सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ परिवर्तन…भाग -1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
रात्रीची जेवणं आटोपली.
आई -बाबांना त्यांची औषधं दिली.
त्यांचे बिछाने तयार करून ठेवले.
“सूनबाई, थर्मासातलं पाणी संपत आलंय.”
मग उरलेलं पाणी पेल्यात ओतून थर्मास रिकामा केला. पाणी तापवून थर्मास भरला. दूध तापवून दोन मगमध्ये भरून आई – बाबांना नेऊन दिलं.
त्यांच्या खोलीच्या खिडकीचे पडदे ओढून घेतले. पंख्याचा रेग्युलेटर तीनवरून दोनवर फिरवला आणि दार ओढून बाहेर आले.
आता स्वयंपाकघर माझी वाट पाहत होतं. मग जेवणानंतरची आवराआवर करायला घेतली.
तेवढ्यात राणी आली.
“आई, आजी – आजोबा झोपल्यावर मला तुझ्याशी आणि बाबांशी बोलायचंय. तोपर्यंत तूही मोकळी होशील कामातून आणि माझंही हातात घेतलेलं काम आटोपेल.”
काय बोलायचं असेल तिला? तेसुद्धा आजी -आजोबा झोपल्यावर. कोणाच्या प्रेमाबिमात पडलीय की काय? तशीही सत्तावीस वर्षांची आहे. म्हणजे लग्नाचं वय झालंच आहे. आणखी उशीर करून चालणार नाही.
पण आजी – आजोबा झोपल्यावर म्हणजे? दुसऱ्या जातीचा आहे की काय? घरात प्रलय होईल, ऐकल्यावर. दुसरी जात तर सोडाच; पण दुसरी पोटजातही पचणार नाही आई-बाबांना.आणि दुसऱ्या धर्माचा असेल तर? अरे देवा! तुलाच खाली यावं लागेल, रे बाबा!
पण माझी राणी तशी शहाणी, समजूतदार आहे. ती ज्याची निवड करेल, तो मुलगा चांगलाच असणार. सर्व दृष्टींनी. देवा! ह्यांना तो पसंत पडूदे. मग ते आपल्या आई-वडिलांना पटवू शकतील.
“आई, बाबा, तुम्हाला माहीतच आहे, मी घरूनच काम करते.माझे क्लाएन्ट इथे येतात.
आपलं घर तसं लहान आहे. आजोबा आत पूजा करताना जोरजोरात घंटा वाजवतात. अगदी शाळेची घंटा वाजवल्यासारखी. बेडरूममध्ये ते टीव्ही बघत असतात, तेव्हा आवाज एवढा मोठा असतो, की मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आणि जर ते इथे लिव्हिंग रूममध्ये असतील, तर माझ्या क्लाएन्टना असे काही प्रश्न विचारत राहतात, ना. अगदी त्यांची उलटतपासणी घेतात. त्यांना खात्री करून घ्यायची असते, की त्या क्लाएन्टबरोबर काम करणं, माझ्यासाठी सेफ आहे ना. मला अवघडल्यासारखं होतं.क्लाएन्टही वैतागतात.”
तिचे मुद्दे बरोबर होते.पण लग्नाचं सांगताना ही प्रस्तावना कशाला?
” म्हणून मी ऑफिससाठी जागा बघत होते. तर माझी मैत्रीण आहे एक, निशा म्हणून. ती परदेशी जातेय तीन-चार वर्षांकरता. ती तिचं घर भाड्याने देणार आहे. मी भाड्याने घेणार असेन, तर ती डिपॉझिटही घेणार नाही. मी तिथे माझं ऑफिस काढू शकेन. वेगळं ऑफिस असेल, तर मला असिस्टन्टसही नेमता येतील. आणि माझा बिझनेसही वाढवता येईल.”
“कल्पना चांगली आहे तुझी,” हे म्हणाले, “ऑफिस सुसज्ज आणि स्टाफ जास्त असेल, तर क्लाएन्टवरही चांगलं इम्प्रेशन पडेल.”
राणीचं बोलणं ऐकून हे खूश झाले.
माझी मात्र निराशा झाली. ती लग्नाबिग्नाचा विचारच करत नव्हती. जाऊ दे. वेळ येईल, तेव्हाच लग्न होणार. आणि आता ऑफिस काढतेय, म्हटल्यावर बिझनेस चांगला चालेल. एकदा का व्यावसायिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाली, की लग्नाचं बघेलच ती. तिने मागेच कबूल केलंय तसं.
“कुठे आहे हे निशाचं घर?” ह्यांनी विचारलं.
“इथून दहा मिनिटांवर आहे.”
“चल. बरं झालं. दुपारी जेवायला घरी येऊ शकशील.” माझा जीव भांड्यात पडला.
ती काहीच न बोलता माझ्याकडे टक लावून बघत बसली. कदाचित काय बोलायचं, कसं बोलायचं, याची जुळवाजुळव करत असावी मनात.
” हे बघ आई, जर मी त्या पूर्ण घराचं भाडं देणार असेन, तर त्या अख्ख्या घराचा उपयोग केलेला चांगला. “
वा! ही अगदी व्यवहाराचा विचार करायला लागलीय. मला कौतुकच वाटलं तिचं.
“म्हणून…. मी तिथेच राहण्याचा विचार करतेय.”
क्रमश:…
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈