श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ तो आणि ती – भाग -3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(तिच्या बरोबर परदेशीच रहाणार असेही सांगतो……आता पुढे)
म्हातारा थोडा गडबडतो, काय बोलावे हे त्याला सुचत नाही, त्याचे अभिनंदन करून म्हातारा, मुलाला, मेहनत घेऊन वाढविलेल्या बँकेतल्या शिल्लक असलेल्या शून्यांविषयी काय करायचे ते विचारतो. आता परदेशातल्या शून्यांच्या मानाने म्हाताऱ्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते.
तो म्हाताऱ्याला एक सल्ला देतो, “एक काम करा ते पैसे एका वृद्धाश्रमाला द्या. पुढेमागे कदाचित तुम्हांला त्याचा उपयोग होईल.” पुढचे थोडेसे जुजबी बोलून मुलगा फोन ठेऊन देतो.
म्हाताऱ्याचा तोल जातो. स्वतःला सांभाळून तो पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसतो. म्हाताऱ्याला आज पहिल्यांदा जाणीव होते की आपल्या मुलापेक्षा आपण खूप नशीबवान होतो. आपल्याला, आपल्या आई वडिलांची सेवा करायचे भाग्य मिळाले. आपल्या मुलाच्या दुर्दैवाने त्याच्या नशिबात ते भाग्य नाही.
म्हातारीची दिवाबत्ती झालेली असते.
तो तिला हाक मारतो, “अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू.” आणि म्हातारी चक्क म्हणते, “हो आलेच”. म्हाताऱ्याचा विश्वासच बसत नाही. आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.
त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो, तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो…. त्याच्या डोळ्यातले तेज कमी कमी होत जाते…आणि काही क्षणांत त्याचे डोळे निस्तेज होतात. म्हातारी आपली देवपूजा आटपून म्हाताऱ्या शेजारी झोपाळयावर येऊन बसते आणि म्हणते, ” बोला काय बोलायचय”
म्हातारा काहीच बोलत नाही. ती म्हाताऱ्याचा हात आपल्या हातात घेते. शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे निस्तेज झालेले असले तरी एकटक म्हातीराला बघत असतात.
क्षणभर म्हातारी हादरते. सुन्न होते. तिला काय करावे हेच सुचत नाही, पण लगेचच ती स्वतःला सवारते…हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते आणि पुन्हा झोपाळयावर येऊन बसते.
म्हाताऱ्याचा थंडगार हात ती पुन्हा आपल्या हातात घेते आणि म्हणते, ” चला कुठे नेता फिरायला आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला ? बोला “
म्हातारीच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळत असतात. एकटक नजरेन ती म्हाताऱ्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रुही गोठून जातात आणि म्हातारीची मान अलगद म्हाताऱ्याच्या खांद्यावर पडते.
बँकेतल्या शून्यांना बरोबर न घेता, ते आपल्या लाडक्या मुलासाठी येथेच सोडून, तो आणि ती, दोघांनी एका न संपणाऱ्या अशा लांबच्या प्रवासाला सुरवात केलेली असते.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.
समाप्त
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈