? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

ते ब-यापैकी घनदाट वन होतं.त्या वनातून वहाणारा सुंदरसा ओढा छान अशी वळणं घेत वनाबाहेर पडत असे.दोन्ही बाजूस असणा-या झाडांनी त्याला कवेत घेतलेलं. किंबहूना  त्याच्या पाण्यामूळेच ते वन वाढलेलं.सगळी झाडं तिथं गुण्यागोविंदानं नांदत होती.कांही रानटी झाडें तर कांही जांबळ,आंबा,सिताफळ,पेरू अशी फळवर्गीय झाडें गर्दी करून होती. मूळात वन निसर्गनिर्मित होतं.

सूर्य उगवला तरी चूकूनच त्याची किरणं झाडांच्या पायाशी खेळत.सूर्य डोक्यावर आला की तो वनांत ब-यापैकी तळांशी यायचा.झाडांच्या फांद्यानां चकवत. फांद्या डोलतील तशी किरणं डोलायची. वनांतलं वातावरण नेहमीच थंडगार असायचं.ओढ्याचं पाणी काठावरल्या झाडांच्या सावल्या घेवून पुढें पुढें सरकायचं.पाणी इतकं स्वच्छ की ओढ्याच्या तळातील गोल गोल गोटे,निरनिराळ्या प्रकारचे मासे प्रसंगी रेतीही दिसून येई.क्वचित बगळे भक्षासाठी काठांवर बसलेले असत.मासा पाण्यावर दिसताच ते अलगद पकडत.

वन फारसं मोठं नव्हत.बरीचशी झाडें इर्षेपोटी उंच वाढलेली.या झाडावरती मोर ,लांडोर, बगळे, कावळे, टिटवी, कोकिळा, पारवे,चिमण्या, सुतारपक्षी, साळूंख्या हे सर्वजन गुण्यागोविंदानं नांदत होते.प्रत्येकजन आपआपलं झाड निवडून आपलं राज्य प्रस्थापित करून होतां.कधीमधी वानरांची टोळी दंगा करायला यायची.थोडे दिवस थांबून निघून जायची.

थोडंस झुंजूमुंजू झालं.अवघ वन जागं झालं.मोरांचा आवाज वाढला.पक्ष्यांचा कलकलाट वाढला.आवाजाचं मधूर गुंजन सारं वन स्तब्ध होवून ऐके.हळूहळू पांगापांग होवू लागली.जो तो अन्नाच्या शोधार्थ घरट्यांतून बाहेर पडू लागला. 

हे सारं दृश्य मोठ्या पिंपळावरच्या ऊंच बिळातून(घरट्यातून) बाहेर येत एक खार आपल्या तीक्ष्ण नजरेनं पहात होती.राखाडी रंगाची,अंगावर तीन पांढरे पट्टे ल्यालेली व झुपकेदार शेपूट असलेली.खालच्या दोन पायावर बसून ऐटदारपणे ती वनांकडे पाही.

रोज  संध्याकाळी गजबजलेलं वन उजाडताच कुठं गायब होतं हे तिलाच कळत नव्हतं.ती जादातर पांच-दहा झाडावरती फिरून येई.आज फिरतानां तिला पेरूचं झाड दिसलं.तिनं मनसोक्त पेरू कूरतडले.त्यातला गाभा खाल्ला अन बिया खाली टाकून दिल्या.खात असता तिनं चिर्र…..असा आवाज दिला,शेपटी ऊंचावली.आवाज ऐकताच ब-याच खारी त्या झाडांवर झेपा टाकत आल्या.पेरूतला गाभा खायचा अन बिया खाली टाकायच्या.परत खाली जावून पुढच्या हातानीं उकरून त्या पुरायच्या.

हे सारं करत असतानां तिची चाणाक्ष नजर सभोवताली असे.कांही आवाज आला तर सर्र…दिशी ती झाडावर चढे.शेंड्यावर जावून बसे.

शेंड्यावर बसून ती ओढा न्याहाळत होती.तिला भला मोठा नाग ओढ्याच्या काठांवरून वनांत शिरतेला दिसलां.त्याच्या तोंडात बेडूक होता.बिचारा सुटण्याचा प्रयत्न करत होता,पण नागाने त्याच्या अणकुचीदार दातांनीं त्याला घट्ट धरलेलं होतं.

तिनं हे पाहिलं.तिचं सारं अंग शहारलं.तिनं दोन- तीनदा आपली शेपुट इकडेतिकडे नाचवली.तिनं जागा सोडली नाही.आता तर त्या नागाने बेडूक पूर्ण गिळला होता.हळूहळू त्याची चाल मंदावली होती.पण पुढं कांहीतरी संकट त्याला जाणवलं असांव.तो क्षणांत एका घळीत शिरून अदृष्य झाला.प्रत्येकजण आपल्या जीवाला सांभाळतो,हे तिला कळून चूकलं.                       

ती शेंड्यावरून खाली आली.ती आपल्या घरी जाणार तोच तिला एक शेतकरी आपले दोन बैल पाणी पाजण्यासाठी उतारावरून ओढ्याकडे येत असलेला दिसला.त्या वनांत हिच एक वाट होती.गुरंढोरं,शेळ्यामेंढ्या त्या वाटेने येत.पाणी पिवून जात.

तिला माहित होते, आपण चाणाक्ष नजरेनं सारं पाहिलं पाहिजे.वनांत सावज होते तसे शिकारीही होते.

तिला आठवलं मागच्या बाळंतपणांत नागाने तिच्या दोन्ही पिल्लांचा फडशा पाडला होता.ती ओरडली.चित्कारली.दु:ख करण्यापलिकडे तिला कांहीच करता आलं नाही.ती एकच करू शकली, तिनं तीचं घर बदललं.उंच अशा पिंपळाच्या झाडावर ती रहायला आली.तिला तिथं कांहींस सुरक्षित वाटायचं.त्याच झाडांवर मोरांचा अड्डा होता.कांही सुतार पक्षी रहात होते.नागाची आता तिला भिती राहीली नव्हती.

क्रमश:…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments