सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ स्थळ…. भाग – 7 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(शेवटी हा विषय न संपणारा होता.एक अंधारात घेतलेली उडीच होती ती…आता पुढे)
घरी परतायला बराच उशीर झाला. प्रवासानं मन आणि शरीर दोन्ही थकलं होतं. रात्री पटकन डोळा नाही लागला मनात विचारांची उलटसुलट गुंफण होती. रांगोळीचे ठिपके जुळवत… काही पलिकडचे काही जवळचे जुळवत एखादी छान कलाकृती तयार व्हावी, तशी नाती कल्पनेत जुळवण्याचा मी प्रयत्न करत होते. घरी गेल्यावर दीपा कडून सगळा वृत्तान्त समजल्यावर कदाचित अनुभव म्हणेल'” इंटरेस्टिंग! या मुलीला भेटलं पाहिजे. स्वतःचे विचार आहेत तिला! प्रलोभनांना बळी पडणारी वाटत नाही! म्हणजे पैसा, ग्लॅमर यात न गुंतणारी वाटते. स्वतःवर विश्वास असणारी एक समर्थ व्यक्ती !
कदाचित त्यांच्या नंतर भेटी होतील. ते एकमेकांना समजून घेतील. आणि मग त्यांचे जमेल सुद्धा. लग्नाच्या गाठी स्वर्गात जमतात. कुणी सांगावं? कुणाचे भविष्य?
पण असं काहीच घडलं नाही. प्रत्यक्ष जीवनात अशी गिमिक्स अभावानेच.
दिवस खुप उलटले. दीपाचा खूप दिवसात फोन आला नव्हता. मीही माझ्या कामात व्यस्त होते. सोसायटीतली कामं. आमचा वाचक क्लब, मेमरी क्लब, काही स्नेह भेटी. काही व्यावसायिक बांधीलक्या. नातेवाईकांची ऊठबस. जाणे-येणे वगैरे, अनेक. या निवृत्त आयुष्याला छानपणे गुंतवून ठेवणाऱ्या अशा विविध बाबी. बिन महत्त्वाच्या अनेक घटना सहजपणे विस्मरणात गेलेल्या. मागोवा घ्यावा अशा न वाटणाऱ्या ही घटना. थोडक्यात काय काळ उडत राहतो. दिवस ढकलले जातात .
दरम्यान अनुभवचं लग्न जमलं. झालं. दीपा लोकेश दोघेही खुशीत होते. आणि मुख्य म्हणजे अनुभवही आनंदात होता. लग्न छान थाटामाटात झले.सुरेख. देखणा सोहळा. प्रतिष्ठा. हौस, डामडौल जपणारा. त्यातला आनंद दोन्ही कडूनही जाणवत होता.
माझ्या तोंडून सहज उद्गार आले,” चला छान झालं .मार्गी लागलं सगळं.”
आणि एक दिवस.
छान सकाळ होती. गच्चीतली माझी बाग फुलली होती. मोगरा ,जास्वंद आनंदात डोलत होते. हातात गरम चहाचा कप आणि वर्तमान पत्र. पहिल्याच पानावर मोठा फोटो होता. नेहमीप्रमाणे मी हेडलाइन्स वाचत असतानाच माझं लक्ष गेलं. चेहरा, डोळ्यातली चमक, कुठेतरी पाहिल होते. ओळखीचा वाटतोय हा चेहरा.
हिमालयातल्या आठ हजार मीटर उंच असलेल्या शिखरांपैकी एका शिखरावर यशस्वीपणे भारताचा झेंडा हातात घेउन एका गिरी कन्येचे, झळकत असलेले ते छायाचित्र! नाव वाचले आणि पटकन आठवले.
शिवांगी.
पुन्हा पुन्हा बातमी वाचली. एकही शब्द न चुकता. मन अभिमानाने भरून गेलं होतं. तिचा फोन नंबर नव्हता माझ्याकडे. मी लोकेशन ला व्हाट्सअप वर मेसेज पाठवला. त्याचेही लगेच उत्तर आलं.
” सॉरी काकू !कॉन्टॅक्ट डिलीटेड.”
असो! मी मनातल्या मनातच तिचे अभिनंदन केले होते. तिने शिखर पार केले होते. आणि याहून उंच शिखरे तिला पार करायची होती.काय नेमकं वाटत होतं मला तिच्याबद्दल? कोण होती ती माझी? आणि तशी ती माझी कुणी असायलाच हवी होती का? पण तिच्या अस्तित्वात माझाही एक कण होता हे नक्की…
समाप्त
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈