुलत दोस्तांची प्रेरणा, यामुळे माझी ‘‘मातीच्या चुली आणि वणवा” ही कादंबरी छापून झाली. अजून मुखपृष्ठ राहिलंय, पण चार दिवसांत मुखपृष्ठ घालून पुस्तक हातात ठेवीन, याची खात्री शऱ्यानं दिलीय. कादंबरी तळा-गाळातल्या लोकांवर म्हणजे त्यांच्या जीवन संघर्षावर आधारलेली आहे. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ इ. पुरस्कार मिळवण्यासाठी तशी पूर्वअटच असते, अशी खात्रीशीर माहिती वश्याने पुरवली. तो पुस्तकाचा वितरक आहे, तेव्हा त्याची माहिती खात्रीशीर असणारच, असं मानायला प्रत्यवाय नाही. वाचकांना वाचायला कितीही कंटाळा आला, तरी जीवनविषयक सखोल जाण प्रकट करणारं चिंतन त्यात असलंच पाहिजे, असा वश्याचा आग्रह. कविता, कथा या क्षेत्रात लुडबुड करता करता आता तो समीक्षक बनू घातला होता. आपल्या शब्दांना जाणकार लोकांच्यात वजन आहे, याबद्दल त्याची स्वत:ची खात्री होती व संधी मिळेल तेव्हा आमच्यासारख्या मित्रांना ही गोष्ट पटवण्याचा तो प्रयत्न करत असे. त्याचं ‘‘शब्दहरण” हे पुस्तक पुरस्कारांच्या रांगेत नंबर लावून आहे, असं तो म्हणतो.
तर असा आमचा शऱ्या. समीक्षा ही आपली जीविका आहे. पुस्तक प्रकाशन ही उपजीविका आणि ज्या सरकारी कचेरीत तो फायलींशी आणि संगणकाशी झटापट करत, दरमहा पाच आकडी पगाराचा चेक खिशात घालतो, ती आपली उप उपजीविका आहे, असं त्याचं म्हणणं. आजच्या प्रकाशन मंडळींच्या प्रथेप्रमाणे, तो नवोदितांची पुस्तके त्यांच्या पैशाने छापून देतो. वश्या वितरण व्यवसायात स्थिरावलाय. शऱ्याने छापलेली पुस्तके वितरणासाठी तो नवोदितांकडून घेतो. खपल्यावर पैसे देण्याच्या बोलीवर. अद्याप काही त्याने कुणाला पैसे दिल्याचे ऐकिवात नाही. पण त्याबद्दल कुणी फारशी तक्रार केलेलीही दिसली नाही. बहुदा पुस्तकांचे डोंगर आपल्या घरात पडून जागा अडण्यापेक्षा दुकानात बरे, असा विचार लेखक मंडळी करत असणार आणि अडलेल्या जागेचं भाडं मागत नाहीयेत, हेच आपलं नशीब असाही विचार करत असणार ही मंडळी… काही का असेना, पुस्तक विक्रीच्या रुपाने का होईना, पण केवळ साहित्यावर जगणारा आमच्या दोस्त मंडळीतला हा एकटाच.
तर शरदने म्हणजे शऱ्याने स्वखर्चाने माझी कादंबरी छापायची आणि वश्याने म्हणजे वसंताने ती विकायची जबाबदारी पत्कारली. प्रुफं तपासण्याची जबाबदारी सुबोधने उचलली आणि मुखपृष्ठ, मांडणी इ. इ. गोष्टीत स्वत: जातीने लक्ष घालायचे नकुलने मान्य केले. माझ्याकडे फक्त कादंबरी लिहिण्याचं किरकोळ काम आलं.
त्या दिवशी असं झालं, ‘‘टाईमपास” मध्ये अरबट चरबट खात आम्ही टाईमपास करत होतो. आम्ही म्हणजे, मी, नकुल, सुभ्या, वश्या, शऱ्या ही पंचकडी. वड्याचा एक मोठासा तुकडा तोंडात कोंबत शऱ्या एकदम म्हणाला,
‘‘पक्या, काही तरी झकास पकव ना!”
‘‘काय?” मी आणि वश्या किंचाळलोच एकदम.
‘‘तू एका साहित्य सम्राटाला स्वयंपाकी बनवायला निघाला आहेस?” इति नकुल.
‘‘तसं नाही रे बाबा! तुझ्या मेंदूत काही तरी नवीन पकव असं…”
‘‘पिकव म्हणायचंय का तुला सुबोध?”
‘‘तेच ते… पिकव काय? आणि पकव काय?…”
‘‘तेच ते कसं असेल? आधी पिकतं आणि मग पकतं… आणि म्हणे जाणकार समीक्षक…”
‘‘हे बघ, जे काय असेल ना, धान्य किंवा अन्न… व्यवस्थित पॅकमध्ये लोकांसमोर येऊ दे… फुटकळ नको…” ही सूचना अर्थात वसंत महाराजांची.
‘‘म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला?”
‘‘म्हणजे फुटकळ लंगोटी पत्रातून किंवा साप्ताहिक मासिकातून नको. पुस्तकच काढलं पाहिजे… झकास… तू एक काम कर. एक कादंबरीच लिहून टाक ना!”
‘‘आणि?”
‘‘आणि काय विचारतोस भोटसारखं? ती एकदम छापून बाजारात आली पाहिजे!”
‘‘येऊ दे! येऊ दे!… मी असा फर्स्टक्लास डिसप्ले करतो ना! येणाऱ्याने थांबून बघितली पाहिजे… नुसती बघितली पाहिजे, असं नाही, तर विकतच घेऊन टाकली पाहिजे!”
‘‘ते सारं झालं! कादंबरीही लिहिली… फर्स्ट क्लास… छापणार कोण?”
‘‘काय आहे, पुस्तक छापलंच नाही, तर साहित्य ॲकॅडमी, ज्ञानपीठ, निदान येता बाजार, राज्य पुरस्कारापर्यंत पोचणार तरी कसा तू?” ही कळवळ नकुलरावांची.
मलाही ते पटलं आणि त्याच बैठकीत मी कादंबरी लिहायची, ज्ञानपीठाच्या, किमान साहित्य ॲकॅदमीच्या निदान पक्षी राज्य पुरस्काराच्या योग्यतेची, असं निश्चित करण्यात आलं. आता या साऱ्या पुरस्कारांचा विचार करू जाता, कादंबरीत शोषित वर्गाचे दु:ख, यातना, वेदना आणि काय काय ते उघडून दाखवणारी असावी, अनुभवाधिष्ठित असावी, जीवनाचा शोध घेणारी असावी… वगैरे… वगैरे… हे सगळं चौकडीनं ठरवून टाकलं आणि माझ्यासाठी अगदी सोप्पं काम (त्यांच्या मते) ठेवलं, ते म्हणजे तशा प्रकारची कादंबरी लिहिणे. थोड्याच दिवसात मी माझ्या कल्पनेने अनुभवाधिष्ठित कादंबरी लिहून टाकली, ‘‘मातीच्या चुली आणि वणवा.”
पुस्तक छापून झालं. सुबोध म्हणाला, ‘‘प्रकाशन समारंभ अगदी शानदार झाला पाहिजे!”
क्रमश:…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈