? जीवनरंग ❤️

☆ खिचडी… सुश्री नीता नामजोशी… ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

समोरच्या पातेल्यातली खिचडी आपल्या पानात वाढून घेत ती खात बसलेल्या आपल्या सासूकडे ती चकित नजरेनं पहात होती..

नवं नवंच लग्न झालं होतं तिचं..

अगदी आयत्या वेळी नवऱ्याचा नि तिचा बाहेर जेवायला जायचा प्लॅन ठरला.. 

नवरा म्हणाला “ आईबाबांसाठी खिचडी बनवून ठेव..”

तशी तिनं नवथर उत्साहानं तिला बऱ्यापैकी जमणारी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली..

आणि ती निघायच्या तयारीला लागली…

सासूचा निरोप घ्यायला ती स्वयंपाकघरात आली आणि पहाते तर..

सासू  एकटीच शांतपणे खिचडी खात बसलेली..हे दृष्य तिच्या सरावाचं नव्हतं..

आजवर कधी तिची आई तिच्या बाबांच्याआधी अशी एकटीच जेवली नव्हती..

ती एकटक पहात असताना नवऱ्याच्या हाकेनं तिची तंद्री भंग झाली..

ती सासूचा धावता निरोप घेऊन बाहेर पडली..

नवऱ्यासोबत रेस्टॅारंटमध्ये जेवतानाही तिच्या नजरेसमोर सतत  खिचडी खाणारी सासूच येत राहिली..

एका क्षणी न राहवून तिनं नवऱ्यापाशी मन मोकळं केलं.. ते ऐकताना तो तिच्याकडेच विचित्र अविश्वासाच्या नजरेनं पहात राहिला.. बोलला मात्र काहीच नाही..

एव्हाना तिला अंदाज आला होता -सासू नि नवरा मनमोकळं बोलणारे नाहीत..

माहेरच्या मोकळ्या ढाकळ्या दंगामस्तीच्या वातावरणात वाढलेली ती..

या घरात सदासर्वकाळ नांदणारी शांतता तिच्या अंगावर यायची…. ही माणसं मनातलं भडाभडा बोलून मोकळी का होत नाहीत..? न बोलताच एकमेकांच्या मनातलं कसं कळतं यांना..? दोन चार शब्दांची देवाणधेवाण कशी पुरते यांना ?—- हा प्रश्न तिला नेहमी पडायचा..

या संदर्भात बोलताना नवरा कधीतरी बोलून गेला -” अगं तुलाही जमेल.. फार काही न बोलता मनातलं समजून घ्यायला तूही शिकशील ..सूर जुळले की मनांचा सहज संवाद सुरू होतो..”

तिला मात्र ते काही केल्या जमत नव्हतं…. जमत नव्हतं म्हणण्यापेक्षा ते हजमच होत नव्हतं…

सासूचा तर अंदाजच येत नव्हता..

तिला आई म्हणणं जीवावर यायचं…. आतून त्या भावना आल्याशिवाय आई म्हणण्याचा दुटप्पीपणा तिला जमला नसता..

कसं कोण जाणे पण सासूला ते कळलं ..तिनंच तिला सांगितलं, “  तू आपली सासूबाईच म्हण हो मला.. “

आणि तिला हुश्श झालं.. 

नेमकी आपली सासू कशी आहे हे तिला कळत नव्हतं.. आजवर तिचा स्वर उंचावल्याचंही तिनं पाहिलं नाही..

की भावनांचं प्रदर्शन नाही .. कायम शांत संयत नि सौम्य ..

पण आजचं तिचं असं खिचडी खाणं मात्र सासूच्या मनातल्या प्रतिमेशी विसंगत असं वाटलं…

दोघं घरी परतले तेव्हा सासरेबुवा मजेनं तिला म्हणाले–”  बरं का सूनबाई.. आज तुमच्या सासूनं हद्दच केली ..तुम्ही केलेली खिचडी तिला इतकी आवडली की तिनं एकटीनं ती सफाचट केली.. आमच्यासाठी वेगळी बनवून दिली .. आता पुन्हा आमच्यासाठी खिचडी बनवा एकदा “ .. ते ऐकून ती अवाकच झाली…हे कसलं वागणं… ? 

रात्री झोपेतही तिला तेच आठवत राहिलं.. 

अचानक तिला मध्येच जाग आली..पहाते तर काय..नवरा शेजारी नाही..

त्याला पहायला ती बाहेर ड्रॅाइंग रूममध्ये आली…

रात्रीच्या शांततेत सासू नि नवऱ्याचं हलक्या स्वरातलं बोलणंही तिला स्पष्ट ऐकू येत होतं..

सासू नवऱ्याला सांगत होती– “ अरे खिचडी जरा खारट झाली होती.. तुला माहितेय यांना बीपीचा त्रास आहे.. जराही मीठ जास्त झालं की यांची चिडचिड होते.. बोलण्यातलं भान सुटतं.. यांच्याकडून सूनबाईला जरासं काही बोललं गेलं असतं तर ते मला आवडलं नसतं .. अरे आपलं माहेर सोडून आलेय ती..त्यात तिचा स्वभाव आहे हळवा.. आपणच जपायचं, तिला सांभाळून घ्यायचं….” 

 त्यावर नवरा म्हणाला “ अगं मग टाकून द्यायची खिचडी.. तू कशाला खात बसलीस ती.. ?” 

 सासू- “ अरे बाबा खाऊन माजावं पण टाकून माजू नये या संस्कारात वाढलीय मी.. अन्नाचा अपमान करवेना..म्हणून खाल्ली हो…. यांच्यासाठी दुसरी बनवली..” 

 नवरा- “ अगं पण मग फ्रिजमध्ये ठेवायची ..” 

 सासू -” ते यांच्या नजरेतून थोडंच सुटणार होतं.. किती बारीक लक्ष असतं यांचं तुला ठाऊकच आहे .. “

नवरा -” अगं पण तुला त्रास होतोय त्याचं काय… ?”

 सासू- “ घेतलीय मी पाचक गोळी .. बरं वाटेल हो मला.. आता तू जाऊन झोप बरं. आणि हो.. झाल्या प्रसंगाचा चुकून उल्लेखही करायचा नाहीये .. “ 

नवरा- “ हो…” 

आणि आता तिला त्या जागी उभं रहावेना.. ती तशीच बाहेर येऊन सासूच्या मांडीवर डोकं ठेऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागली… सासू तिच्या डोक्यावर थोपटत राहिली.. 

दुसऱ्या  दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे किचनमध्ये आली ती.. गॅसपाशी उभी सासू चहा करत होती.. तिला पाहून प्रसन्न हसत म्हणाली- ”  बाळा जरा हा चहा नेऊन देतेस बाहेर .. “ 

आणि तिच्या तोंडून “ हो आई “ असं कधी निघून गेलं .. तिचं तिलाही कळलं नाही.. ती चहा घेऊन वळली.. सासू पाठमोऱ्या  तिच्याकडे त्याच शांत सौम्य समाधानी नजरेनं पहात होती.

लेखिका : सुश्री नीता नामजोशी

प्रस्तुती :  सुश्री स्नेहा वाघ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments