श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

आत्याबाईना दारात पाहून रंजनाचे बाबा चमकलेच. त्यांनी दार उघडताच आत्याबाईंनी विचारले,

” रंजना ?”

” वरच्या खोलीत आहे. “

” येकलीच कशापायी वर बसलीय ? खाली बोलवा.”

” यायलाच तयार नाही.”

” थांबा वाईच, मीच आणत्ये “

आत्याबाई वर गेल्या. रंजना एकटीच खोलीत रडत बसली होती.

” कशापाय रडतीस गं ? “

” आत्याबाई ss!”

रंजनाला जास्तच रडू फुटलं.

” समदं ठावं हाय मला.. तू काय चुकी केली हायेस काय ? “

रंजनाने नकारार्थी मान हलवली.

” मग अशी त्वांड दडवून घरात कशापाय बसायचं ? अगं, गुन्हेगार करून सवरूनबी काय न केल्यागत माना वर करून फिरत्यात आन आपुन काय बी न करता असे कशापाय लपायचं गं? चल. उठ. भायेर चल. “

” अहो पण..”

” का ? लोकं काय म्हंतीली याचं भ्या वाटतंय वी ?  आगं, येवडी शिकल्याली हाईस.. आन तुला मी अडान्यानं सांगायचं व्हय ? चल.”

” पण..? “

” आता उठतीस का ? “

आत्याबाईच्या आवाजाला धार आली तशी रंजना उठली. आत्याबाई तिला घेऊन खाली आल्या.

” वैनी, वाईच च्या ठेवा.. समदयास्नीच. आन तू गं.. तू वाईच त्वांड धून ये जा. “

रंजना तोंड धुवायला गेली, रंजनाची आई चहा ठेवायला गेली तसा आत्याबाईंनी मुद्यालाच हात घातला.

” दादा, पावनं काय म्हंत्यात ? “

अचानक आलेल्या या प्रश्नाने रंजनाचे बाबा काहीसे गडबडलेच. ते पाहून आत्याबाईंनी विचारले,

” तुमी गेलावता न्हवं पोरीला घेऊन ? “

” होय. “

” मग ? “

” ते म्हणाले, पोरगा म्हणतोय की त्याला पोरगी पसंतच नाही . खूप समजावले त्याला पण ऐकतच नाही. “

” आत्ता पसंत न्हाय म्हंतुय.. आगुदर त्याच्या डोळ्याला कावीळ झालीवती का डोळं फुटलंवतं त्येंचं.., मुडदा बशिवला त्येचा.. लगीन झाल्याव पोरगी पसंत न्हाय म्हंतुय ती..”

” आत्याबाई, अहो, आपली पोरीची बाजू.. जास्त काही बोलता येत नाही. “

” पोरीची बाजू ? पोरगं काय आबाळात्नं पडत न्हाय ? त्ये बी आईच्या पोटात्नंच येतंय न्हवका ? दादा , तुमी शिकल्याली मान्संबी आसं बोलाय लागल्याव कसं हुयाचं ? “

” काय करता आत्याबाई, समाजातील पद्धतच आहे तशी..”

” अवो, चुकीचं हाय ती बदलायचं का त्येंच्या परमानं आपुनबी चालायचं  ? “

” आत्याबाई, आपली पोरीची पडती बाजू.. “

” दादा, पोरीची बाजू पडतीबी नसती आन नडतीबी नसती.. ही ध्येनात ठेवा..”

” तुमचं सगळे खरे आहे आत्याबाई.. पण नवऱ्याने टाकलेल्या बाईला सरळ जगता येते का समाजात ? पुढचे आयुष्य कुणाच्या आधारावर काढायचे तिने ? “

रंजनाची आई म्हणाली तशा आत्याबाई काहीशा चिडल्याच पण स्वतःला सावरत म्हणाल्या,

” नवऱ्याने टाकलेली ? वैनीसाब, काय बोलतायसा काय ? बाई म्हंजी काय एकांदी वस्तू हाय व्हय, नगं वाटल्याव टाकाय आन पायजे आसंल तवा सांभाळाय ?  आपुन बायकांनीच आसं म्हणल्याव कसं हुयाचं ? वैनी जमाना बदल्याला हाय.. आता पोरी शिकत्यात, पायाव हुभ्याबी राहत्यात.. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कामे करत्यात , पैकं मिळीवत्यात.. तरीबी तसंच ? त्ये काय न्हाय वैनी.. आपुन बायकांनीच ह्ये समदं बदलाय पायजेल. “

तेवढ्यात रंजना आवरून येत असल्याचे दिसले तसे दादा गप्प झाले..

” दादा, चार रोज जाऊदेत.. पुन्यानदा जाऊ.. मी येते संगं… आपली चुकी न्हाय न्हवं…? आज्याबात नमायचंबी न्हाय आन रडायचंबी न्हाय. पार कंडकाच पाडून याचा…”

” अहो पण आत्याबाई..?”

” न्हाय दादा,  दिस बी बदलल्यात आन कायदाबी

.. आपली पोर काय वाटंव पडल्याली न्हाय.. मुडदा काल लगीन करतुय आन आज पोरगी पास न्हाय म्हंतुय…”

” बरं जाऊया, तुम्ही म्हणाल तेंव्हा…”

‘आत्याबाईंच्या समोर भल्याभल्यांचं काही चालत नाही तिथं आपलं काय चालणार ?’ असा विचार मनात येऊन दादांनी होकार दिला. 

आत्याबाई स्वतःशीच हसल्या आणि ‘ चल गं रंजना ..’ म्हणत रंजनाला घेऊन बाहेर पडल्या.

” तू येवडी शिकल्याली असूनबी घरात रडत बसलीस व्हय गं ? “

रंजना काहीच बोलली नाही.

” आगं, आसं गप ऱ्हावून न्हाय भागायचं.. ‘आरं’ ला ‘ का रं ‘ कराय पायजेल. “

” आत्याबाई, आता लग्न झालंय.. आता काय करणार ?”

” आगं, बाईच्या डोईवर चार अक्षदा पडल्या म्हंजी समदं झालं आसं असतं व्हय गं ?  लगीच गोठयातल्या जनावरावानी ती दावणीला न्हाय बांधली जात.. आगं, ती माणूस हाय जनावर न्हवं..  आन परपंचा ह्यो दोगांचा असतो, येकल्या बाईचा न्हवं. “

” अहो पण आत्याबाई, नवरा नांदवत नाही म्हणल्यावर बाईला समाज काय किंमत देतो ? समाजाचे जाऊ दे, तिच्या घरात तिला काय किंमत असते ? “

रंजनाच्या मनातली स्वतःच्या भविष्याची काळजी तिच्या शब्दात आणि चेहऱ्यावर दिसत होती.

” रंजे, कंच्या युगात हायस तू..? तुमच्यासारख्या पोरी आसं बोलाय लागल्याव रागच येतो बग.. आगं, शिकल्या-सवरलेल्या पोरी तुमी.. पर शिकून तुमचा काय बी उपेग न्हाय बघ. “

” अहो पण आत्याबाई.. “

” आमी आडाणी पर तू शिकल्याली हायस न्हवं ? आगं, म्होरं जायचं आसतंय पर  चपलीत खडा आला, नायतर काटा घुसून टोचाय लागला तर कुठंवर सोसत चालायचं गं  ? लगीच टोचत्याला खडा-काटा काढून टाकून पुढं जाण्यातच शानपना असतो. “

” आत्याबाई , लोक काय म्हणतील ? “

” लोक? आगं, ती बोलणारच.. बोलणाऱ्याचं काय त्वांड धरता येतंय वी ? आन तसंबी ती दुतोंडी सापावानी असत्यात.. कसंबी वागलं तरी बोलत्यातच.. दोनी बाजून वाजणाऱ्या डमरुवानी.. बाईच्या जातीला तर लईच सोसायला लागतंय बोलणं.. आगं, सीतामाई सुटली न्हाय त्यातनं ततं आपलं काय गं ? ..  आगं, ही लोकं तर नांदणारनीला पळ म्हंत्यात आन पळणारनीला नांद म्हणीत अस्त्यात.. पर कुणाचं कंचं बोलणं कुठंवर मनाव घ्याचं, आयकायचं ही तर आपल्याच हातात आस्तंय न्हवं ? रंजे, टोचती येसन नाकात ठेवण्यात कसला आलाय गं शानपना ?”

आत्याबाई बोलत होत्या.. त्यांचा शब्द न् शब्द रंजनाला पटत होता..  पण जे मनाला पटते तसे थोडेच वागता येते, जगता येते ?

क्रमशः …

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments