जीवनरंग
☆ खार….भाग 5 ☆ मेहबूब जमादार ☆
तो दिवस उजाडला.ज्या दिवसाची ती वाट पहात होती.आज तिच्या पिल्लानीं तिच्याबरोबर पाचसहा झाडांचा प्रवास केला होता.सरसर…सरसर ती झाडावरून खाली बुंध्यावर यायची.क्षणात ती दुस-या झाडाच्या शेंड्यावर जायची.दोघात ईर्षा लागायची.हे सारं ती आनंदात पहात बसे.
आता ती वर्षाची झाली होती. ती चपळपणे झाडांवर झेप घ्यायला शिकली होती.त्यानां लागणारं अन्न ती खायला शिकली होती. लागणारं अन्न ती मिळवायला शिकली होती.
वानरांची टोळी पंधरा दिवसानीं वनात अगदी ठरल्यासारखी येई.सगळ्या झाडांवर ते नाचत.एकमेकाशी भांडत.खचितच दात वेंगाडून तिच्याकडे पहात.सहसा अंगावर येत नसतं.
पिल्लांपोटी तिला वाटणारी भिती हळूहळू निघून गेली होती. पिल्लं आता स्वतंत्र झाली होती. दिवसा ती जवळच्या झांडांवर बागडायची,खेळायची.सूर्यास्त होण्याआधी ती घरट्याकडे परत फिरायची.
सूर्य बराच वर आला होता.वनातील सारे पक्षी अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडले होते.मोरानीं शेजारच्या ऊसात जाणे पसंद केले होते. त्यांची छोठी पिल्लं व लांडो-या ही त्यांचे सोबत असत.
ती, तिची पिल्लं व तिच्या सहकारी खारी सोडल्या तर सारे बाहेर होते.वनांत कांही पक्षी पाहूणे म्हणून यायचे.
ती पिंपळाच्या शेंड्यावर बसून होती.
अचानक एक शिकारी तिला वनांत शिरतानां दिसला, तशी ती घाबरली. ती जोरात चित्कारली.आवाज ऐकून तिची पिल्लं तिच्याजवळ आली.दुस-या खारी लपून बसल्या.कांही पक्षानीं आपली मान उंच केली.खाली वनांत त्यानीं शिका-याच्या पावलांचा आवाज ऐकला.तो दबकत दबकत झाडावर पहात चालत होता.
कांही वेळ गेला.तिनं ठो…ठो…असा आवाज ऐकला.क्षणात, एक पक्षी तिला खाली पडलेला दिसला.तिचं सारं अंग शहारलं.तिनं बारकाईनं पाहिलं. त्याच्या हातात पूर्वीसारखी गलोरी नव्हती.पुढच्या नळीतून नेम धरून तो सावज टिपत होता.ती जिथं बसली होती.तिथून शिका-याला दिसत नव्हती.
त्या शिका-याकडे असणा-या हत्याराशी स्पर्धा करणं शक्य नव्हत.याची तिला जाणीव झाली.वनांत बरेचदा ठो…ठो… असे आवाज झाले.पडलेल्या पक्षांचे अगदी कांही क्षण चित्कार तेवढे ऐकू आले. पण ज्यावेळीं शिकारी वनांतून ओढ्याकडे गेला.त्याच्या हातात दोन पारवे अन दोन खारी होत्या.
हे सारं पाहून आज खरंच ती खचली होती.ती जरी स्वत:ला अन तिच्या पिल्लानां वाचवू शकली असली तरी तिचे दोन सहकारी तिने गमावले होते.तिला याचं फार दु:ख झालं होतं.दिवसभर ती उदास होती.ना तिनं काय खाल्लं ना ती घरट्यांतून बाहेर पडली.
या घटनेनं तिचं मन सैरभैर झालं होतं!
तिला इथं रहावसं वाटत नव्हतं.तरीही तिचं मन हे घरटं सोडण्यास राजी नव्हतं.
उजाडताच तिच्या सहकारी खारीनीं पलिकडच्या वनांत जायचं ठरविलं होतं.त्यानुसार ते संचार करत हळूहळू निघाले होते. तर कांही पलिकडच्या वनांत पोहचलेही होते.
पक्षांचा तर काहीच प्रश्न नव्हता.ते दिवसा मूळात असायचेच कमी.शिकारी आला तर ते भूर्र..कन ऊडून जायचे.
तिनं विचार केला आजची रात्र इथंच काढायची.ऊद्या हे घरटं अन पिंपळाचं झाड सोडायचं.रात्री तिला झोप लागली नाही.सारा भूतकाळ आठवत ती जागीच राहीली.तिच्या मनांत ब-याच प्रश्नांनी गोंधळ केला होता.
आपण जातोय खरं,
‘पण ते वन सुरक्षेच्या कारणास्तव भरवशाचं असेल का!
‘कांही नवीन झाडे,तिथे नवीन फळे मिळतील का?’
‘कदाचित तिथे घरट्यासाठी ऊंच झाडे असतीलही.’
पण हा सारा जरतरचा प्रश्न होता.
ब-याच प्रश्नांनी तिच्या मनांत गर्दी केली.शेवटी तिनं पिल्लानां विचारलं, पिल्लं एका पायावर हे वन सोडणेस तयार झाली.
नाविन्य सर्वांनाच भूलविते.भले तो माणूस असो वा प्राणी.
अजूनही तिचं मन भूतकाळांत होतं.तिच्या बालपणीचा काळ तिला आठवला.मागच्या भल्या-बू-या घटनांनी तिला व्याकूळ केलं.तिचे जातवाले तर कालच सा-या आठवणी काळात बुडवून पसार झाले होते.
मोठ्या खिन्न मनांन ती निघाली होती.घरटं सोडतानां तिला उचंबळून आलं.गेले सात ते आठ वर्षे ती या घरट्यात सुरक्षित होती. तिच्यापुढे प्रश्न बरेच होते.
नवीन घरट्यासाठी चांगली जागा मिळेल का?
तिथे सुरक्षीतता लाभेल का?
का? तिथेही शिकारी येतील?
हे सारे प्रश्न घेवून पुढे चालली होती.तिची पिल्लं तर एक-दोन झाडं पुढंच होती.
ती मात्र पुढचा काळ कसा असेल याची कुठलीच खातरजमा न करता सावकाशपणे निघाली होती…….मागे न बघता ….मागचा पुढचा विचार न करता……..!!!
समाप्त
© मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈