श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग : ओळख – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
नयनाच्या घरापुढे एक पेरूचं झाड होतं. एक दिवस झाडाच्या एका बेचक्यात बुलबुलाच्या एका जोडीने घरटं बांधलं. मग एक दिवस बुलबुलीने त्यात दोन अंडी घातली. काही दिवस अंड्यावर बसल्यावर त्यातून दोन पिल्लं बाहेर आली. बुलबल-बुलबुली त्यांच्यासाठी रोज, दाणे, फळातला गर, बिया, कीडे-मकोडे आणायची. त्यांच्या चोचीत घालायची.
त्यांच्यात आता थोडी थोडी शक्ती येऊ लागली. ती घरट्याच्या बाहेर आली. जवळच्या डहाळीवर बसली. बुलबल-बुलबुली वरच्या फांदीवर बसून कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागली. त्यांच्या पंखात आणखी बळ आलं. मग ती वरच्या फांदीवर मग झाडाच्या शेंड्यावर बसू लागली. बुलबल-बुलबुलीला आकाश ठंगणं झालं.
पिलांच्या पंखात आणखी बळ आलं आणि एक दिवस ती भुर्रर्र भुर्रर्र करत आकाशात उडून गेली. आई वडलांची ओळख विसरली.
नयना स्वैपाक करता करता त्यांच्या हालचाली मग्न होऊन बघायची.
एक दिवस नयनाला आपल्या पोटात नव्या जिवाची जाणीव झाली. ती आनंदून गेली. काही दिवसांनी तो जीव पाय पसरू लागला. लाथा मारू लागला. कुशीवर वळू लागला. एक दिवस बाहेर येऊन नयनाच्या कुशीत विसावला. चुचुक चुचुक करत तिच्या स्तनातील दूध चोखू लागला.
एक दिवस बाळ रांगू लागलं. मग चालू लागलं. मौज-मस्ती करू लागलं. नयना मायेने त्याच्याकडे बघू लागली. लाड, प्रेम करू लागली. त्याचं पालन-पोषण करू लागली.
तो शाळेत जाऊ लागला. चांगल्या मार्कांनी पास होऊ लागला. तो तरुण झाला. कॉलेजमध्ये जाऊ लागला. तो खूप शिकल. त्याला मल्टीनॅशनल कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. मनोहर-नयनाला वाटलं आकाश ठेंगणं झालं.
एकदा त्याला अमेरिकेतून बोलावणं आलं. अधीक चांगली, अधीक लठ्ठ पगाराची नोकरी. तो विमानात बसला. भुर्रर्र भुर्रर्र करत आकाशात उडून गेला. नवीन प्रदेशात वसला. आई वडलांची ओळख विसरला.
© श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अतिशय सुंदर रचना