श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

[आपल्या वार्डातला हिंदूंचा एरिया कुठला, मुस्लिम एरिया कुठला ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार मतदारांना काही ना काही वाटप करायला लागते. ]आता पुढे—-

त्यामध्ये पण मी मास्टर आहे म्हणून तर भाऊ मला मानतात ना. काय काय वेळेला तर भाऊ माझी त्यांचा डावा हात म्हणूनच ओळख करून देतात. अहो डावा हात म्हणजे आमचे भाऊ डावखुरे आहेत म्हणून हो. तुम्ही पण आहे ना… काय पण गैरसमज करून घेता.

 संध्याकाळी सात, आठला भाऊ परत ऑफिसात येतात.  मग तिकडून माघारी घरी जायचा काही टाईम फिक्स नसतो. भाऊ जिथपर्यंत ऑफिसमध्ये असतात तिथपर्यंत एक पंधरा वीस पोरांना ऑफिसमध्ये थांबावेच लागते. सध्या कामाचा लय पसारा वाढलाय पक्ष बांधणी, म्युनिसिपलटीची कामे, नवीन बिल्डिंगचे नकाशे पास करून आणणे, जागेचे व्यवहार, फार्म हाऊसची कामे ….. आणि वेळात वेळ काढून मतदारांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवणे किंवा तसे त्यांना आश्वासन तरी देणे. खायचं काम नाही एवढा मोठा पसारा सांभाळायचा म्हणजे…  हो….तुम्हाला म्हणून सांगतो, भाऊंनी  माझ्या नावावर पण लोणावळ्याला एक फार्म हाऊस घेतला आहे. 

चावी त्यांच्याकडेच असते पण आपल्याला सांगितले आहे कधी पण तुझ्या घरच्यांना घेऊन जा.

 ह्या अशा अनेक कामातून रात्री जरा उशिराच मोकळा होतो. मग  काय जरा माझ्याखातर येणाऱ्या माझ्या मित्रांबरोबर एक बैठक मारून विचारांची देवाण घेवाण करून त्यांच्याबरोबरच  भुर्जीपाव किंवा भाजीपाव खाऊनच रात्री उशिरा घरी जायला लागते. पहिले पहिले अशा अवस्थेत घरी गेल्यावर पिताश्री आणि मातोश्रींची बडबड ऐकायला लागून डोक्याचे दही व्हायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता मी मातोश्रीना दर महिन्याला घरखर्चाला दहा हजार देतो ना– आणि ते फ्लेक्सवर माझे फोटो पण येतात. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी मला आता काय पण बोलत नाय. हो आणि ते गणपती उत्सव, नवरात्री उत्सवला माझ्या आई आणि अण्णांना एखादा दिवस मी पूजेचा मान पण मिळवून देतो. आता आमच्या एरियातले लोक त्यांना माझे आई वडील म्हणून ओळखायला लागले असल्याने  ते पण माझ्यावर खूष असतात, म्हणून तर आता माझ्या लग्नाचा बँड बाजा वाजवायचा आहे असं म्हणतात. 

 आता तुम्हीच सांगा, एवढे सगळे मी करून वर त्यो मुलीचा बाप मलाच विचारतो, ” तुम्ही सध्या काय करता? ” आंधळा मेला तो— ‘ अरे डोळे उघडे ठेऊन आला असतास तर चौकाचौकात जे भाऊंचे बॅनर आणि होर्डिंग लागले आहेत त्यात खाली माझ्या नावासकट फोटो दिसले असते. अरे थांब जरा आता तीन महिन्यातच मुनिसिपाल्टीचे इलेक्शन आहे. भाऊ मला तीन वर्षांपूर्वीच बोलले आहेत मला ते नगरसेवक बनवणार आहेत. एकदा का नगरसेवक बनलो की बघ कसा चमकतो ते. मग टप्याटप्याने नाही तर टक्याटक्याने इज्जत कमवणार आणि मोठा होणार.’ सगळे सेटिंग झाले आहे पण एकच प्रॉब्लेम झाला आहे …….

 कालच डिक्लेअर झाले… आमचा वॉर्ड हा लेडीज वॉर्ड डिक्लेर झाला आणि भाऊंची बायको म्हणजेच आमच्या वैनीसाहेबांना भाऊंनी  तिकीट मिळवून दिले. हां, पण भाऊंनी मला शब्द दिलाय पुढच्या वेळेला मलाच तिकीट द्यायचे.

चला आता इलेक्शनचे लय काम असणार आहे. तुमच्याशी बोलायला पण वेळ मिळणार नाही. वैनीसाहेबांना निवडून आणायचे आहे, त्यासाठी मरेस्तोवर काम करायचे आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, वैनीसाहेबांना निवडून आणले की भाऊंनी मला एक इनोव्हा कार द्यायचा शब्द दिला आहे. एक मात्र नक्की, फ्युचर आपले लय ब्राइट आहे.

एवढा मी बिझी माणूस आणि त्यो मेला मुलीचा बाप मलाच विचारतो, “तुम्ही सध्या काय करता ? “

— समाप्त — 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments