सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा एका राणीची – भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(जगात बहुतेक प्रथमच कमांडो सैन्य आणि गोरिल्ला युद्धतंत्राचा वापर दिद्दाने केला होता.)आता यापुढे…..
या युद्धतंत्राचा जोरावरच एकदा राणीने शत्रूच्या पस्तीस हजार सैन्याच्या तुकडी बरोबर फक्त पाचशे सैनिकांच्या मदतीने पाऊण तासातच एक युद्ध जिंकले होते.
पण स्त्री जातीच्या दुर्दैवाचा तिलाही सामना करावा लागला. तिचे शत्रूंनी ‘चुडैल राणी'(चेटकीण राणी) असे नामाभिधान केले. कारण युद्धशास्त्रातील कौशल्याबरोबरच बुद्धिमत्ता, आत्मविश्वास ,इच्छाशक्ती यांच्या बळावर तिने आक्रमणकारी मोठ्या राजा ,महाराजांना रणांगणावर धूळ चारली होती. एका स्त्रीकडून पराभूत झालेल्या राजांनी हारल्यामुळे गेलेली आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तिला चुडैल राणी म्हणायला सुरुवात केली. तिच्या अपंगत्वामुळे तिला खिजवण्यासाठी लंगडी राणी हा खिताब तर तिला त्यांनी आधीपासूनच दिलेला होता.
तिचा सर्वात मोठा पराक्रम त्या वेळी दिसून आला जेव्हा… सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या आणि कित्येक शहरे उध्वस्त करणार्या…खूंखार मोहम्मद गजनीला तिने फक्त एकदा नाही तर दोनदा आपल्या रणनीती-सामर्थ्याने भारतात काश्मीर मार्गे प्रवेश करण्यास रोखले. त्याला पराभूत पण केले. नंतर त्याने मार्ग बदलून गुजरात मार्गे भारतात प्रवेश केला.
इतके ‘असामान्यत्व’ सत्तेवर असल्यावर त्या व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच अधिक असतात. राणी दिद्दा पण याला अपवाद नव्हती. दरबारातले… एक सेनापती सोडला तर… सगळेच मंत्रीगण,सरदार तिला पाण्यात पाहत असत. अंतःपुरात इतर राण्या, त्यांचे नातेवाईक तिचा काटा काढण्याच्या तयारीतच असत.
अशातच एके दिवशी शिकारी दरम्यान राजा क्षेम गुप्ताचा मृत्यू झाला. तेव्हा तिला सती जाण्यासाठी तिच्यावर सगळीकडूनच खूप दबाव आणला गेला. पण मरणासन्न झालेल्या राजाला,राज्य सुरक्षित हातात सोपविण्याच्या तिने दिलेल्या वचनाने तिला मनोबल दिले. तिने सती जाण्यास साफ नकार दिला. कारण तिचा पुत्र अभिमन्यु लहान होता. त्याला राज्यकारभाराचे शिक्षण देण्याची जबाबदारी तिच्यावर होती.
हे सहन न झालेल्या अनेक सरदारांनी वेळोवेळी तिच्या विरोधामध्ये अनेकदा बंडे पुकारली. पण दिद्दाने तिला सिंहासनावरून हटवण्याचे सर्व प्रयत्न क्रूरपणे हाणून पाडले. त्यामुळे क्रूर- कपटी राणी असे तिला नवे विशेषण मिळाले.
क्रमशः…
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈