सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा एका राणीची – भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
आपल्या देशात प्राचीन काळापासून राजघराण्यातील खूप शूर स्त्रियांनी राज्याचे रक्षण करण्यासाठी शत्रूंना परास्त केल्याचा इतिहास आपण वाचतो .पण झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा कित्तूरची राणी चन्नम्मा यापेक्षा जास्त नावे आपल्या लक्षात राहत नाहीत. तर कुणाकुणाचे आपण नावही ऐकलेले नसते. अशीच एक अनभिज्ञ राणी,जिने पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाचे नियम मोडून आपल्या पोलादी पंजाने शत्रूला नामोहरम करून पन्नास वर्षे राज्य केले. त्या काश्मीरच्या-राणी दिद्दाचे हे चरित्र.
उत्तर भारतात (आजचे हरियाणा, पूर्ण पंजाब, राजौरी, पुंछ या भागावर) तेव्हा लोहार वंशाचे राज्य होते .लोहार समाज त्या काळी खूप प्रतिष्ठीत होता. युद्धासाठी जरुरी असलेली शस्त्रास्त्रे आणि शेतीची अवजारे बनवणे हे त्यांचे काम असायचे. एका शहराचे लाहोर हे नाव सुद्धा ‘लुहार’ या शब्दावरूनच पडले होते.
ईसवी सन 958 मध्ये लोहार वंशात एक अतिशय सुंदर कन्यारत्नाचा जन्म झाला. पण राजा सिंहराज व राणीने आनंदोत्सव साजरा केला नाही. कारण ती दुर्दैवी बालिका जन्मताच एका पायाने अपंग होती.निष्ठुर आई-वडिलांनी तिचा त्याग केला. तिला कायमचेच एका दाईच्या सुपूर्द करून टाकले.त्या प्रेमळ दाई मॉंच्या दुधावरच ती सुंदर चिमुरडी मोठी झाली. दाईमॉंने तिला राजकन्येसारखे वाढवले. तिच्या योग्य शिक्षणाची व्यवस्था केली आणि छोटीशी द़द्दा पण आपल्या अपंगत्वाला अडथळा न मानता युद्ध कलेत पारंगत झाली. खेळामध्ये प्रवीण झाली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याचा तिने अभ्यास केला. या सगळ्यात व्यस्त असलेल्या तिचे वय वाढत चालले होते. त्या काळात, साधारण हजार वर्षांपूर्वी सव्हिस वर्षाची अपंग कुंवारी मुलगी… म्हणजे ती वाया गेलेलीच असणार तिचे नाव उच्चारणे पण महापाप आहे,असा समज सर्वत्र होता.
पण दैवाच्या योजना माणसांना थोड्याच माहीत असतात!
एके दिवशी शिकारीच्या दरम्यान काश्मीरचा राजा क्षेमगुप्त याच्या ती दृष्टीस पडली आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच तो सौंदर्यवती दिद्दाच्या प्रेमात पडला. ती लंगडी आहे हे माहीत झाले असूनही क्षेमगुप्ताने तिच्याशी विवाह केला.
दिद्दाचे भाग्य चक्रच पालटले. आता ती एका मोठ्या राजघराण्याची…. ज्यांच्या राज्याची सीमा इराणपर्यंत पसरली होती…. कुलवधू झाली होती. तिचे सुखी आयुष्य सुरू झाले. तिला पतीचे प्रेम व आदर आणि अभिमन्यूच्या रुपाने सुंदर पुत्र ही लाभला.क्षेमगुप्ताला राजकारणात विशेष रुची नव्हती. त्याने दिद्दाची बुद्धिमत्ता व व्यवहार कुशलता पहिली आणि राज्यकारभारात लक्ष घालण्याची तिला प्रेरणा दिली. नंतर तर तिच्या कर्तृत्वावर प्रसन्न होऊन तिचा सन्मान करण्यासाठी सुवर्णमुद्रा पण त्याने काढली .आपल्या पत्नीच्या नावाने ओळखला जाणारा तो पहिलाच राजा म्हणावा लागेल.कारण तो नंतर राजा दिद्दाक्षेमगुप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.
चतुर, चाणाक्ष पराक्रमी दिद्दाने कित्येकदा आक्रमण करून आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केले. बहुतेक जगात प्रथमच तिने ‘कमांडो’ सैन्याचा विकास केला.तसेच युद्ध जिंकण्यासाठी गोरिल्ला युद्ध (गनिमी कावा) तंत्राचा वापर केला.
क्रमशः…
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈