सौ. वंदना अशोक हुळबत्ते

 

? जीवनरंग ❤️

☆ बांगडीचं लेणं … ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

पाण्यांचे दोन हंडे भरले. गॅसवरून कुकर खाली ठेवला आणि चपात्या लाटायला घेतल्या. घरच काम आवरून आज हौसाच्या घरी जायचं होतं.

” शांता….हायस का घरात? पोरीला बांगड्या घालायच्या हायती.”

आतून काम करत शांताने विचारले “गीता कवा आली.”

” झाल आठ दिस.उद्या सासरी जाणार हाय.लई काम पडल्यात बघ. ये की बी.. गी, बी… गी”

नव्या नवलाईन गीता रंगीबेरंगी बांगड्याकडे बघत होती.कधी एकदा नवीन बांगड्या घालते असे झाले होते.गोऱ्यापान हातात कोणत्या बांगड्या शोभून दिसतील? माझा हात बघून धनी काय म्हणतील? सगळ्या साड्यांनवर कोणत्या रंगाच्या बांगड्या चांगल्या दिसतील.मॅचिंग   बांगड्या पण घ्याव्यात काय? असे किती तरी विचार तिच्या मनात आले.पदराला हात पुसत शांता आली ” कशी…..हायस पोरी?”

“बरी हाय”

” कंच्या बांगड्या आवडल्या तुला ?”बांगड्या दाखवत गीता म्हणाली ”  या घाला “

” त्यो इड तुज्या मापाचा नाय.तुला आठराने गाळा लागतोया.थांब दावते.”लाल, पिवळ्या,हिरव्या,निळ्या किती तरी सुंदर सुंदर बांगड्या समोर ठेवल्या.हिरवा कापकाटा तिला पंसत पडला.तिच्या मनासारखा हिरवागार रंग.शांताने बांगड्या उजव्या हाताच्या दोन बोटात पकडून टिचकी मारून ती पिचकी नाही ना हे पाहिले.पिचकी बांगडी बाजूला काढली. निवडलेल्या बांगड्या डाव्या हाताच्या करंगळीत घेतल्या गीताचा हात हातात घेतला.हिला बांगड्या चढवायला जरा पण त्रास होणार नाही. “काय…..लोण्यावाणी मऊ सुत हात हायती.असाच राहू दे.”

” ते नशिबात पायजे बघ.पोरीच्या जातीला काम काय चुकली नायत.कामाच्या रगाड्यात  हात निबरढोक होतोया.आता…माज्या हाताला कोण हात म्हणल का?”

” हे…मातुर…खरं हाय.तुजा हात लयी व्दाड हाय.बांगड्या घालताना लयी कळ सोसतीस बघ तू.आडव हाड हाय.सव्वा दोनचा गाळा बी दाबून भरावा लागतोया.”

” शेतात राबल्यावर गड्या सारखाच हात व्हायचा की.काय बी म्हण…. बांगड्या बीगर हाताला सोभा नाय.बांगडीला एकदा पाणी मुरल का वरीसभर बांगडी हलत नाय.मागल्या वरशी भरलेल्या बांगड्या अजून कश्या हायती बघ.”

बांगड्या भरुन झाल्यावर गीताने शांताबाईंना नमस्कार केला.त्यांनी तिची ओटी भरली.तोंडात साखर घातली प्रेमाने मिठी मारली.

” शांता आता वटी कश्याला?”

” लेक हाय माजी,पैल्यादा घरला आल्या,तशीच पाठवू व्हय ?तू लयी शानी हायस,गप बस.पोरी समद्यांना धरून रा.सुखी हो.”

” तुजा आशिर्वाद पुका जायाचा नाय बघ.घरला येवून जा.येतो आमी.”भरल्या मनाने दोघी बाहेर पडल्या.

माज्या आशिर्वादाचे काय मोल? माजच नशिब मला लिव्हता आल नाय.दुसऱ्याच म्या काय लिव्हणार? आज इस वरीस झाली ऐकली झगडत्या.तीस वरसामाग लगीन करून घरात आले.तवा काय व्हत इथ.एक मोकळा जापता.मायलेकर दोघच राहायची.पुढल्या अंगाला एक दार ,मागल्या अंगाला एक दार मागल्या दाराच्या अंगाला जोडून न्हानी.पाण्याचा एक बॅरल,एक बादली,एक खुटी.बाजूच्या भितीला चूल.त्याच्या जवळ एक लाकडी शेलफ,त्यावर चार भांडी.अन् पतऱ्याच चार मोठ डब.झाला संसार.चुलीवर चार भाकऱ्या थापल्या, का सासू भाईर बांगड्या घालाया जाया मोकळी‌.डोसक्यावर बांगड्यांची बुट्टी घेवून गावोगाव फिरायची.सिधा बांघून आणायची, तेल मीठ आणून माय लेकरं जगायची.आडावरन नाय तर बोरिंगवरन पाणी भरायची,धून  धुवायला नदीवर जायची.लयी सोसायची.लेकाला जपायची.म्या घरात आले.मला लयी अवघडल्या वाणी व्हईत व्हत.सासू म्हणाली दोघं बी जोडीनं डोंगराई देवीला वटी भरून या. पाया पडून या.देवीला जाताना गाव बघितला.धन्यानी शाव,भजी खायाला घेतली.सगळा डोंगूर हिरवागार व्हता.गार वारा झोंबत व्हता.पदूर वाऱ्यावर उडत व्हता.चढताना माजा पाय सरला तवा धन्यानी हात धरला.अजून काय पायजे ? देवी पावली मला. देवीची वटी भरली.माजी अडचण त्यांस्नी सांगितली.धन्याच्या संगतीत दिस कवा मावळला कळल नाय.

उजडायच्या आत आमा दोघींच्या अंगुळा व्हायच्या.धन्याच्या माग लागून घरात एक पारटीशन घातलं. भाकरी बांघून धनी शेतावर कामाला जात.सासूबाईपण बांगड्या घालाया भाईर जायी.म्या दिसभर ऐकली घरात.कटाळा यायचा. नंतर म्या बी सासूसंग जाया लागले.माज म्हायार गरीब.तकड कोनबी बांगड्या घालत नव्हत.बांगड्या घालताना त्या हुभ्या धरायच्या का आडव्या हे बी ठाव नव्हत.मग बांगड्याचा इड कसा कळणार? सासुबाई पटापटा बांगड्या भरायच्या.म्या बघत बसायची.इसकटलेल्या बांगड्या गोळा करायची,माळा बांधायची,फुटक्या काचा गोळा करायची,सिधा बांधून घ्यायची.लय भारी वाटायच.एक दिस सासूबाई म्हणाल्या   “शांता तू बांगड्या भर बघू.”

पैल्यादा चार दोन बांगड्या चढवल्या,दोन चार फुटल्या, हाताला लागल्या,रगत आलं.तवा सासूबाईनी हाताला धरून शिकवलं.हात कसा धरायचा,माप कस बघायचं, बांगड्या कश्या चढवायच्या . हळूहळू जमू लागल.मग म्या बी तयार झाले.आमी दोघी मिळून बाजारला,जत्रला जावू लागलो.दोन पोरं झाली.संसार वाढला.

खेडेगावात निवडणुका म्हणजी जीव का परान.लयी लगबग असे. त्यात धनी सरपंचाच्या घरी जात येत व्हते.सरपंचाच्या मरजीतल माणूस.रोज रातच्याला उशीरा यायच.म्या बडबड करी.कवा कवा तंटा बी व्हायचा.इस वरसा मागच्या निवडणुकीन माज घात केला. आयुश ढवळून गेलं. एक दिस प्रचाराला धनी गेले ते गेले.कुठ गायब झालं कुणास ठाव.पोराचा दोसरा काढून सासून हातरून धरलं. म्या लय वाट बघितली धनी काय आलं नायत.एकली म्या काय काय करणार? सासूबाईच्या जीवावर पोरं सोडता येत नव्हती.भाईर बांगड्या घालाया जाता येत नव्हत.घरातला सिधा बी संपत आला व्हता.खचून कसं चालेल?पायटीशन पुढ दुकान टाकल.गावातल्या बाया घरातच बांगड्या भराया येत.पोटाला चिमटा लावला पोरांना शिकवलं,मोठ केलं.

पोरीच लगीन लावून दिल.पोरान तिकडं शहरात आपल्या मरजीन लगीन केलं.त्याच्या घरात त्यो सुखी हाय.अजून काय पायजे.आजपातुर हे कळलं नाय,धनी एकाएकी गेलं कुठं ?पर मन म्हणतया ते नक्की परत येत्याल.पोर आपापल्या घरात.म्या मातुर ऐकली हाय.आज लयी आठवण येत्या.सगळा चितरपटच डोळ्या म्होर आला.म्या ऐकली काय मनाशी बोलत बसले.हौसाची नातं मोठी झाल्या, बांगड्या भराया बोलीवलया .तवा जाया पायजे.

हौसाच्या घरातून शांता आली तेव्हा घरात मुलगा, सून आले होते.बांगड्या ठेवून, नेहमीच्या सवयीने पत्र्याचे डबे खाली घेतले त्यात आणलेला सिधा ठेवायला लागली तेव्हा मुलगा म्हणाला “आई आता थांब हे सगळं कशासाठी बांगड्या घालतेस? कशाला सिधा गोळा करतेस?तुला काही कमी आहे का? चल माझ्या सोबत,एकटी कुठे राहणार? बांगड्याचे दुकान बंद कर.”

” हे बोलाया सोपं हाय पोरा.ही लक्षीमी हाय माजी.या बांगड्या व्हत्या, हा….सिधा व्हता, म्हणून तुमास्नी जगवल.म्या जगले.हे नुसतं डाळ, तांदूळ,पिठ,गुळ नाय, माज जीवन हाय.तुज्या आजीन बाला जगिवल,म्या तुमाला जगिवल,हा सिधा नाय, मान हाय….मान.कासारनीचा मान.तुला नाय कळायच ते पोरा.म्या इथच राहणार.”

” हेच खाऊन मी मोठा झालो.माहित आहे मला.किती कष्ट केलेस तू ,ते ही मला माहित आहे.म्हणूनच म्हणतोय बस कर. हे चल माझ्या सोबत.”पोराचा इशय टाळण्यासाठी ती सूनेला म्हणाली ” बांगड्या बिगर हात मुंडा दिसतोया.सोन्याच्या बांगड्या मद्यी चार हिरव्या बांगड्या घाल.झाक दिसतील.ये पोरी म्या घालते बांगड्या.”

“आ हो….आई या काचेच्या बांगड्या सांभाळन जिकिरीचे असतं.घरात काम करताना, आॅफिसात काम करताना अडचण होते.सारखा आवाज करतात त्या.मग मन डिस्टर्ब होत.लिंक तुटते.काम करताना बांगड्या सारख्या पुढे पुढे येतात.स्वयंपाक करताना बांगडी फुटली तर केवढ्याला पडेल.मी आॅफिस मधून आल्यावर अंगठी,कानातले,बांगडी,टिकली काढते.झोपताना मंगळसूत्र टोचते ते ही काढते. मग मोकळं मोकळं कसं छान वाटते.तसे ही सणासुदीला, समारंभाला बांगड्या चांगल्या दिसतात.तिथ फक्त मिरवायच असतं ना.मी एक तरी बांगडी घालते, किती तरी बायका एक ही बांगडी घालत नाहीत.आता ही ओल्ड फॅशन  झाली आहे.

” बर बाई तुजी मरजी.बांगड्या नग तर नग.म्या काय बोलणार?म्या पडले अडाणी.पर एक सांगते ‘म्हटल तर सूत नाय तर भूत’असत बघ.आपल्या मनावर असत सगळं”शांताबाई मनात म्हणाली तुज म्हणन बी खरं असल पोरी. या….. बांगड्या,कुकू, मंगळसूत्र यांची तुला अडचण व्हत असल, ही फाशन जुनी असल,पर यांनी माज आयुश सावरलं.जगण्याची उमेद दिली.बांगडीचं लेणं लेते.दुसऱ्याला देते.त्याच्या जोरावर गेली इस वरीस या खेडेगावात पाय रोवून टिकून हाय.इबरतीन जगते.कपाळावर कुकू अन् गळ्यात डोरल असल तर कुणाची वाकडी मान करून बघण्याची हिंमत होत नाय.सासू माग घर हुभ केलं,नवरा परागंदा झाला तरी डगमगले नाय.पोरास्नी शिकवून मोठ केल.कपाळावरच कुकू बघून, आज बी कासारीन बाय म्हणून हक्कान बोलीवत्यात,सवाष्णीचा मान देत्यात.तो या कुकवाच्या जोरावर.बांगड्या म्हणजे निसती काच नाय.बंधन नाय.बायाबापड्यांची ताकद हाय.ती वळकता आली पायजे.मग बांगडी घातली काय नाय घातली काय?बांगडी मनाला बळकटी देते, ती घेता आली पायजे.हे लेणं लेता आलं पायजे म्हंजी जीवनाचा तीर गाठता येतो.हे मला उमगल पर सुनेला कवा उमगणार देणार ? म्या सुनेला कस सांगणार?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments