?जीवनरंग ?

☆  अतिथी देवो भव…भाग -1 ☆ मेघःशाम सोनवणे ☆ 

वसुभाई आणि वीणाबेन गुजरातमधील एका शहरात राहतात. आज दोघेही प्रवासाला निघण्याची तयारी करत होते. तीन दिवसांची सुट्टी होती. ते व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांना जास्त सुट्टी घेता येत नव्हती. पण जेव्हा जेव्हा त्यांना दोन-तीन दिवसांचा अवधी मिळतो तेव्हा ते कुठेतरी छोट्या प्रवासाला जाऊन येतात. आज त्यांचा इंदूर-उज्जैनला जाण्याचा विचार होता. 

दोघेही मेडिकल कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते तेव्हा त्यांच्या प्रेमाला अंकुर फुटला आणि त्याचे रुपांतर वृक्षात झाले. दोघांनीही घरच्यांच्या संमतीने विवाह केला. दोन वर्षे झाली, अजून त्यांना मूलबाळ नाही, त्यामुळे प्रवासाचा आनंद लुटत राहतात.

लग्नानंतर दोघांनी स्वतःचे खाजगी रुग्णालय उघडण्याचा निर्णय घेतला, बँकेकडून कर्ज घेतले. वीणाबेन ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’ आहेत आणि वसुभाई ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ आहेत. त्यामुळे दोघांच्याही कौशल्यामुळे हॉस्पिटल चांगलेच चालले होते.

ते प्रवासाला निघाले. आकाशात ढग दाटून आले होते. मध्य प्रदेशची सीमा अजून जवळपास २०० किलोमीटर दूर होती; पाऊस पडायला सुरुवात झाली होती.

मध्य प्रदेशच्या सीमेपासून ४० कि. मी. आधी एक छोटं शहर ओलांडायला वेळ लागला. चिखल आणि खूप वाहतूक असल्याने मोठ्या मुश्किलीने रस्ता पार पडला. मध्य प्रदेशात गेल्यानंतर जेवण करण्याचा त्यांचा विचार होता, पण चहाची वेळ झाली होती.

त्या छोट्या शहरापासून ४-५ कि.मी. पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक छोटेसे घर दिसले, ज्याच्या समोर वेफर्सची पाकिटे टांगलेली होती. त्यांना वाटले ते एखादे हॉटेल असावे.

वसुभाईंनी गाडी तिथेच थांबवली, दुकानात गेले. तिथे कोणीच नव्हते. आवाज दिला. आतून एक स्त्री बाहेर आली. तिने विचारले, ” काय पाहिजे भाऊ? “

वसुभाईंनी वेफर्सची दोन पाकिटे घेतली आणि म्हणाले, ” ताई ! दोन कप चहा करा; जरा लवकर करा, आम्हाला दूर जायचं आहे.”   

वेफरची पाकिटं घेऊन ते गाडीकडे आले; दोघांनी पाकिटातील वेफर्सचा नाश्ता केला. अजून चहा आला नव्हता. दोघेही गाडीतून उतरले आणि दुकानात ठेवलेल्या खुर्च्यांवर येऊन बसले. वसुभाईंनी पुन्हा आवाज दिला. 

थोड्या वेळाने आतून ती बाई आली आणि म्हणाली, ” भाऊ ! अंगणातून तुळशीची पाने आणायला थोडा उशीर झाला; आता चहा उकळतोय.”

थोड्या वेळाने तिने ताटात दोन मळक्या कपात गरमागरम चहा आणला. मळकट कप पाहून वसुभाई लगेच अस्वस्थ झाले आणि काहीतरी बोलणार इतक्यात वीणाबेनने त्यांचा हात धरून इशाऱ्याने त्यांना थांबवले. त्यांनी चहाचे कप उचलले; त्यामधून आले आणि तुळस यांचा सुगंध येत होता. 

दोघांनी चहाचा घोट घेतला. इतका स्वादिष्ट आणि सुवासिक चहा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच प्यायला होता. आता त्यांचा संकोच दूर झाला होता. 

चहा पिऊन झाल्यावर त्यांनी महिलेला विचारले, ” किती पैसे? “

बाई म्हणाल्या, ” वीस रुपये.”

वसुभाईंनी शंभर रुपयांची नोट दिली. ती बाई म्हणाली की ” भाऊ सुट्टे नाहीत , वीस रुपये सुट्टे द्या.”

वसुभाईंनी वीस रुपयांची नोट दिली. महिलेने शंभर रुपयांची नोट परत केली. वसुभाई म्हणाले, ” आम्ही तर वेफर्सची पाकिटेही घेतली आहेत  !”

बाई म्हणाल्या, ” हे पैसे त्याचे आहेत, चहाचे नाही.”

“अहो ! चहाचे पैसे का घेतले नाहीत? “

उत्तर आले, ” आम्ही चहा विकत नाही. हे हॉटेल नाही आहे.”

” मग तुम्ही चहा का केलात? “

” पाहुणे म्हणून घरी आलात ! तूम्ही चहा मागितला. आमच्याकडे दूधही नव्हते. मुलासाठी थोडं दूध ठेवलं होतं, पण तुम्हाला नाही कसं म्हणावं, म्हणून त्या दुधाचा चहा केला.”

“आता मुलाला काय देणार?

“एखाद्या दिवशी जर त्याने दूध प्यायले नाही तर काही बिघडणार नाही. त्याचे वडील आजारी आहेत. ते शहरात जाऊन दूध घेऊन आले असते, पण त्यांना कालपासून खूप ताप आहे. आज ते बरे झाले तर उद्या सकाळी जाऊन दूध घेऊन येतील‌.”

क्रमशः—

(मूळ हिंदी कथा माजी वायुसैनिक श्री. विकास राऊत, पुणे, यांच्या सौजन्याने.) 

मूळ हिंदी लेखक – अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments