सुश्री अरूणा मुल्हेरकर
जीवनरंग
☆ ऋणानुबंध…भाग 2 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(“बघा तुम्हाला ह्या बाई पटतात का, नाहीतर आम्हाला कळवा. आम्ही दुसरी बाई देऊ” असे सांगून तो निघून गेला)
रात्री दोघींचे जेवणखाण उरकले. त्या आल्यापासून दोघीजणी बोलत बोलतच संध्याकाळची कामे उरकत होत्या.
“मी तुम्हाला मावशीच बोलत जाईन. चालेल नं?” नंदिनीने विचारले. “चालेल की ताई. “मावशींचे प्रत्यूत्तर. तेव्हापासून त्या मावशी आणि ती ताई झाली. असेही तिच्या धाकट्या बहीणींची ती ताईच होती.
मावशी सातारकडच्या. त्याही तिघी चौघी बहीणी होत्या आणि सगळ्या बहीणींचा एकच मोठा दादा होता. दादाची सांपत्तीक स्थिती चांगली होती. शेतीभाती होती, स्वतःचे घरदार होते. त्यांची वहीनी स्वभावाला अतिशय प्रेमळ. मावशी दादा~वहीनींविषयी भरभरून बोलत होत्या. “ताई काय सांगू तुम्हाला? अहो, माझ्या कातड्याचे जोडे करून दादांच्या पायात घातले तरी त्यांचे माझ्यावरचे उपकार फिटायचे नाहीत.”
“का हो? असं का बोलता?”
मावशींनी तिला त्यांची कर्म कहाणी सांगण्यास सुरवात केली.
मावशींनी नवर्याच्या अत्याचाराला कंटाळून घर सोडले. मुलगी लग्न होऊन सासरी नांदत होती, पण तिचा कावीळीचा आजार बळावला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. संजू आणि बंडू दोन मुलांना घेऊन त्या दादांकडे येऊन दाखल झाल्या. दादा~वहीनींनी त्यांना अगदी प्रेमाने आधार दिला. मावशी दादांच्या किंवा गावातील शेतकर्यांच्या शेतावर मिळेल ते काम करून पूर्ण भार दादांवर नसावा ह्या सूज्ञ विचाराने जीवन कंठू लागल्या.
मुले मोठी झाली. संजू, बंडू दोघांचेही लग्न झाले, पण बंडूची बायको माहेरी निघून गेली.
नंदिनीकडे त्या कामाला आल्या त्यावेळी त्या संजूकडे होत्या. संजूने गावात त्याचा संसार थाटला होता, बर्यापैकी बस्तान बसविले होते. त्याचा मुलगा व मुलगी शाळेत शिकत होते.
सुनेचे आणि त्यांचे मात्र कधीच जमले नाही. बंडूची तर फारच मानहानी होत होती. कारण त्याच्याकडे धड काम नव्हते. तो म्हणजे खायला काळ आणि भुईला भार. . . !
मावशींना हे सहन न झाल्यामुळे त्या बंडूला घेऊन तडक मुंबईत भांडूपला रहाणार्या त्यांच्या बहीणीकडे आल्या. बहीणीच्या मुलाने बंडूला ओळखीने कुठेतरी सिक्यूरिटीत चिकटविले.
मावशी तशा स्वाभिमानी. बहीणीकडे किती रहाणार?कुठेतरी चांगल्या घरी चोवीस तासांची नोकरी मिळाली तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि डोक्यावर छप्परही राहील असा विचार त्यांनी केला आणि आज त्या अशा प्रकारे नंदीनीच्या खरी दाखल झाल्या.
क्रमशः…
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈