सुश्री अरूणा मुल्हेरकर
जीवनरंग
☆ ऋणानुबंध…भाग 3 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(कुठेतरी चांगल्या घरी चोवीस तासांची नोकरी मिळाली तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि डोक्यावर छप्परही राहील असा विचार त्यांनी केला, आणि आज त्या अशा प्रकारे नंदिनीच्या घरी दाखल झाल्या. )
हळूहळू दिवसागणिक नंदिनी आणि मावशींचे सूर चांगले जुळत चालले होते. त्यांच्या व्यक्तित्वाचे एकेक पैलू नंदिनीला उलगडत गेले. सेवानिवृत्त नंदिनी घरच्या घरीच गाण्याचे क्लास घेत होती. स्वयंपाकघरात काम करता करता मावशींचे कान मात्र क्लासमध्ये चाललेल्या गाण्याकडे असायचे. कोणाचा सूर चांगला आहे, कोण बेसुरा आहे हे त्यांना चांगले समजायचे. कानावर अती बेसूर स्वर पडले तर त्यांना सहन व्हायचे नाही. कसलीही भीडभाड न बाळगता सरळ तोंडावर सांगायच्या, “ताई तुमचा गळा बेसुरा आहे, त्याकडे पहिले लक्ष द्या. “नंदिनीला वाटायचे ह्या अशा एकदम कशा काय बोलू शकतात? किती वेळा नंदिनी त्यांना समजवायची, “मावशी, असे एकदम तीर सोडू नका. “पण मावशी म्हणजे स्ट्रेट फाॅरवर्ड.. . !
त्यांचा आवाज इतका गोड होता, सूर ताल, लय अगदी उत्तम. किती गवळणी त्या नंदिनीला गाऊन दाखवायच्या. “हरी माझ्या पदराला सोड रे”ही गवळण त्या फार भावपूर्ण गात असत. कधी कधी तर दोघींची मैफीलच जमायची. मावशी गवळणी गायच्या आणि नंदिनी पेटीवर त्यांना साथ द्यायची. दोघी कशा अगदी रंगून जायच्या. नंदिनीकडे काही बायका भजने शिकायला येत असत. मावशीही बसायच्या त्यांच्याबरोबर.. ..
कधी शाळेत गेल्या नाहीत. लिहिता वाचता काही येत नव्हते पण त्यांचे बोलणे ऐकत रहावे असे. अगदी साधे बोलतानासुद्धा सहजपणे किती म्हणी आणि वाक् प्रचार वापरायच्या. नंदिनीची बहीण तर नेहमी सांगत असे, “ताई तू मावशींचे बोलणे लिहून ठेव. “
नंदिनीने त्यांच्यासाठी बाराखडी, मुळाक्षरांचे पुस्तक आणले, पाटी पेन्सील आणली आणि त्यांना ती लिहिण्या वाचण्यास शिकवू लागली.
रोज तासभर तरी अभ्यास करायचा असा नियमच नंदिनीने त्यांना घालून दिला. त्याही ईमानाने शिकू लागल्या. थोड्याच कालावधीत त्या वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचू लागल्या. करता करता जोडाक्षरांचीही त्यांना चांगली ओळख झाली. स्वतःची सही करायला शिकल्या. नंदिनीने त्यांना बँकेत खातेही उघडून दिले.
प्रसंगामुळे त्या अशा दुसर्याच्या दारात आल्या पण खरोखरीच त्यांचे आचार विचार फार उच्च होते.
सहा महिन्यांच्या कालावधीतच त्या इतक्या रुळल्या की घर त्यांचे की नंदिनीचे असा प्रश्न पडावा कोणाला.. .
नंदिनीकडे येणार्या तिच्या मैत्रीणी, बहीणी, नणंदा, दीर हेही आल्या आल्या “काय मावशी, कशा आहात तुम्ही?”म्हणून पहिली त्यांचीच चौकशी करणार. नेहमी नंदिनी आणि मावशी कुठेही एकत्रच जाऊ लागल्या. नाटक, सिनेमा, कधी सोशल व्हिजीट्स. बाजारातही दोघी एकत्र जात. चूकून कधी मावशी सोबत दिसल्या नाहीत तर वाटेत भेटणारी मंडळी विचारत, “ताई आज तुम्ही एकट्याच?मावशी कुठे गेल्या?”
हा काहीतरी दोघींचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंधच होता जणू. परमेश्वरी योजना. नंदिनीला देवाने एकटे ठेवले नाही. मावशींच्या रूपात ईश्वरच जसा नंदिनीला साथ देत होता. तिच्या एकट्या जीवनाला उभारी देत होता. तिला आनंदी ठेवीत होता.
समाप्त
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈