सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ दोन अलक, एक लघुतम कथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
अलक-1: विवाह
वधू व्हिडीओ शूटिंग एन्जॉय करत होती. चेहऱ्यावर छान स्माईल आणून वेगवेगळ्या पोजेस देत होती.
पण भटजी मध्येमध्ये डिस्टर्ब करत होते. मग ती तोंड वाकडं करत कसेबसे निधी निभावत होती आणि नंतर पुन्हा हसतमुखाने कॅमेराला सामोरी जात होती.
अलक -2 : मोठी
“आsssजीs”, नातवाच्या हाकेला आपण ‘ओ’ देऊ शकत नाही, त्याला कडेवर घेऊन गोष्टी सांगू शकत नाही, म्हणून बिछान्याला खिळलेल्या वसुमतीच्या डोळयांतून अश्रू ओघळले.
“आजी, आम्ही गेलो होतो ना, तर तिथे छोटा बाबू होता. त्याला बोलायलाच येत नव्हतं.चालायलापण येत नव्हतं. मावशी म्हणाली -बाळ मोठा झाला, की त्याला बोलायला आणि चालायला येणार. आजी, तूपण मोठी झालीस, की तुला बोलायला आणि चालायला येणार.”
लघुतम कथा : अप्रूप
तशी रोज कमल आल्याआल्या भांडी घासायला सुरुवात करते.
आज मात्र ती शांत उभी राहून मला सांगायला लागली, “अहो ताई, त्या पलीकडच्या रस्त्यावर रात्री खून झाला. पोलीस आलेत तिथे. रस्त्यावर खडूने रेषा मारल्यायत. मला म्हणाले,’मॅडम, रस्ता क्रॉस करा आणि त्या बाजूने जा.’ मग मी रस्ता क्रॉस केला आणि असा वळसा घालून आले.”
ती बोलत असतानाच बचू किचनमध्ये आली होती.मग कमलने पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली,”अगं, त्या पलीकडच्या रस्त्यावर खून झाला. पोलिसांनी रस्त्यावर खडूने रेघा काढल्यायत. मला म्हणाले,’मॅडम, रस्ता क्रॉस करा आणि तिकडून जा……’ “
तेवढ्यात ‘हे’ आले. पुन्हा ‘सायेबां’ना सगळा वृत्तांत. मग अनुप आला. त्यालाही तीच स्टोरी.
ती गेल्यावर बचू म्हणाली, “काय रे बाबा तरी!आम्हाला ऐकून ऐकून कंटाळा आला. पण तिचा सांगायचा उत्साह कमी नाही झाला.”
“मुख्य मुद्दा लक्षात आला का तुझ्या?” मी विचारलं.
“इतक्यांदा ऐकल्यावर लक्षात न यायला काय झालं?तिकडे खून झाला. पोलिसांनी हिला रस्ता क्रॉस करून जायला सांगितलं.”
“बघ बचू. नाहीच आलं तुझ्या लक्षात. पोलीस म्हणाला, ‘मॅडम,…..’ आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला कोणीतरी ‘मॅडम’ म्हटलं. मग तिला अप्रूप वाटणारच ना!”
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈