सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ परिवर्तन…भाग – 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(पूर्वार्ध : आपल्याला न विचारता राणीने वेगळं राहायचा निर्णय घेतला, म्हणून आई चिडते आणि म्हणते, ‘उद्या उठून ही म्हणेल – मला लग्नच करायचं नाही.’…….)
“आई, मला लग्नच करायचं नाही, असं मी कधीही म्हटलं नाही. मला फक्त थोडा वेळ हवाय. एवढ्यात लग्नाची घाई करू नकोस. एकत्र कुटुंबात तू कायकाय भोगलंस आणि अजूनही भोगतेयस, ते मी बघितलंय, आई.”
माझी नजर पटकन आई-बाबांच्या खोलीच्या दाराकडे वळली. दार बंद होतं.
“एकत्र सोडाच, पण आमचं दोघांचंच असं छोटं, न्युक्लिअर कुटुंब जरी असलं, तरी मला नवऱ्याशी तडजोड करावी लागणारच, ना. त्याची मतं, त्याच्या आवडीनिवडी, त्याचं जेवणखाण, त्याची राहणी तंतोतंत माझ्यासारखी कशी असणार! वेळ येईल तेव्हा मी त्याच्याशी जुळवून घेईनच. त्यासाठी आवश्यक ती तडजोड करणारच मी. तसं तर, नातं म्हटलं, की तडजोडी आल्याच. पण निदान तोपर्यंत तरी थोडे दिवस मला माझ्या मनासारखं जगायचंय. माझ्या अपेक्षेनुसार,माझ्या इच्छेनुसार जगायचंय. कोणतीही तडजोड न करता, मनाला मुरड न घालता. माझं तुम्हा सर्वांवर – अगदी आजी-आजोबांवरसुद्धा प्रेम आहे. मला तुमच्याविषयी आदर वाटतो. पण मला थोडी स्पेस हवीय. जराशी मोकळीक. तीही काही काळापुरती. प्लीज, मला समजून घ्या.”
राणी मुद्देसूदपणे बोलत होती, पटवून सांगत होती…… माझ्या मनात आलं – हीतर माझीच प्रतिकृती आहे. तिच्यात मला तरुणपणीची ‘मी’ दिसली. माझ्या स्वतःच्याच आयुष्याची भीक मागणारी. पण माझ्या आई -वडिलांनी माझ्या विनवणीला अजिबात भीक घातली नाही.
असं काय जगावेगळं मागितलं होतं मी? थोड्या दिवसांची मोकळीक. बस्स! बी.ए.ची परीक्षा संपली. मानेवरचं अभ्यासाचं जोखड उतरलं होतं. आता थोडे दिवस सकाळी झोप पूर्ण होऊन आपोआप जाग येईपर्यंत झोपायचं, मैत्रिणींबरोबर हिंडा-फिरायचं, नंतर थोडे दिवस नोकरी करायची…. एवढं साधं स्वप्न होतं माझं.
पण आई-बाबांनी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती.
दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम. लगेचच होकार, साखरपुडा. रिझल्ट लागण्यापूर्वीच मी माप ओलांडून या घरात आले. तोवरच्या संस्काराप्रमाणे कामसू, कर्तव्यदक्ष, स्वतःच्या आधी इतरांचा विचार करणारी आदर्श सून झाले. माझी स्वप्नं तर सोडाच, पण माझं अस्तित्वच लोप पावलं. आणि अजूनही तेच चाललंय.
नाही. नाही. माझ्या लाडक्या राणीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. अजिबात नाही. माझ्या आधीच्या पिढीने केलेल्या चुका मी करणार नाही.नव्या काळासोबत येणारे बदल मी स्वीकारीन.
माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती काहीही गैर करणार नाही. शेवटी मुलीची काळजी घेणं, म्हणजे तिला घराच्या अक्षांश-रेखांशात कैद करून ठेवणं नाही. आयुष्याचा सामना करायला तिला सक्षम बनवणं, हेच खरं प्रेम.
तिला तशी गरज वाटत असेल, तर अविवाहित असूनही तिला वेगळं राहू दिलं पाहिजे. इथूनही मी तिची काळजी घेऊ शकतेच की.
“चालेल, राणी. तुझा निर्णय मला पटला. मी तुझ्या पाठीशी उभी आहे, खंबीरपणे.तुझे आजी-आजोबा, इतर नातेवाईक काय म्हणतील, याची तू अजिबात काळजी करू नकोस. मी त्यांना समजावून सांगेन. तरीही नाहीच पटलं त्यांना, तरी तू थांबू नकोस. हे तुझं आयुष्य आहे. आणि तू हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आहेस. मला मान्य आहे तो.”
माझ्यात अचानक झालेलं हे परिवर्तन बघून राणी आणि ह्यांना तर नवल वाटलंच ; पण मलाही सुखद धक्का बसला.
मला वाटतं, सामाजिक परिवर्तनांची सुरुवात अशाच छोट्याछोट्या पायऱ्यांनी होत असावी.
– संपूर्ण –
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈