श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तो आणि ती – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(चाळीशी ओलांडलेली होती……. आता पुढे)

बैंकेतील पाच शून्यांच्या आधी काही दोन आकडी संख्याही  जमा झालेली असते.  एका निवांत क्षणी,  त्याला कॉलेजचे ते जुने दिवस आठवतात. आजूबाजूला कोणी नाही अशी वेळ साधून तो तिला म्हणतो, “अग, ये जरा अशी समोर, बस माझ्या जवळ. पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू. कुठे तरी फिरायला जाऊ.”

ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते, ” कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला! जरा मुलगा मोठा झाला आहे त्याचे तरी भान ठेवा. ढीगभर काम पडलीयेत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत. चला व्हा बाजूला.”

मग येते पंचेचाळीशी, त्याच्या आणि तिच्या डोळ्यावर चश्मा चढलेला असतो. एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात. दोघांच्याही केसांनी आपला काळा  रंग  सोडून द्यायला सुरवात केलेली असते. मुलाने आता शाळेमधून कॉलेजसारख्या मोठ्या आणि वेगळ्या दुनियेत प्रवेश केलेला असतो. त्याच्या गरजा वाढत जातात. बैंकेतील सहा शून्यापर्यंत गेलेली शिल्लक वाढत न जाता कमी होत जाते. ती स्वतःचा वेळ मैत्रिणींबरोबर किटी पार्टी किंवा भजनी मंडळात घालवत असते. त्याचे  वीकेंडच्या  बैठकीचे  कार्यक्रम  सुरुच असतात. तरीही तो आणि ती, त्याची आई लवकर गेल्याने खचलेल्या म्हातार्याा वडिलांची  काळजी घेत असतात. त्याच्या म्हातार्याआ वडिलांना त्याचा आणि तिचा एक मानसिक आधार कायम असतो. एकाचवेळी मागच्या पिढीला  आणि पुढच्या पिढीला सांभाळण्याचे एक अतिशय कठीण असे काम तो आणि ती सहजतेने करत असतात.

कॉलेज मधून बाहेर पडून मोठे झालेले बाळ आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करते. त्याला पंख फुटलेले असतात, आणि एक दिवस ते त्याच्या आणि तिच्या बँकेतले सगळे शून्य वापरून दूर परदेशी उडून जातो.

आता त्याच्या केसांनी, काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते. आता तिलाही केसांना काळा  रंग लावायचा कंटाळा आलेला असतो.

काही काळाने त्याच्या म्हातार्या   झालेल्या वडिलांनी त्याला आणि तिला, म्हातारा- म्हातारी बनवून त्यांची साथ सोडून सुखाची झोप घेतलेली असते.

आता तो तिला म्हातारी म्हणू लागतो,  कारण स्वतःही तो  म्हातारा झालेला असतो. साठीची वाटचाल सुरु झालेली असते.

प्रॉव्हिडन्ट फंडामुळे बैंकेत आता परत काही शून्य जमा झालेली असतात. एव्हाना त्याचे बैठकीचं प्रोग्रॅम कमी झालेले असतात आणि डॉक्टरांच्या भेटी वाढून औषध, गोळ्या यांच्या वेळा  ठरतात.

बाळ मोठे झाल्यावर लागेल म्हणून घेतलेले मोठे घर अंगावर येऊ लागते.  बाळ कधीतरी परत येईल ह्याची वाट बघण्यात  तो आणि ती आणखी  म्हातारे  होतात.

आणि तो एक दिवस येतो. संध्याकाळची वेळ असते.  म्हातारा झोपाळ्यावर मंद झोके घेत आपल्याच गत आयुष्याचा विचार करत बसलेला असतो. म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते. म्हातारा लांबून तिच्यात झालेले बदल न्याहाळीत असतो  आणि तेवढ्यात फोन वाजतो. तो लगबगीने उठून फोन घेतो, फोनवरून मुलगा बोलत असतो. तो आपला फोन स्पीकरवर टाकतो. त्याचा आवाज ऐकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाच्या स्मितरेषा  उमटतात. मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि त्याचा आणि तिचा, तो  तिच्या बरोबर परदेशीच रहाणार असल्याचे सांगतो.

क्रमशः…

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments