सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ स्थळ…. भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(अनुभव निघून जायचा आणि विषय तिथेच थांबायचा…आता पुढे)
गाडीत दीपा खूप बोलत होती. तिने मला मोबाईल वर, मुलीचा फोटो ही दाखवला. हसरा चेहरा. सरळ नाक. चमकदार डोळे.
” चांगली वाटते ना काकू? शिवाय इंजिनियर आहे. अनुभव सारखीच आयटीमध्ये आहे. तसं कुटुंब साधारणच आहे..वडील बँकेत आहेत. निवृत्तीला दोनेक वर्षे असतील. आई गृहिणी आहे. एक लहान भाऊ आहे. तो शिकतोय. फायनान्स मध्ये असावा घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे पण त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. मुलगी लग्नानंतर आपल्या सगळ्यांशी जुळवून घेणारी, घर आणि करिअर दोन्ही सांभाळणारी असली पाहिजे. मग झालं. मला जाणवत होतं, अनुभवचं ओलांडत चाललेलं वय, त्याचं अविवाहित असणं, मित्रांमध्ये त्याचेच फक्त हे स्टेटस.
आणि आता त्यांने लवकरच चतुर्भुज व्हावं हा एकच विषय दीपाच्या मनावर स्वार करून होता.
मी तिचा हात धरला. म्हटलं,” नको घेऊस इतका ताण. योग यावा लागतो. वेळ यावी लागते.”
” ते तर आहेच हो काकू!”
मग लोकेशन जुनी गाणी लावली. जरा विषय बदलण्याचा प्रयत्न केला. थोडं वातावरण हलकं झालं.
मला काहीतरी आठवलं मी थोडं बिचकतच पण सहज वाटेल अशा शब्दात दीपाला विचारलं,
” काय ग ? त्या गायत्रीचं काय झालं?”
” तिचं गेल्याच वर्षी लग्न झालं. आता ती कॅनडाला असते.”
मध्ये काही क्षण निशब्द, स्तब्ध रेंगाळले.
“मला आवडायची गायत्री. आमच्या घरीनेहमी यायची, फोनवर खूप गप्पा करायची. बारीक-सारीक गोष्टींसाठी ती अनुभवावर अवलंबून असायची. तिच्या सगळ्या समस्यांत अनुभव तिला मदत करायचा. एक दिवस मी अनुभवला विचारलही, तुझ्यात आणि गायत्रीत काही आहे का? म्हणजे असेल तर चालेल आम्हाला. तेव्हा केवड्या मोठ्याने हसला होता तो! माझे खांदे धरून म्हणाला होता,
” तू कठीण आहेस मम्मी! प्रत्येक मुलीत तू तिला माझी जोडीदार बघतेस की काय? आणि गायत्री?… माय गॉड… आम्ही नुसते चांगले मित्र आहोत…”
” काकू या मुलांचं काही कळतच नाही. त्यांना आपल्या चिंता ही समजत नाहीत.”
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈