सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा एका राणीची – भाग-3 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(एक क्रूर कपटी राणी असे नवे विशेषण राणी दिद्दाला मिळाले.)
पण या सगळ्याची पूर्वीपासूनच तिने पर्वा केलेली नव्हती.याउलट अभिमन्यूला गादीवर बसून तिने राज्यकारभार सांभाळला. ती अतिशय उत्तम, कुशल राज्यकर्ती होती.तिच्या अधिपत्याखाली तिचे राज्य अधिक समृद्ध आणि बलशाली बनले होते.तिने पूर्ण आशिया खंडात व्यापारी संबंध जोडले आणि इराण पर्यंत पसरलेल्या अखंड भारताच्या वायव्य सीमेचेरक्षण करण्याची रणनीती पण तयार केली. तिने अतिशय सुंदर आणि भव्य अशा चौसष्ट मंदिरांचे निर्माण कार्य केले. श्रीनगर जवळ बांधलेले एक शिवमंदिर …ते आता ध्वस्त झालेले आहे… पण त्या परिसराला आजही दिद्दामार म्हणून ओळखले जाते.सगळ्या प्रजेचे सहकार्य तिला लाभले.
हे सगळे चांगलेच चालू होते .पण तिच्या वैयक्तिक जीवनात तिला अनेक आघात झेलावे लागले. 972 मध्ये तिच्या पुत्र अभिमन्यु मृत्युमुखी पडला आणि त्यानंतर राज्यावर आलेल्या दुसऱ्या राजपुत्राने तिला राजवाड्यातून बाहेर काढले. दुःखाने कोलमडून जाण्याची तिची मनोवृत्तीच नव्हती .जनतेच्या सहकार्याने ती पुन्हा सत्ता हातात घेऊ शकली आणि नंतर अभिमन्यूच्या अवयस्क मुलाच्या…. नातवाच्या…नावाने तिने राज्य सांभाळले. पण नशिबाने जणू तिला दुःखच द्यायचे ठरवले होते…… तो आणि नंतर पाठोपाठ दोन तीन वर्षातच दुसरा नातू…. ज्यांना ज्यांना ती राजपाट देत होती त्यांचे निधनच होत राहिले. हे दुःख तर होतेच पण या क्रूर कपटी राणीने आपल्या मुलांना आणि नातवंडांना मारुन टाकले, हा तिच्याविरुद्ध दुष्प्रचार पण खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. सर्व तऱ्हेने दाटून आलेल्या दुःखाच्या अंधारातून सावरण्यासाठी जे मनोबल लागते,त्याचे बाळकडू तिच्या जन्मापासूनच तिला मिळाले होते .तिने कशाचीही पर्वा न करता आपल्या पोलादी पंजाने मंत्री, सरदार यांच्यावर वचक ठेवून प्रजेला प्रसन्न ठेवत पन्नास वर्षे राज्य केले. त्याचबरोबर भावी राज्याच्या संरक्षणाचा विचार करून तिने इतक्या मोठ्या राज्याला एक सक्षम राज्यकर्त्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन आपल्या वेगळ्या शैलीने एका वारसाची पण निवड केली. त्याच्या हातात राज्य सोपवून इसवीसन 1003 मध्ये ती मरण पावली.
दिद्दाची जीवन यात्रा …जी नको असलेल्या अपंग मुली पासून सुरू होऊन …पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाचे नियम मोडीत काढून आपले नवे नियम स्थापित करून पन्नास वर्षे भारताच्या वायव्य सीमेचे रक्षण करून चांगले राज्य जनतेला देणाऱ्या एका वीरांगनेची कथा आहे.
खरे सांगायचे तर आजच्या युगात दिद्दाराणीची कहाणी तेव्हा आपल्याला अधिक समर्पक वाटते, जेव्हा बऱ्याच स्त्रिया संघर्षमय प्रवासानंतर केवळ सत्तेत आणि उच्चपदावर विराजमान होत नाहीत तर आपल्या क्षमतेने जगाला आश्चर्य चकीत करतात .
हेच काम एका अनभिज्ञ राणीने हजार वर्षांपूर्वी केले होते.
** समाप्त **
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈