सुश्री गायत्री हेर्लेकर
जीवनरंग
☆ स्वामिनी मुक्तानंदा – भाग -3 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
आणि स्वामिनी बघतच राहिल्या—
कारण योगीचे आजोबा म्हणजे —-
अविनाश होते.
अनेक वर्षांनंतर पहात होत्या.
खुप थकलेले.
संताप. तिरस्कार. घृणा —मनात प्रकट झालेल्या अनेक भावनांवर त्यांनी संयमाने नियंत्रण मिळवले. आणि कुणाही त्रयस्थाशी बोलण्यास नकार दिला.
पण ते दोघेही जणु चंग बांधुनच आले होते.आणि त्यांच्या नकाराकडे दुर्लक्ष करुन घडाघडा बोलायला सुरवात केली.
आशुतोषचे अमेरिकेला जाणे.
तिथल्याच मुलीशी लग्न. योगीचा जन्म. आशुतोषआणि त्याच्या बायकोचा अपघाती मृत्यु—दरम्यान सुलभाचा मृत्यु. —अवंतिकेची प्रेमात फसल्यामुळे आत्महत्या—
आणि या सगळ्या प्रसंगांत सुलभाचा भाऊ सुधीरची साथ. —-
इतके दिवस जपलेली मनाची झोळी मोकळी केली.
सुधीरने खांद्यावर हात ठेवुन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यातुन वहाणारे पाणी तो थोपवू शकला नाही.
काहीशा अलिप्तपणे स्वामिनी. “मग. आता मला हे सांगण्याचे प्रयोजन?” म्हणुन सुधीरकडे बघितले.
“अविनाशकडे पैशाला कमी नाही किंवा कष्टाला तो घाबरत नाही. योगीसाठी. त्याच्याकडे बघुन मनाची उमेदही इतके दिवस ठेवली होती. पण आता मात्र तो काही दिवसांचाच सोबती आहे.”
सुधीरच्याही डोळ्यातुन पाणी आले.
“अविनाशला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आहे.अवस्था सर्व उपचारांच्या पलिकडे गेली.”आवंढा गिळत तो पुढे. “योगी—त्यांच्या लाडक्या आशुतोषची शेवटची निशाणी सुखरुप रहावी. काळजीपूर्वक जपली जावी हीच त्याची इच्छा. तुमच्याविषयी तुमच्या आशुतोषवरील प्रेमाविषयी ऐकले होते. अविनाश नको म्हणत असतांना मीच त्याला इथे घेऊन आलो. “
मनावर कितीही लिंपण घालुन गुळगुळीत केले असले तरी सर्व ऐकुन स्वामिनींच्या मनाचा पोपडा निघालाच.
जरा शांतपणे सुधीर. “. आपण संन्याशिनी आहात—आपल्याला कशातही गुंतता येणार नाही. हे माहित आहे.
फक्त आपल्या मार्गदर्शनाखाली. देखरेखीखाली तो रहावा. –असे वाटते.”
उत्तराची वाट न पहाता. वंदन करुन ते निघून गेले.
स्वामिनी मुक्तानंदा—संसारातून मुक्त झालेल्या—पण नियतीने एक वेगळेच वळण त्यांच्यापुढे आणले.
डोक्यात विचार. –विचार. –विचार.
आणि डोळ्यापुढे आसवांचा पडदा_
त्यामुळे वळणापुढचा मार्ग दिसत नव्हता. गुरुदेव पण नाहीत मार्ग दाखवायला..
रात्र सरली.
नेहमी प्रमाणे सकाळी. स्नान पुजा आवरुन त्या गुरुदेवांच्या स्मृती कक्षात दर्शनासाठी गेल्या.
गुरुदेवांचा आवडता झोपाळा.
एकदम स्थिर होता. .त्यांच्या मनात आले .हिंदोळण्या स्वभाव असुनही हा स्थिर कसा होतो?मनात लगेच विचार आला. कुणीतरी धक्का देते म्हणुन तो हलतो.. आणि कुणीतरी थांबवले की थांबतो. बरेचवेळा –कालांतराने आपोआपच स्थिर होतो.माणसाच्या मनाचेही तसेच असते.
त्या तिथेच नतमस्तक होऊन बसल्या.डोळे मिटून नित्य ध्यान केले.. ध्यानामुळे स्थिर झालेल्या बुध्दीने. मनाने विचार करुन बाहेर आल्या त्या कसलातरी निश्चय करुन. अगदी शांतपणे.
गंगासागरजींना बोलावून त्यांनी योगी आणि त्याच्या दोन्ही आजोबांना भेटायला बोलावल्याचे सांगितले.
आपल्या निवासस्थानी आल्या तर सुमुखीची स्वच्छता सुरु होती.तिला हाक दिली “सुमुखी”.आज स्वामिनी लवकर आल्या की. आपल्याला उशीर झाला म्हणुन हाक मारली म्हणुन गोंधळून जाऊन. ती बाहेर आली.
“जी. स्वामिनी. आणते हं दुध”.
न्हाऊन माखुन आलेली सुमुखी आज त्यांना जास्तच प्रसन्न वाटली.
“तो योगी आवडतो का ग तुला?नाही त्याच्याशी जरा जास्तच गट्टी झाल्याचे सांगत होते सगळे.”
होय म्हणावे तर “कुणात गुंतायचे नाही” ही. स्वामिनींची शिकवणीचे पालन करत नाही असे होईल. आणि नाही म्हणावे तर खोटे बोलल्यासारखे होईल. ती भांबावली.
स्वामिनींनी ओळखले.
सुमुखी. तुला आता इथे डोंगरावर. त्याच त्या वातावरणात रहायचा कंटाळा आला आहे ना?
अभ्यासात तर तुझे मन रमत नाही.तुझ्यावर नविन. तुझ्या आवडीचे काम सोपवणार आहे. –कुणाची तरी सोबत. म्हणुन आश्रमापासुन जरा दुर रहायचे जबाबदारी देणार आहे तुझ्याकडे.”
सुमुखीच्या तोंडावरचे गोंधळ अजुनच वाढला.
तेवढ्यात योगी त्याच्या दोन आजोबांबरोबर आला.
वाकुन वंदन केल्यावर त्याला ऊठवुन त्याचा हात सुमुखीच्या हातात दिला.
आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या स्वामिनींच्या समाधानी चेहर्याकडे पहाणार्या सुमुखीचे डोळेही समाधानाने भरुन पावले.
नियतीला दाखवुन दिले –कितीही मोहाचे क्षण आले तरी आपण आहोत — मुक्तानंदा
– समाप्त –
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈