श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ विटी-दाडू – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆
रावसाहेब म्हणजे सरळमार्गी माणूस. आयुष्यभर नोकरी एके नोकरी केली. आधी वयस्कर आई-वडीलांची सेवा आणि नंतर उशिरा झालेल्या एकुलत्या-एक मुलाचे शिक्षण या साऱ्यांमुळे स्वतःसाठी, बायकोसाठी असा वेळ देणे जमलेच नाही. . कधी कुठे जाणे-येणे, फिरणे, सहलीला जाणे जमलेच नव्हते. मुलगा हुशार, चांगला शिकला, आयटी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली याचा सार्थ अभिमान त्या दोघांनाही वाटत होता. घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याचा, आपण आईवडील आणि मुलगा यांच्याबाबत मुलगा आणि बाप म्हणून असणारी आपली कर्तव्ये आदराने, प्रेमाने आणि योग्यप्रकारे पार पाडू शकलो याचे समाधान हीच आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे, पुंजी आहे असे त्यांना वाटत होते. त्याचाच त्यांना खूप आनंद वाटत होता.
मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला. तसे ते दोघंही त्याच्या लग्नाचा विचार करू लागले. एवढे एक कर्तव्य पार पडले की मग आपण आपले आयुष्य जगू, आयुष्यभर अपूर्ण राहिलेली हिंडण्या-फिरण्याची, तीर्थाटन करण्याची स्वप्ने पूर्ण करू असे ती दोघे एकमेकाला म्हणायची. मुलाजवळ लग्नाचा विषय काढला तसे त्याने त्याच्याच क्षेत्रात काम करणाऱ्या एका मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. रावसाहेब विचारात पडले पण त्यांच्या पत्नीने, राधाबाईंनी एका झटक्यात नकार दिला. रावसाहेबांनी विचार करून राधाबाईंना म्हणाले,
” त्याचे आयुष्य त्याला त्याच्या इच्छेनुसार जगू दे. . अगं, आपल्या वेळचा काळ नाही राहिलेला आता, आपल्यावेळी आई-वडिलांनी ठरवलेल्या स्थळाशी लग्ने करण्यात. . संसार करण्यात धन्यता मानत होतो. आनंद मानत होतो पण आताच्या तरुण पिढीची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या सुखाच्या कल्पना सारेच वेगळे आहे. आपल्या वेळचे सारे वेगळे होते. . अगदी थोडक्यात सांगू का तुला. . ? अगं, आपले जग वेगळे होते, आहे आणि त्यांचे जग वेगळे आहे. “
” अहो, पण… “
” मला एक सांग, आपल्या पोटचे लेकरू सुखात असावे, राहावे असे वाटते ना तुला? “
” अहो, काहीही काय विचारताय, मी आई आहे त्याची. . आणि प्रत्येक आईला आपले मुल सुखात, आनंदात असावं असं वाटत असतंच…”
” हो ना? मग त्यासाठी त्याला त्याच्या मनाप्रमाणे जगू दे. अगं, अलिकडची पिढी तर लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा विचार करत असते. . आपला मुलगा लग्न करायचे म्हणतोय हे ही नसे थोडके… तसे लिव्ह इन सुद्धा वाईट नाही म्हणा. . आपल्यावेळी असते तर. . “
” काय म्हणालात. . ?”
डोळे वटारून राधाबाईनी विचारले,
” अगं, तुझ्याबरोबरच म्हणतोय मी. . “
हसत हसत रावसाहेब उत्तरले. .
” म्हणजे त्यातही तुमच्याबरोबरच? छे बाई ss ! मग त्याला काय अर्थ आहे. . “
राधाबाई कृतक कोपाने म्हणाल्या आणि हळूच हसल्या.
राधाबाईंचे हे हसणे म्हणजेच मुलाला हवे तसे लग्न करायला संमतीच होती.
मुलाचे त्याच्या इच्छेप्रमाणे लग्न झाले. ते ही कर्तव्य व्यवस्थित, आनंदाने पार पडले याचे समाधान रावसाहेब आणि राधाबाईंना झाले. काही दिवस मुलाबरोबर त्याच्या फ्लॅट मध्ये राहून, त्याचा संसार मांडून देऊन रावसाहेब आणि राधाबाई गावी परतले.
मुलाचा संसार सुरू झाला होता. रावसाहेबांनाही निवृत्तीचे वेध लागले होते. निवृत्तीनंतर लगेचच दक्षिण भारताची, उत्तर भारताची यात्रा करायची असे दोघांनीही ठरवले होते. अनेक वेळा रावसाहेब-राधाबाईंच्या गप्पांचा तोच विषय असे. राधाबाईंनी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या यात्रा कंपनीच्या जाहिरातींची कात्रणेही कापून संग्रहित ठेवली होती, त्यांचे संपर्क क्रमांकही एका वहीत नोंदवून ठेवले होते. .
मुलाने स्वतःचा टूबीएचके फ्लॅट घेतला. मुलाने आपल्याशी विचार-विनिमय करून, आपल्याला बोलावून, फ्लॅट दाखवून फ्लॅट घेतला याचा रावसाहेब- राधाबाई दोघांनाही आनंद झाला. मुलगा-सून स्वतःच्या फ्लॅटमध्ये स्थलांतरित झाल्यावर चार दिवस आनंदात घालवून ते दोघेही समाधानाने परतले.
तिथे असताना राधाबाईं हसत हसत सुनेला म्हणाल्या,
” आता स्वतःचा फ्लॅट झाला नातवंड खेळू दे आमच्या मांडीवर…”
” थोडे थांबा आई ! बाबाही निवृत्त होतील वर्षाभरात. . मग तुम्ही इथेच या दोघेही. . आमचे दोघांचे ठरलंय. . हा सेंकड हॅन्ड फ्लॅट आहे. . तेंव्हा दोनतीन वर्षात आपण लक्झरियस थ्री बीएचके नवा फ्लॅट घ्यायचा आणि तिथ गेल्यावरच तुमचे नातवंडं तुमच्या मांडीवर द्यायचे. “
हसत हसत सुनेने उत्तर दिले. खरे तर राधाबाई मनातून खट्टू झाल्या होत्या. . ते पाहून हसत हसत रावसाहेब म्हणाले,
” किती विचारपूर्वक निर्णय घेते तुमची पिढी. . आयुष्यभर आम्हाला कुठे सहलीला जाता आले नाही, निवृत्तीनंतर आम्ही दक्षिण भारत-उत्तर भारत जाऊन येणार आहोत हे मी बोललेले तुम्ही अगदी आठवणीत ठेवलेले दिसतंय. . स्वतः आधी आमचा विचार करणारी तुझ्यासारखी सून आम्हांला मिळालीय हे आमचे भाग्यच. . “
रावसाहेबांच्या वाक्याने सून ही सुखावली होती आणि राधाबाईंच्या मनातील खट्टूपणा निवळून त्या हसल्या होत्या.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈