श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले- ‘‘गाढव आहेस!”
तसा मला केव्हाही काहीही म्हणायचा अधिकार सुबोधला आहेच आणि तो केव्हाही, कुठेही गाजवायची सवय सुबोधला आहे.
आता काय झालं?” आता इथून पुढे)
समारंभाच्या दिवशी शंभर श्रोत्यांना सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळात बुक केलं. सर्व श्रोत्यांना वेळेवर पाठवा, असं सुशीलाजींना वारंवार बजावून आम्ही निघालो. श्रोत्यांच्या चार लीडरना (यांचा चार्ज दुप्पट होता) दुसऱ्या दिवशी सुबोध कुठे टाळ्या वाजवायच्या, कुठे वाहवा, कुठे बहोत खूब म्हणायचं, ते समजावून सांगणार होता.
श्रोत्यांची व्यवस्था झाल्यामुळे मी निर्धास्त होतो. आता प्रतिक्षा होती, ती केवळ समारंभाच्या क्षणाची. जाणारा प्रत्येक क्षण युगा युगासारखा, का काय म्हणतात तसा, वाटू लागला होता. आणखीही एका गोष्टीची प्रतीक्षा होती. मुखपृष्ठवगुंठित पुस्तकाची. पुस्तक तयार झालं होतं, पण अजून मुखपृष्ठ झालेलं नव्हतं. शऱ्याचं रोज उद्या चाललं होतं. अखेर प्रकाशन समारंभ दुसऱ्या दिवसावर येऊन ठेपला. मुखपृष्ठविरहित पुस्तकाचे प्रकाशन करावे लागणार की काय, अशी मनात धाकधुक असताना शऱ्या विजयी वीराच्या थाटात प्रवेशता झाला. आम्ही उद्याच्या तयारीवर अखेरचा हात फिरवत होतो.
शऱ्याने आपल्या शबनममधून पुस्तकाच्या दहा प्रती काढून तिथे टेबलावर मांडल्या. मी झडप घालून पुस्तक उचललं. पुस्तकाचं शीर्षक होतं ‘‘मणाच्या चुली आनि वनवास.”
‘‘तू पुस्तकाचं शीर्षक बदललंस की काय?” वश्या म्हणाला. ‘‘मातीच्या चुली ‘तिथं’ मणाच्या चुली” झालं होतं, आणि ‘‘वणवा” ला स येऊन चिकटला होता.
‘‘ही सारी प्रकाशक महाशयांची किमया. माझी नव्हे. नकुलची… मुखपृष्ठ, मांडणी तो बघणार होता.”
‘‘पण मी मुखपृष्ठ डिझाईन करणाऱ्या तुझ्या झेन कॉम्प्युटरवाल्याला सगळी कल्पना देऊन आलो होतो… पण चूक झाली असली, तरी बरोबर झालंय. मुखपृष्ठ अगदी अर्थपूर्ण झालंय.” इति नकुल.
‘‘काय अर्थपूर्ण झालंय. माझ्या कादंबरीतील आशयाशी दुरान्वयाने तरी संबंध आहे का या मुखपृष्ठाचा?”
मुखपृष्ठात फोकसला गांधी टोपी, धोतर-झब्बेवाले दोन पुढारी, एकमेकांकडे माजलेल्या रेड्यासारखे टवकारून पाहात होते. पार्श्वभूमीवर लोकांच्या रांगा होत्या. मतदान केंद्राची पाटी होती.
‘‘राजकीय पुढारी मतांसाठी तळा-गाळातल्या लोकांना प्रलोभन दाखवतात आणि त्यांचं शोषण करतात. सखोल अर्थ आहे या मुखपृष्ठाला. मला विचारशील, तर हे उत्तम मुखपृष्ठ आहे.” नकुलने पुन्हा समर्थन केलं.
‘‘मला सखोल अर्थ कळायला नकोय! वरवरचाच अर्थ कळायला हवा आणि मला हे मुखपृष्ठ नको. नवीन तयार करा आणि प्रिटिंगपूर्वी मला ते दाखवण्याचे उपकार करा.” मी हात जोडून शऱ्याला म्हटलं. शऱ्याने ते मान्य केलं. पण समारंभाच्या वेळचं काय?
सुबोध म्हणाला, ‘‘जाऊ दे ना यार… प्रकाशन समारंभ याच मुखपृष्ठावर उरकून टाकू. तोपर्यंत लोकांना कुठे माहीत असतं, आता काय आहे? मुखपृष्ठ सुसंगत आहे की नाही?”
शऱ्याने नवीन मुखपृष्ठ तयार करण्याची तयारी दर्शवली. पण पुन्हा आर्ट पेपर विकत घेणं, चित्र तयार करणं इ.साठी साडे तीन हजार रुपये त्याने माझ्याकडून घेतले. मला हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हता. दगडाखाली हात सापडला होता.
‘‘पहिल्या कव्हरची रद्दी आपल्या घरी नेऊन टाका. माझ्या प्रेसमध्ये जागा नाही.” शऱ्या म्हणाला.
‘‘नकुलला दे! तो या चित्राच्या आशयाच्या कविता करेल आणि वापरून टाकेल हे मुखपृष्ठ!” मी मनातल्या मनात शंभर आकडे मोजत बोलून देलो. उद्याचा प्रकाशन समारंभ होईपर्यंत तरी मला ही भुतावळ संभाळून घ्यायला हवी होती.
अखेर तो सुदिन, तो मंगल क्षण अवतरला. सकाळी नऊच्या मुहुर्तावर येणारा मंगल क्षण दीड तास उशिरा, म्हणजे साडे दहाला आला. सन्माननीय अतिथींचं आगमन हा मुहूर्त. प्रमुख अतिथी बरोबर नऊला आले. स्वागताध्यक्ष त्यांच्यापेक्षा व्यस्त. राजकारण, समाजकारण यातून वेळ काढणार. प्रमुख अतिथी प्राध्यापक, म्हणजे शिक्षकच शेवटी. त्यांना काय वेळच वेळ. स्वागताध्यक्ष खासदारसाहेब दहाला, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ख.सा.का. चे चेअरमनसाहेब साडेदहाला आले. लक्ष्मीपुत्र असल्यामुळे ते सर्वात बिझी. सर्व सन्माननीय अतिथींचं तुतारी बितारी फुंकून जोरदार स्वागत करण्यात आलं. मंडळी व्यासपीठावर स्थानापन्न झाली. शारदास्तवन, स्वागतगीत झालं. नकुल प्रास्ताविक करण्यासाठी उठला. प्रास्ताविकात त्याने माझं, माझ्या प्रतिभेचं (माझ्या पत्नीचं नावही प्रतिभाच…), माझ्या लेखनाचं इतकं कौतुक केलं, की त्या क्षणी मला वाटलं, ते भाषण टेप करून साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठकडे पाठवलं असतं, तर माझ्या लेखन कर्तृत्वाचा खोल ठसा परीक्षकांच्या मनावर उमटला असता. पण आता काय उपयोग? ‘‘अब पछताए होत क्या” नकुलच्या भाषणाच्या मधे मधे टाळ्यांचा वर्षाव होत होता. अर्थात् या टाळ्या भाषणासाठी नसून ज्याच्याविषयी भाषण चाललंय, त्या माझ्या लेखनाच्या प्रशस्तीसाठी होत्या, याबद्दल माझी खात्री होती. श्रोते मोठे उत्साही आणि चैतन्यपूर्ण दिसत होते.
अगदी त्याच क्षणी प्रेक्षकातून एक टोमॅटो आला. टप्पकन पुस्तकावर आपटला नि फुटला. प्रमुख पाहुणे पुस्तकाचे नाव जाहीर करण्यासाठी माईकपाशी पोहोचले आणि हे काय? कागदाचे बॉल्स, टोमॅटो, अंडी इ. एकामागून एक स्टेजवर येऊ लागलं. श्रोत्यात कुजबूज, गडबड आणि हळूहळू आरडा ओरडा सुरू झाला. पाहुण्यांनी श्रोत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण दंगा वाढतच चालला. कुणीच कुणाचं ऐकत नव्हतं. सुबोध आणि नकुल श्रोत्यांमध्ये फिरून श्रोत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण सगळं अस्ताव्यस्त झालं. कुणी टाळ्या वाजवत होतं. कुणी स्टेजवर काही ना काही फेकत होतं. कुणी फेकण्याचा नुसताच आविर्भाव करत होते. कदाचित त्यांनी आणलेली सामग्री संपली असावी.
क्रमश:…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈