श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ प्रारंभ – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆
लग्नानंतर सासरी गेलेली रंजना पाच दिवसांनी माहेरी आली तेव्हा तिचे कोण कोडकौतुक होत होते. शेजारणी-पाजारणी आवर्जून चौकशी करायला यायच्या, कुणी चहाला बोलवत होते, कुणी नाश्त्याला तर कुणी काही खास केलंय म्हणून जेवायलाच. तिची विचारपूस करताना, गप्पांमध्ये तिच्या सासरचा विषय हमखास निघायचा. सासरची माणसे स्वभावाने कशी आहेत याची चौकशी व्हायची. समवयस्क मैत्रिणी ‘दाजीं ‘बद्दल खोदून खोदून विचारायच्या, चेष्टा करायच्या. पोरगी सुखात आहे असे जाणवून गल्लीतल्या म्हाताऱ्या-कोताऱ्या मनोमन सुखावायच्या. एखादी म्हातारी कानाजवळ बोटं मोडून दृष्टही काढायची. आठ-दहा दिवस म्हणजे मायेचा नुसता महापूर आलेला होता. रंजना, तिच्या घरचे मनोमन सुखावत होते.
रंजनाला सासरी घेऊन जायला रीवाजानुसार तिचा नवरा- दीर असे कुणीतरी सासरचे येणार होते पण ती येऊन पंधरवडा उलटून गेला तरीही तिला न्यायला कुणीही आले नाही की त्यांचा काही निरोपही आला नाही. मग मात्र घरातील वातावरण हळूहळू गंभीर होत गेले. आई- वडील काहीसे काळजीत पडले. आई लेकीला खोदून खोदून ‘ सासरी काही झाले होते काय ? तुझ्याकडून काही चूक झालीय काय ? तू कुणाला काही बोलली तर नाहीस ना ? ‘ असे विचारायला लागली. लेकीच्या काळजीने आई-बाबांचे मन थाऱ्यावर राहिले नव्हते. मनात नाना शंका-कुशंकांनी नुसते थैमान घातले होते. मनात काही आले की लगेच रंजनाला विचारले जात होते पण ती तरी काय सांगणार होती? जेमतेम काही दिवसच ती सासरी राहिलेली. ते सगळे दिवसही पाहुण्या-रावळ्यांच्यात, भेटायला, नव्या सुनेला पाहायला घरी येणाऱ्या शेजारी-पाजाऱ्यांच्या येण्या-जाण्यात, गडबडीत आणि नवखेपणातच सरलेले. अजून घरादाराची, घरातल्या माणसांची म्हणावी अशी ओळखही रंजनाला झाली नव्हती. एखादे स्वप्न असावे तसे ते दिवस. विचारांनी, काळजीने आणि अशाश्वताने काळोखून गेलेल्या उत्साहाच्या, उल्हासाच्या त्या दिवसांच्या मोजक्याच आठवणींपलीकडे सांगण्यासारखे असे रंजनाकडे काही नव्हतेच.
रंजनाच्या वडीलांनी तिच्या सासरी सांगावा धाडूनही तिकडून काहीच उत्तर आले नाही तसे सगळेच अस्वस्थ झाले. रंजना उदास राहू लागली, दुःखी,कष्टी राहू लागली. तीच नव्हे तर सारे घरच माणसांपासून, गल्लीपासून काहीसे तुटून राहू लागले होते. नेमकं काय झालंय ते कुणालाच समजेना. रंजनाला वारंवार विचारूनही तिच्याकडून काही कळेना. ती तर काय सांगणार होती ? ‘ दहाबारा दिवसांनी न्यायला येतो ‘ असे तिचा नवरा अगदी आनंदात तिला म्हणाला होता. तिच्या सासरच्या सगळ्यांनी आपलेपणाने ‘लवकर ये ‘म्हणून निरोप दिलेला. ‘तिकडे करमेल ना ग वहिनी ? की….’ असं म्हणत नणंद आणि नणंदेच्या मैत्रिणींनी येताना चेष्टा केलेली होती.
सासरी सांगावा पाठवूनही काहीही उत्तर आले नाही तसे वडील आणि सारे घरच काळजीत पडले. चिंतामग्न आई-वडिलांच्यात चर्चा झाली. सासरच्यांसाठी सारे रितीप्रमाणे भेट वस्तू घेऊन, दुरड्या घेऊन एकेदिवशी तिला सासरी पोहोचवायला म्हणून तिचे वडील स्वतः तिला घेऊन तिच्या सासरी गेले आणि त्याच रात्री तिला घेऊन परतही आले होते. तेंव्हापासून रंजना आणि तिचे वडीलही अबोल होऊन गेले होते. ती आपल्याच विचारात माडीवर रडत बसलेली असायची. ‘आपले काय चुकले ? ‘ हे विचार करकरूनही तिला समजत नव्हते, स्वतःची चूक तिच्या ध्यानी येत नव्हती. सारे घरच दुःखी-कष्टी झालेले होते.
दिवस पुढे सरकत होते तसं घरातले वातावरण वरवर निवळत गेले पण तरीही घरात काहीशी अस्वस्थता, अशांतता होतीच. वडील काहीसे अबोल होत गेले होते. आई मात्र तिच्यावर चिडलेलीच होती. खरे तर जे घडले त्यात रंजनाची काहीही चूक नाही हे आईलाही कळलं होते पण तरीही आईच्या स्वतःच्या मनातील असहायतेचे परिवर्तन रंजनावरील रागात झाले होते आणि ते कधी आईच्या बोलण्यातून तर कधी तिच्या अबोल वागण्यातून क्षणाक्षणाला व्यक्त होत होते. काही दिवसांपूर्वी लेकीला कुठं ठेऊ आणि कुठं नको ? असे झालेली आई.. पण आता मात्र तिला लेक तिच्या डोळ्यांसमोरही नकोशी झाल्यासारखी वागत होती.
” जे घडले त्यात आपल्या रंजनाची काहीही चूक नाही. तिच्याशी अशी वागू नकोस. “
रंजनाच्या आईचे वागणे बाबांच्या लक्षात आले तेंव्हा त्यानी समजावले होते.
” चूक कुणाचीही असली तरी जग बाईलाच चुकीचं ठरवते. तिची काहीही चूक नसली तरी लोक तिलाच चुकीचं ठरवणार आहेत.. “
” दुसऱ्यांचे काही सांगू नकोस मला.. लोक काय दोन्ही बाजूने बोलतात..”
” अहो, सांगू नकोस म्हणून कसे चालेल.. आपण समाजात राहतो, रहावंच लागते. आणि आपल्या पदरात आणखी एक लेक आहे हे विसरलात काय ? तिचे कसे व्हायचे ?”
“म्हणून संन्याशाला सुळावर चढवणार आहेस का काय ? आणि अंजुच्या लग्नाचा विचार नको करुस. त्याला खूप वेळ आहे अजून. आत्ता रंजूचा, तिच्या मनाचा विचार कर. तिला किती धक्का बसला असेल. तिला कसं सावरायचे याचा विचार कर… “
वडील आतून अस्वस्थ असले तरी तसे दाखवत नव्हते. ते रंजनाशी आवर्जून बोलत होते. तिला सावरायला मदत करत होते. ‘ मी आहे ना.. तू नको काळजी करुस.. फार विचार नको करू .. सारे नीट होईल. ‘ असे बोलून रंजनाला धीर देत होते.. सावरत होते. जास्तीतजास्त वेळ रंजनासोबत थांब स्वतःही थांबत असंत आणि अंजुलाही तिला एकटं न सोडता सोबत थांबायला आणि तिच्याशी इतर विषयावर गप्पा मारायला त्यांनी सांगितले होते.
क्रमशः …
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈