सौ. सुचित्रा पवार
जीवनरंग
☆ परवड… भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
आतापर्यँत यशोदाबाईला असलं काय सुचलं नव्हतं पण बायकांनी कान भरवल्यावर रात्रनदीन यशोदाबाईला जिथं तिथं नातवंड दिसू लागली,’घराचं गोकुळ व्हाया होवं ‘असं वाटू लागलं अन मग अशी कोण बरं आणावी ? म्हणून मनात खल सुरु झाला. गोदू रानात गेल्याचं बघून तिनं नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातलीच. ल्योक तर थोडाच मर्जीभाईर होता ? दुपारच्या जेवणाला यशोदा बाई लेकाला म्हणलीच,”आरं बुवा आमी थकत चाललो बग, तुझ्या पोटी एखादं मूल झालं की आमी काशीला जायाला बरं ! गुदीला काय आता मूल व्हायचं न्हाई तवा… दुसरी बायकू आणाया पायजे,तू वाणीवाणीचा योकच,एकाच दोन झालं मजी आमचं डोळ मिटलं तर चालंल. आणि आपल्याला काय कमी रं ?एक घर सांभाळल आन एक श्यात !कसं ? तू होय म्हण. ” बुवाला पण आळीत,चौकात लोकं ईचारायचीच ! बुवाच्या मागण लगीन झालेल्याना कुणाला दोन कुणाला तीन झाली होती,बुवान होकार देऊन टाकला. यशोदाबाई चा आनंद गगनात मावेना ! बुवाचा पाय हुंबऱ्यातन बाहेर पडुस्तोवर यशोदाबाई लगोलग जावंच्या कानी लागली,”आग चम्पे ऐकलंस का ?बुवाच दुसरं लगीन करायचं म्हणतो तुज्या बघण्यात एकांदी हाय का गं ? धनधापुस नाकी डोळी नीट असली म्हंजी झालं. ” उंदरावर टपून बसलेल्या मांजरागत चंपाबाई जणू वाटच बघत होती,ती लगोलग म्हणाली,”एकांदी कशाबाय ? माज्या थोरल्या भावाची गेल्यासाली उरसाला आल्याली धुरपा काय वंगाळ हाय गं ? परक्याची आपल्या घरात घुसवण्यापेक्षा आपल्यात आपलं काय वाईट गं ?वाटीतलं ताटात सांडलं तर काय बिगाडलं ? आणि माझ्या नदरखाली पोरगी चांगली नांदल. बगा बाई,तुमचा समद्याचा इचार करून सांगा. “
सगळं कसं मनासारखं जुळून आल्यालं. ‘आता कारभारी व्हय म्हणलं की झालं! ‘यशोदाबाई हरखून गेली. ‘कवा एकदा घराचं गोकुळ होतंय’ असं तिला झालं होतं.
गावातला उरूस जवळ आला होता. सारवण,धूण कामाला वेग आला होता. चंपान धुरपीला मदतीला बोलवून घेतलं आणि सगळ्यांच्या नजरेत भरवून टाकलं. यशोदाबाई पुढं म्हातारा कधीच जात नव्हता. ठरलं तर !या कानाच त्या कानाला न कळता ! भल्या पहाटे बुवा,यशोदाबाई चंपाबाई,आणि दोघींचे कारभारी पाच माणसं देवाला चालली, सहाव्या माणसाचं नांव पाची जणानाच ठावं. भोळी भाबडी गोदू संसारातल्या आगीविषयी यत्किंचितही मागमूस नसलेली.. नव्हे,आपल्या संसारात इस्तु पडत आहे याची कल्पना नसलेली.. नेहमीप्रमाणं उठून कामाला लागलेली,उरसामुळं चार पै पावण येणार म्हणून कामाचा ढीग जास्तच ! रानातल्या कडधान्यांना राखत घालून गाडग्यात, मडक्यात,कणगीत जमेल तसं मावेल तसं भरून ठेवायचं होतं. गोदूच्या हातापायाला दम नव्हता. उरूस कामं लावायचा पण उत्साहही द्यायचा. वर्षातन तेवढच दोन दिस आनंदाचं. पै पावण्यात मजेत जायचं,परत वर्षभर हायच आपला रामरगाडा ! गोदीनं आवरून म्हशी सोडल्या अन शेतावर गेली. म्हसर खुट्ट्याला बांधून मिसरीची दोन बोटं इकडून तिकडून दातांवर फिरवली,चूळ भरून कडवाळ कापून भारा म्हशीच्या पुढ्यात टाकला, अन कामाला लागली. दिस मावळतीला आला,घरात जाऊन सैपाक करायचा होता. “आत्याबाई कवा येत्यात काय म्हैत !” ती स्वतःचीच पुटपुटली. तिनं लगोलग जळणाचा भारा बांधला,म्हसरं सोडली अन भारा घेऊन ती घराच्या वाटेला लागली.
क्रमशः…
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈