श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये☆
(पूर्वसूत्र- “त्ये झालंच. पन सायब, मास्तर द्येवमानूस हाय हो. त्येंच्या जावयानं पुरता धुतलाय बघा त्येनला. तुमचा मेल्याला कर्जदार म्हणजे जावईच की येंचा. जाताना पार धुळीला मिळवून गेलाय यानला. येंच्या पोरीचीबी कशी दशा करुन टाकली बघताय न्हवं?दोन पोरींच्या पाठीवरचं ह्ये एक लेकरु पदरात हाय बगा. सैपाकाची चार घरची कामं करती म्हणून चूल तरी पेटती हाय इथली. मास्तरांच्या पेन्शनीत त्येंचं सोताचं औषदपानीबी भागत न्हाई बगा.. ” बेलीफ सांगत होता. ते ऐकून मी सून्न होऊन गेलो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरून राहिलेला कळकट अंधार आणि माझ्या मनात भरून येऊ पहाणारं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला होता… !)
विचार करायला वेळ होताच कुठं? मी न बोलता आत आलो. एक कागद घेतला. त्यावर पेन टेकवले. दोन परिच्छेद न थांबता लिहून काढले. खाली सहीसाठी फुली मारली. कागद मास्तरांच्या पुढे सरकवला. थरथरत्या हातानी मास्तरांनी न वाचताच त्यावर सही केली. कागदाची घडी करुन मी ती खिशात ठेवली. जाण्यासाठी वळणार तोच कान फुटक्या दोन कपात घोटघोटभर चहा घेऊन, थकून गेलेल्या चेहऱ्याची मास्तरांची मुलगी समोर उभी होती. तिच्या थकलेल्या मनावरचं ओझं उतरवण्याचा मोह मला आवरता आला नाही. म्हणालो,
“हा व्याज आणि कोर्टखर्च माफीसाठी मी अर्ज लिहून घेतलाय. हेड आॅफीसला हा अर्ज मी रेकमेंड करीन. कांहीतरी मार्ग नक्की निघेल.. ” कृतज्ञतेने भरलेल्या नजरेने माझ्याकडे पहात तिने हात जोडले.
“पोरी, आण तरी तो अर्ज इकडे. त्यांचं शुद्धलेखन एकदा तपासून तरी पहातो.. “
केविलवाणं हसत मास्तर म्हणाले. मी अर्जाची घडी मास्तरांच्या हातात दिली. उलगडून न वाचताच त्यांनी ती एका झटक्यांत फाडून टाकली. मी चमकलो. काय होतंय मला समजेचना.. !
“या उतार वयात एवढं ओझं पेलवायचं कसं हो मला?अहो या वाळक्या कुडीत जीव तग धरुन ठेवलाय तो सगळ्यांची सगळी देणी फेडण्यासाठीच. मी म्हातारा आहे. कंगाल कफल्लकही आहे. पण.. पण.. मला खऱ्या अर्थाने ऋणमुक्त होऊन मगच ‘राम’ म्हणायचंय. “
हे बोलता बोलता मास्तरांच्या विझू लागलेल्या नजरेत अचानक वीज चमकून गेल्याचा मला भास झाला….!
“साहेब, आजवर चालवलेले, माझ्या या चिमुकल्या नातवाचे वारसदार म्हणून नाव लावलेले माझे पोस्टात एक बचत खाते आहे. दात कोरुन, पोटाला चिमटे घेऊन जमवलेले किडूक-मिडूक आहे त्यात. नवऱ्याच्या दारूच्या वासापासून वाचवलेले, लपवून बाजूला जपून ठेवलेले पैसेही माझ्या या पोरीने त्यात वेळोवेळी जमा केलेले आहेत. त्या खात्यावर माझ्या नातवाचे नव्हे तर माझ्या त्या कर्मदरिद्री जावयाचेच नाव वारसदार म्हणून लावले होते असे
मी समजतो आणि तुमचं सगळं कर्ज फेडून टाकतो. पोरी, ते पासबुक आण बघू इकडे.. “
काॅटखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढून त्यातलं जिवापाड जपलेलं ते पासबुक मुलींनं मास्तरांकडे सोपवलं. मुलीबरोबर पूर्ण रक्कम बॅंकेत पाठवायचं त्यांनी आश्वासन दिलं. कुणीतरी हाकलून दिल्यासारखी त्यांची मुलगी खालमानेनं आत त्या
विझलेल्या चुलीपुढे जाऊन बसली. मास्तरांकडून पंधरादिवसांची मुदत मागणारा अर्ज घेऊन मी बाहेर पडलो. माझ्याबरोबर बेलीफही.
बेलीफ गप्पगप्पच होता. मी कांही बोलणार तोच खिशातून एक घामेजलेली, कळकट, शंभरची नोट काढून त्यानी माझ्या हातात कोंबली.
“.. हे.. पैसे. मास्तरांचे.. “
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे मी येण्यापूर्वीच सकाळी आगाऊ वर्दी द्यायला जाऊन याने त्या गरीब माणसाकडून बक्षिसी उकळली होतीच तर.. !नुसत्या कल्पनेनेच मला. त्या माणसाची विलक्षण किळस आली.
“सायब, ताईस्नी कर्जाचा हिशेब सांगशीला तवा शंबर रुपै कमी सांगा न् ह्ये त्येंच्या कर्जात आज जमा करुन टाका.. “त्याचा आवाज कळेल न कळेल इतपत ओला झाला होता.
“आवं, आज सकाळच्याला ह्यीच नोट घिऊन मी मास्तरांकडं आलोतो. ह्ये सायेबाना द्यून मुदत मागा म्हण्लंतं. पन त्येनी या पैक्याला हाय बी लावला न्हाई. आवो माज्या ल्हानपनीचं माजं मास्तर ह्ये. मला बुकं शिकायची लई हाव हुती. पन वक्ताला दोन घास खायला मिळायची मारामार असायची. तवा या देवमानसाच्या घरातल्या उरलंल्या अन्नावर दिवस काढलेते आमी. ह्ये पैकं त्येनी घेत्लेतर नाहीतच, पन मला वळख सांगूनबी वळखलं न्हाई. आवं, त्येच्यावानी वाळकुंडा म्हातारा मानूस बी कुणाचं उपकार न ठिवता कर्ज फेडतू म्हनतोय, मंग धडधाकट शरीरपिंडाच्या मी त्येंच्या अन्नाच्या रिणातून कवा न् कसं मोकळं व्हायचं सांगा की… “
मी पैसे ठेऊन घेतले. त्याच्या प्रश्नाचं हेच तर एकमेव उत्तर त्याक्षणी माझ्याजवळ होतं! या माणसाबद्दल माझ्या मनात डोकावून गेलेल्या शंका, संशयाची आठवण होऊन मला माझीच लाज वाटू लागली.
दारिद्र्याशी झगडताना आयुष्याच्या अखेरच्या क्षणीही मनाचा कणा ताठ ठेऊ पहाणारे मास्तर आणि खाल्लेल्या अन्नाचं ऋण फेडायला धडपडणारा बेलीफ यातलं मोठ्ठं कोण याचा निर्णय मला घेता येईना.
वसुलीची कांहीही शक्यता नसणाऱ्या कर्जाची पूर्ण वसूली होत असल्याचं खूप विरळाच मिळणारं समाधान का कुणास ठाऊक पुढे कितीतरी दिवस दुर्मुखलेलंच राहीलं होतं!!
समाप्त
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈