श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ प्रारंभ – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆
रंजना परत सासरी गेली नाही म्हणल्यावर गल्लीतल्या बायकांत दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली होती. रंजना घरातून बाहेर पडली नसली तरी शेजार-पाजारच्या बायकांना ती नांदायला सासरी न जाता माहेरीच असल्याचे ठाऊक झाले होते. नेमके काय झालंय ? नेमकं काय बिनसलंय ? हे कुणालाही ठाऊक नव्हते. ‘ बरे विषय असा नाजूक की, कसे विचारायचे ? कुणी विचारायचे ? विचारपूस करायला गेले तरी पंचाईत आणि न जावं तरी पंचाईत.. अशी अवघड परिस्थिती.. आपलेपणाने विचारायला जावं आणि काहीतरी गैरसमज होऊन, काहीतरी वाटून शेजार दुरावायचा… त्यापेक्षा नकोच विचारायला. कधीतरी ते स्वतः होऊन सांगतीलच त्यावेळी पाहू…’ असा विचार मनात येऊन शेजारीपाजारी गप्प होते.. त्यामुळे नेमके ठाऊक नसले तरी अंदाज करणे, आखाडे बांधणे चालू झाले होते.
उन्हाळ्यातील दुपारची वेळ तशी काहीशी निवांतच असते. रानात पेरणीपर्यंत म्हणावी अशी कामे नव्हती.. दुपारच्या वेळात साल-बेजमीच्या पापड, कुरडया, शेवया केल्या जात होत्या. त्यानिमित्ताने एकमेकीकडे जाणे-येणे असायचे. आज एकीच्या झाल्या की दुसऱ्या दिवशी दुसरीच्या घरी साऱ्या शेजारणी गोळा होत होत्या. गप्पा मारता मारता पाटावरच्या शेवया केल्या जायच्या. यावेळी मात्र शेवया वळता-चाळता विषय निघायचा तो रंजनाचाच.. कुणी काळजीने बोलायचे.. कुणी रंजनाचीच चूक असल्यासारखे कुचेष्टेने. अशा गप्पात पराचा कावळा होत असतो. कुणी काहीतरी बोलायचे, दुसरी एखादी त्यात पदरचे घालून आणखी काहीतरी सांगायची. गप्पांचा विषय कुठेही, कसाही भरकटत गेला तरी शेवटी रंजनापाशीच येऊन थांबायचा आणि दोष मात्र रंजनाच्या माथी थोपला जायचा…
‘काय जरी झाले तरी तिने सासरी जाऊन राहावे.. चार महिने पड खाऊन, पदरात येईल ते सोसून नांदल्याशिवाय नवरा मुठीत येत नाही आणि संसाराची घडीही बसत नाही.’
‘आमचं ह्येनी कायबी झालं का आगुदर दोन तडाखं द्येत हुते… पर प्वार झालं अन गाडं लागलं सुराला.. आता उठा म्हणलं का उठत्याय आन बसा म्हणलं का बसत्यात ..’
कुणी कुणी अनुभवाचे बोल सांगत होते.. आपापसातील गप्पात रंजनाला नवऱ्यानं टाकल्याचा विषय चघळला जात असला तरी कुणीही तिच्याशी बोलायला गेले नव्हते. नेमके काय घडलंय हे ही कुणालाच ठाऊक नव्हते. प्रत्येकजण आपापल्या मनानुसार कयास बांधत होती. माहेरी आलेली रंजना परत सासरी गेली नव्हती.. तिकडचे कुणी तिला न्यायलाही आले नव्हते एवढंच काय ते प्रत्येकीला ठाऊक होते. नाही म्हणलं तरी तसा विषय नाजूक होता आणि त्यामुळे कुणी समक्ष बोलत नव्हतं. रंजनाचे असे काही झाले नसते तर त्यांच्यात दुसऱ्या कुणाचातरी दुसरा कुठला तरी विषय असता. रंजनाबद्दल त्यांना आपलेपणा नव्हता, आपुलकी नव्हती असे नाही पण आपण शेजारी असून, एवढे जवळचे असून आपल्याला त्यांनी काहीच सांगितले नाही हा सल प्रत्येकीच्या मनात होता.
घरातली सकाळची सारी कामे आटपून साऱ्याजणी गोळा झाल्या होत्या. शेवया वळायचे काम चालू झाले होते. ओळीने चार पाट मांडले होते. पाटावरती शेवया करायचे काम चालू होते. चार जणी पाटावर शेवया वळत होत्या तर समोर चारजणी थाटीत, ताटात शेवया चाळण्याचे काम करत होत्या. शेवयाची मालकीण थाट्यातील-ताटातील शेवया वाळवण्यासाठी पसरून, रिकाम्या थाट्या व ताटं आणून देत होती. हात चालू होते तसेच तोंडाची टकळी पण चालू होती. कामाचा कोणताही ताण न घेता, गप्पा मारत, एकमेकींची चेष्टा-मस्करी करत काम चालू होते. मधूनच शेवया वळून वळून हात दुखू लागले की एकमेकींच्या कामात बदलही केला जात होता. शेवया, कुरडया, पापड, सांडगे असे सारे साल-बेजमीचे करून ठेवले की पुन्हा सालभर काही बघायलाच लागायचे नाही.
” व्हय वो आक्कासाब, आत्याबाई कवा याच्या हायती. “
शेवया वळता वळता अचानक एकीला आत्याबाईंची आठवण झाली. आत्याबाईंचे नाव अचानक निघाल्याने एक-दोघीजणी दचकल्या.
” काय की ? भाचीकडं गेल्यात. आत्तापातूर याला पायजे हुत्या. “
” व्हय.. आत्याबाईशिवार शेवया कराय काय मज्जा न्हाय बगा. “
” अवो, त्येंच्यावानी एकसुरी शेवया मशनित्नंबी येत न्हाईत. “
” म्हैना झाला की वो जाऊन त्यास्नी ? “
” म्हैना का दोन म्हैनं झालं, कवा कुटं जात न्हायती.. पर ह्या पावटी गेल्या.”
” पर काय बी म्हणा.. लई खमकी बाई.. त्येंचा लै आधार वाटतो बगा.”
” व्हय. त्येबी खरंच हाय.. पर याला पायजे हुत्या.. त्या असत्या म्हंजी रंजनालाबी बरं पडलं असतं. “
” याला पायजे हुत्या न्हवं. आलीया.. पर त्या रंजनाचे काय म्हणीत हुतीस गं ? “
अचानक दारातून आत येत आत्याबाई म्हणाल्या तशा नाही म्हणलं तरी साऱ्याच गडबडल्या.
” लै दिस ऱ्हायलासा वो ?. “
” व्हय, माजं जाऊंदेल.. त्या रंजीचं काय म्हणीत हुतीस त्ये सांग आगुदर..”
सगळ्या एकदम गप्प झाल्या आणि तिथं असणाऱ्यापैकी वयाने मोठया असणाऱ्या आक्कांनी रंजनाच्या लग्नापासून सारे सांगायला सुरुवात केली.
आत्याबाई शांतपणे ऐकून घेत होत्या. रंजना परत सासरी गेलेली नाही हे वाक्य ऐकून आत्याबाई उठल्या आणि रंजनाच्या घराकडे निघाल्या.
क्रमशः …
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈