☆ जीवनरंग ☆ बोध कथा – कृतघ्न वाघ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ३. कृतघ्न वाघ

एका अरण्यात एक वाघ रहात होता. अरण्यातील प्राण्यांना मारून तो आपली उपजीविका करीत असे. एकदा त्याने रानातील रेड्याला मारून त्याचे भक्षण केले. तेव्हा रेड्याचे एक हाड वाघाच्या दातात अडकले व चिकटून बसले. त्याने ते काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ! ते हाड काही केल्या निघेना. दातातून पू व रक्त वाहू लागले. तो वेदनेने तळमळू लागला.शेवटी तो वाघ झाडाच्या बुंध्यापाशी जबडा पसरून बसला. हे हाड कसे निघेल? मी जिवंत राहीन की नाही? काय करावे? या विचारांनी वाघ चिंताग्रस्त झाला.

अचानक त्याचे लक्ष झाडावर बसलेल्या कावळ्याकडे गेले. अंधःकारात जणू दीपदर्शनच!  त्याने कावळ्याला आपली व्यथा कथन केली. पुढे तो कावळ्याला म्हणाला, “जर तू माझ्या मुखातून हाड काढून मला जीवदान दिलेस, तर मी तुला दररोज मी शिकार केलेल्या प्राण्याचे मांस तुझ्या अपेक्षेप्रमाणे देईन. माझ्यावर एवढे उपकार कर.” वाघाने वारंवार प्रार्थना केल्याने व त्या पशुश्रेष्ठाचे दुःख पाहून कावळ्याला दया आली. वाघाच्या मुखात प्रवेश करून त्याने ते हाड काढले, व वाघाला वेदनामुक्त केले.

नंतर वचन दिल्याप्रमाणे, ”आता तू मला मांस दे” अशी कावळ्याने वाघाला विनंती केली. तेव्हा, “माझ्या मुखात प्रवेश करून तू मला त्रास दिलास, त्यामुळे मी असंतुष्ट आहे. तू वर माझ्याकडे मांस मागतोस? तू क्षणभरही इथे थांबू नकोस. दूर जा!” असे वाघाने कावळ्याला सुनावले.

तात्पर्य – संकटकाळात ज्याने मदत केली आहे अशा व्यक्तीचे लोकांना सुखकारक काळात विस्मरण होते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shankar N Kulkarni

ऊपकाराची जाणीव ठेवलीच पाहीजे.