सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ सुंदरी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
संध्याकाळ व्हायला लागली होती. त्या पांथस्थाला दूरवर एका देवळाचे शिखर दिसले. त्यावरून कुठलेतरी गाव जवळच असणार असा त्याने विचार केला, आणि चालण्याचा वेग वाढवला. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या पलीकडून कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला. पुढे जायचं सोडून तो त्या आवाजाच्या दिशेने जायला लागला– झाडी ओलांडून पलीकडे गेला मात्र – आणि समोरचं दृश्य पाहून एकदम दचकला – घाबरला. कमालीच्या जखमी अवस्थेतली कितीतरी माणसं तिथे तळमळत पडलेली होती. त्याला काही समजायच्या आतच जवळच पडलेल्या एक जखमीने कसंतरी म्हटलं – “ पाणी —” .
त्या पांथस्थाने आपली पाण्याची बाटली ताबडतोब त्याच्या तोंडाजवळ नेलीही, पण तेवढ्यात दुसऱ्या जखमी माणसाने क्षीण आवाजात म्हटलं —” पाणी —”. लगेच पहिल्या जखमी माणसाने आपलं तोंड दुसरीकडे वळवत, खुणेनेच त्या दुसऱ्या जखमीला पाणी देण्यास सांगितलं. पांथस्थ त्या दुसऱ्या जखमी माणसाकडे वळतच होता, तेवढ्यात तिसऱ्या जखमी माणसाने पाणी मागितलं. आणि दुसऱ्या जखमीने स्वतः पाणी न पिता त्याला तिसऱ्या जखमी माणसाला पाणी देण्यास पाठवलं. आणि हाच प्रकार पुढे चालू राहिला. एकाला पाणी द्यायला हात पुढे केला की तो पुढच्या जखमी माणसाकडे बोट दाखवत मान वळवत होता. असं होता होता तो पांथस्थ अगदी शेवटच्या टोकाला पडलेल्या जखमी माणसाजवळ पोहोचला. त्याची अवस्था तर अशी होती की त्याला जर अगदी लगेच पाणी मिळालं नसतं, तर त्याचा जीवच गेला असता. पांथस्थाने त्याला जेमतेम दोन घोट पाणी पाजलं असेल- त्याने घाईघाईने त्याच्या अलीकडच्या जखमीकडे जायची खूण केली. अशा प्रकारे सगळ्यांना घोट घोट पाणी पाजत पांथस्थ पुन्हा पहिल्या जखमी माणसापर्यंत आला. घोटभर पाणी पाजल्यावर त्याला जरा हुशारी आली. त्या सगळ्याच जखमी माणसांनी एक-दुसऱ्याबद्दल दाखवलेली ती आश्चर्यकारक आपुलकी पाहून तो पांथस्थ एव्हाना पार चक्रावून गेला होता. त्याला आता त्या सगळ्याबद्दलच प्रचंड कुतूहल वाटायला लागलं होतं. म्हणून नुकतंच जो पाणी प्यायला होता त्या जखमी माणसाला त्याने न राहवून विचारलं — “ तुम्ही सगळे कोण आहात ? आणि तुमची ही अशी अवस्था कशी झाली आहे ? “
––” आम्ही सगळे या जवळच्या गावातच राहणारे आहोत. “
—-” पण तुम्हाला असं इतकं घायाळ कुणी केलंय ?”
—-” आम्ही सगळे आपापसातच भांडलो आहोत. आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एकमेकांना बेदम मारलं आहे. “
—-” पण आत्ताच मी जे काही पाहिलं, त्यावरून तर एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते आहे की तुमचं सगळ्यांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे – मग ही अशी मारामारी कशासाठी ?”
—-” आम्ही जेव्हा असे भांडतो, मारामारी करतो, तेव्हा आपसातलं प्रेम, आपलेपणा, नातीगोती, माणुसकी, हे सगळं आपोआपच विसरून जातो. कारण ज्या गोष्टीसाठी आम्ही भांडतो ती गोष्टच अशी आहे जी आम्हाला एकमेकांच्या जीवावर उठणारे शत्रू बनवते. “
—-” म्हणजे ? अशी गोष्ट तरी कोणती आहे ती – जरा मलाही कळू दे की .”
—-” ती एक सुंदरी आहे. आता गावात पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत, आणि हे अगदी पक्कं ठरलेलं आहे की त्या निवडणुकीत जो जिंकेल, त्यालाच ती सुंदरी वरमाला घालेल .”
—-” हो का ? पण स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसांना राक्षस बनवणाऱ्या या सुंदरीचं काहीतरी नाव असेल ना–”
—-” आहे ना–’ सत्ता-सुंदरी ‘ म्हणतात तिला. “
————पाणी पिऊन झाल्यावर काही जखमी माणसं कशीतरी उठून बसली होती. काही जण उठण्याचा किंवा उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. पांथस्थाशी बोलत असलेल्या त्या जखमी माणसाचं इतर जखमी माणसांच्या त्या हालचालींकडे लक्ष जाताच स्वतःही उठण्याचा प्रयत्न करताकरता त्याने आधी आपली काठी हातात नीट धरली.
मूळ हिंदी कथा – ‘सुंदरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈