श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ विटी-दाडू – भाग- 8 ☆ श्री आनंदहरी ☆
चार दिवस झाले आजोबा बागेत आले नाहीत तेंव्हा स्मार्त आणि अर्थ अस्वस्थ झाले.. गेले तीन-चार महिने आजोबा आले नाहीत असे कधीही झाले नव्हते.
“अर्थ, आजही आजोबा आले नाहीत. का आले नसतील? ते आजारी तर नसतील ना? की त्यांच्या सुनेने त्यांना गावी पाठवून दिले असेल? “
“गावी गेले असते तर आपल्याला भेटून, सांगून गेले असते. कदाचित बरे वाटत नसेल त्यांना म्हणून आले नसतील. ए, आपण त्यांच्या घरी जाऊया का त्यांना भेटायला? आपल्याला अचानक समोर पाहून त्यांना खूप आनंद होईल. “
“हो. आपल्याला त्यांची आठवण येते तशी त्यांना ही आपली आठवण येत असणारच.. चल जाऊया. “
“कुठं राहतात रे ते? त्यांचा पत्ता काय आहे? “
“मला नाही ठाऊक. मला वाटलं तुला असेल माहीत. “
“नाही रे मलाही नाही माहीत. कुठं आणि कसं शोधायचे त्यांना? “
“कुठूनही, कसेही शोधून काढले असते रे, पण आजोबांचं नाव ही नाही माहीत आपल्याला.. “
अर्थ आणि स्मार्त रावसाहेबांनी वाट पाहत राहिले. रावसाहेब काही आले नाहीत.
स्मार्त, अर्थ दोघेही बागेत येतात. विटीदांडू खेळतात.. बराचवेळ रावसाहेब बसायचे तो बाक रिकामा असतो. रोजच खेळून झाल्यावर अर्थ, स्मार्त तिथे पूर्वीसारखेच त्या बाकावर विसावतात. दोघांच्यामध्ये रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू असतो.. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारतात बहुतेकवेळा विषय आजोबांचा म्हणजेच रावसाहेबांचा असतो. ते दोघेही रावसाहेबांची वाट पाहत असतात.. आणि बहुदा विटी-दांडूही त्यांचीच वाट पाहत असणार..
‘किती वाजले रे?’ स्मार्त विचारतो, ‘सात वाजून गेले असतील ‘ अर्थ उत्तर देतो.. अर्थचा निरोप घेऊन स्मार्त आपल्या घरी परततो. रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू घेऊन अर्थ ही आपल्या घरी जातो.. विटी खिशात असते तर आजोबांचं बोट धरावे तसा दांडू धरलेला असतो.
दुसऱ्या दिवशी ते दोघेही पुन्हा विटीदांडूने खेळायला येणारच असतात.. आणि आजोबांची म्हणजे रावसाहेबांची वाट ही पाहणारच असतात.
◆◆◆
समाप्त
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈