सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ किमया – भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
भाऊबीजेचा दिवस, विभाताई खूपच आनंदात होत्या. मोठ्या मुलीकडं-केतकी कडं आज भाऊबीज साजरी होणार होती. धाकटी तिघं जणं सकाळी- सकाळीच हातात मोठे- मोठे गिफ्ट पॅक आणि बुके घेऊन आली.ते सर्व आईच्या हातात देत उद्गारली,
” हॅपी दिवाळी आई !”.
“आई तुझा फ्रॅक्चर झालेला पाय ठीक झाला ना!..मस्तच… आता गावी गेल्यावर तुझं नेहमीचं बिझी लाईफ सुरू होईल.” केदार म्हणाला.
“आई आता तुला तिकडची आठवण येत असेल नाही?..” कैवल्य म्हणाला. कामिनी सर्वांबरोबर सेल्फी काढू लागली. फोटो सेशन झालं. त्याच बरोबरीनं ओवाळण्याचा कार्यक्रम पार पडला. केदारच्या दोघा मुलांना,उर्मीनं- केतकीच्या मुलीनं- ओवाळलं. दिलखुलास गप्पा,…. चेष्टा मस्करी करत जेवणं झाली. जावई, बच्चे कंपनीला घेऊन बालनाट्य बघायला निघून गेले आणि घर पण एकदम शांत झालं.
बासुंदी पुरीचं यथेच्छ जेवण झालेलं.. विभाताईंना झोप अनावर झाली. खोलीत जाऊन अंथरुणात पडल्या- पडल्याच त्यांना झोपेने घेरलं.
एका डुलकी नंतर त्या जाग्या झाल्या तेव्हा भावा-बहिणींच्या गप्पा त्यांच्या कानावर पडल्या. हळूहळू चढ्या आवाजातला त्यांचा वाद विवाद…. आणि त्यात आपल्या नावाचा उल्लेख ऐकून त्यांची सुस्ती खाडकन् उतरली.
“केदार गेले दहा महिने आई माझ्याकडे आहे .आता डॉक्टरांनी पण परवानगी दिलीय.उद्या एकदा दाखवून येईन. आणखी एखादा महिना फिजिओथेरपिस्ट ची मदत लागेल. ते काम तू तुझ्याकडेही करू शकशील. हो ना?… तर आता तुला तिला तुझ्या घरी घेऊन जायला काही हरकत नाही .”हा केतकीचा आवाज होता.
” काही तरी काय बोलतेस! माझ्या घराला काय तू वृद्धाश्रम समजते आहेस होय?” केदारचे बोलणे ऐकून विभाताईंना एकदम धक्काच बसला. केदार पुढे म्हणत होता,”आधीच रेवती चे आई -बाबा शिवाय बरेचदा तिचे अतिवृद्ध मामा आमच्याकडे रहायला असतात. त्यात या आणखी एका म्हातारीची भर ! तुला माझा थ्री बीएचके फ्लॅट दिसतोय .पण मुलांना पण त्यांची स्पेस द्यायला हवी ना… आईला कसं सगळ्यात अड्जेस्ट करून घेऊ?”
“चोपन्न वर्षाच्या वयात कोणी वृद्ध होतं होय?… पाय फ्रॅक्चर झाला म्हणून ,एरवी आई आपल्या सगळ्यांपेक्षा ॲक्टिव्ह आहे.” केतकी पटवून देण्याचा प्रयत्न करत होती.
“तेच ते, म्हणूनच आपलं काम काढून घेण्यासाठी तू तिला इथे बोलवून घेतलंस आणि आता आपला मतलब पूरा झाला म्हणून तिला माझ्याकडे ढकलते आहेस.” केदार मधला वकील बोलत होता. थोड्या बाचाबाची नंतर कैवल्यचा आवाज ऐकू आला,” माझं पण दादासारखंच उत्तर आहे, असं समज. तू पाहतेच आहेस ना, आमच्या दोघांचा हाय प्रोफाईल जॉब… आम्हीच आमच्या चिमुरड्या वरूणला बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवलेय. आमची लाइफस्टाइल… नॉनव्हेज खाणं.. ड्रिंक्स घेणं… क्लब… पार्ट्या, सगळ्यात ती फिट् होऊच शकत नाही. दादा म्हणतोय तसे, एक -दोन दिवस घर दाखवायला मी पण तिला आमच्या घरी घेऊन जाऊ शकतो… बाकी कितीही पैसे द्यायला मी तयार आहे. आणि”…त्याचं वाक्य मध्येच तोडून केतकी म्हणाली,”ए उगीच पैशाची मिजास दाखवू नको हं! आपणा सर्वांकडे आणि हो आपल्या आईकडे ही पैशाची ददात नाहीए.” केतकीच्या तारसुरातल्या बोलण्या पाठोपाठ समोर चालू असलेल्या प्रसंगाशी विसंगत असं कामिनीचं खिदळणं त्यांना ऐकू आलं. “माझ्याकडे आई? नो चान्स”….ती हसत हसतच म्हणत होती. “मी तर ‘लिव्ह इन’ मधे राहतेय. माझा बॉयफ्रेंड ,आमचं वागणं-बोलणं, इतरही काही…. या ‘ओल्ड स्टफ’ला पटण्यासारखं नाहीय. शिवाय मी म्हणजे ‘अन् वॉन्टेड’…”
“पूरे कर बोलणं! पुढचे तारे तोडू नको”केतकी संतापून म्हणाली. “निष्कर्ष काय?मी तिला बोलवून घेतलं होतं तर आता तिला गावी पाठवण्याची जबाबदारी पण माझीच! इतके वर्षात ती फक्त एकदोनदाच मुंबईत..ती पण माझ्याकडेच… आलीय .असू दे… तुम्हाला आई बद्दल माया ,प्रेम काहीच नाहीए. शिवाय आपलं कर्तव्य पण तुम्ही विसरला आहात. त्यामुळे व्हाय ओनली मी? हे नाही विचारत मी तुम्हाला.”
क्रमशः…
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हृदस्पर्शी कथा!