सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
एवढ्यात फोनची रिंग वाजली. छे ।. उठून फोन घ्यायचा वैताग आहे. पण पुढारी झाल्यावर आपला हा त्रास वाचेल. मोबाईल मिळेल ना भारीपैकी. शिवाय पि. ए. असेल ना तो फोन घ्यायला. वा वा ! आताचा फोन तरी घेऊ.
” काय ग” ” झोपलीस की काय?फोन घ्यायला किती वेळ ?हे बघ, तुझी बॅग भरून ठेव. तुला आज रात्रीच्या गाडीने दादाकडे जायचंय. माझ्या दादा कडं”. ” काय झाल य ?अगं वहिनी पाय घसरून पडल्या. पाय मोडला त्यांचा. उद्या सकाळी ऑपरेशन करायचं. दादांनी तुला बोलावले मदतीला. संध्याकाळी येताना मी रिझर्वेशन करून येतो. “
झालं. यांनी फोन ठेऊनही दिला.
“अहो मी निवडणूकीचा फॉर्म भरणार कधी? प्रचार करणार कधी?” हे मनातल्या मनातच.
यांच्या फोनमुळे स्वप्नांचे पंख फुटून आकाशात उंच भरारी मारणारी मी , वास्तवाच्या दगडावर दाणकन आपटले. माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. मेरा सुंदर सपना टूट गया ।मेरी जिंदगी मे हार गई ।मला एकदम हिंदीतून दुःख व्हायला लागले.
मी गावाला जाणार म्हणजे दोन महिने तरी येऊ शकणार नाही. कुठली उमेदवारी आणि कुठली इलेक्शन?कुठले मतदान ?कुठले झेंडावंदन आणि लाल दिव्याची गाडी ?
वहिनींना तरी आत्ताच पडायचे होते ?आणि मदतीला मीच आठवले का फक्त ?मी काय रिकामीच.
आता काही मी पुढारी होऊ शकत नाही. देशाचे भवितव्य उज्वल करू शकत नाही. हा देश एका चांगल्या नेतृत्वाला मुकला. देशाच्या अंधकारमय भविष्या मुळे मला रडायला यायला लागले. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंपरेचा मला अभिमान आहे. देशाची मान उंच करण्याची पात्रता माझ्यात आहे. मी जाणीवपूर्वक प्रयत्नही केले. पण देशाची सेवा करण्याचा ऐवजी, जाऊ बाईची सेवा मला करायला लागणार. जरीच्या साड्यां ऐवजी साध्या साड्या मला न्याव्या लागणार. हॉस्पिटल आणि घर हेच माझ्या कार्याचे कार्यक्षेत्र राहणार.
उसासे टाकत मी बॅग भरली. संध्याकाळी तिकीट घेऊन येताना, फुललेल्या चेहऱ्याच्या” सुदाम्या” नेही यांच्या बरोबर ऐंट्री घेतली. आता या चौकडीला आमचे घर मोकळेच ना!” वहिनी, आजही झकास पोहे करा. आता सहा महिने तुम्ही नाहीत म्हणजे आम्हाला चमचमीत पोहे कोण करून देणार?”
“काय? सहा महिने?” यांनी सगळ्यांनी परस्पर ठरवल?
अशातऱ्हेने माझ्या राजकारण प्रवेशाचा पार फज्जा उडाला. पुढारी होण्याचे माझे स्वप्न पुरते धुळीला मिळाले. भारत देश आता महान कधीच होणार नाही. सारे भारतीय एका खंबीर नेतृत्वाला – नेत्याला – नाही नेतिणीला मुकले. !
निवडणुकीला उभे राहून पडायच्या आधीच,पडेल चेहऱ्यानं सुदाम्याचे पोहे करायला मी सज्ज झाले.
समाप्त.
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈