सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गंगेत घोडं न्हालं– भाग 3 … (भावानुवाद) – सुश्री सुषमा मुनींद्र ☆ सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिलं- पाहुण्यांची शोधक नजर श्रेष्ठीवर. बायो-डाट्यामुळे खूप काही माहीत आहे.)

श्रेयसच्या कमी शिकलेल्या आईने तूझं नाव काय? वगैरे प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा केला नाही. तिने विचारलं,

एम. बी. ए. कुठल्या कॉलेजमधून केलंस?’

`सिम्बी! सिम्बॉयसिस पुणे.’

जमाना पूर्णपणे बदलला आहे पण संकोच आणि लज्जा हे प्राचीन आणि शाश्वत असे भाव आहेत. तीन शब्द बोलण्यात श्रेष्ठीसारखी दमदार मुलगी घाबरून गेली. श्रेयसकडे शोधक नजरेने पाहत तो आपल्या निकषात फिट बसतो की नाही,  हे बघण्याचं साहस तिला झालं नाही. ती बेता-बेताने, तिरक्या नजरेने श्रेयसकडे पाहत होती. श्रेयस मात्र तिच्याकडे सरळ सरळ थेट पाहत होता. त्याला कोणी निर्लज्ज नाही म्हणणार. पण तिने मात्र धीटपणे त्याच्याकडे पाहीलं तर लोकांना वाटेल, किती धीटपणे याच्याकडे पाहते आहे. मुलगी चालू दिसतीय.’

श्रेयसचे वडील म्हणाले, `तू पुण्यात जॉब करतेयस. श्रेयस दिल्लीत आहे. कसं जमणार?’

श्रेष्ठी म्हणाली, `किती तरी मुली जॉब करतात. मॅनेज होतं.’

`नीति (श्रेयसची वहिनी) नोकरी नाही करत.’ असं म्हणत श्रेयसचे वडील असे हसले की त्यावरून कळत नव्हत की ते तिला नोकरी करू देतील, की नाही?  श्रेष्ठीला वाटलं, म्हणावं, ‘ कदाचित नीति माझ्यासारखी डिझर्विंग नसेल,  कदाचित तिला नोकरी करण्याची इच्छा नसेल,  कदाचित नोकरी मिळू शकली नसेल.’ पण ती काहीच बोलली नाही. मुलगी चालू आहे, असंच वाटेल ना!

जेवण झाल्यावर हर्ष श्रेष्ठीला आणि श्रेयसला गच्चीवर सोडून आला. श्रेयस श्रेष्ठीला काही विचारू इच्छित असेल,  तर विचरावं. कुणालाही पसंत- नापसंत करण्याच्या दृष्टीने बघणं मोठं नाजुक असतं. श्रेयसने आत्तापर्यंत किती तरी मुलींना छेडलय. एका मुलीवर एकतर्फी प्रेम केलं. दोन मुलींच्या बाबतीत ब्रेकअप झाला. तीन मुलींना नाकारलं. दोन मुलींना विचारासाठी वेळ हवा, म्हणून लटकत ठेवलं. यावेळी काहीसा असमंजस होऊन शांत बसलाय. आत्मविश्वसाने परिपूर्ण असलेल्या श्रेष्ठीने रोमिओ टाईप असलेल्या तिच्या इमिजिएट बॉसच्या चुकीच्या इराद्यांना नेस्तनाबूत केलय. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ती दक्षतेने घेते,  पण यावेळी काय करावं, बोलावं, ते न सुचल्यामुळे ती शांत बसलीय. श्रेयस तिच्याकडे निरखून बघतोय,  पण ती त्याच्याकडे मुळीच बघत नाही.

अखेर श्रेयसनेच बोलायला सुरुवात केली. `आपण पुण्यात नोकरी करता. मी दिल्लीत. इतकं दूरवरं अंतर. आपल्या फॅमिली लाईफवर त्याचा परिणाम होणार.

दोघांनी मिळून अ‍ॅजेस्ट केलं, तर नाही परिणाम होणार! मी मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करीन की मला दिल्ली ऑफीसला पाठवा किंवा मग मी जॉब सोडून देईन आणि दिल्लीत दुसर्‍या जॉबसाठी प्रयत्न करेन.’  असं बोलता बोलता श्रेष्ठी निर्णायक नजरेने श्रेयसकडे पाहू लागली.

उंच आहे. देखणा आहे. समोरचे केस गळून पडले आहेत पण त्यामुळे भव्य दिसणारं त्याचं कपाळ तो बुद्धिमान असल्याचं दर्शवतय.

`नोकरी सोडू इच्छित नाहीस?’

`मुलींना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे.’

`मी आपल्याला कसा वाटलो?  पसंत आहे?’

श्रेष्ठीला त्याचा प्रश्न अकस्मिक कमी,  अस्वाभाविक जास्त वाटला. आत्तापर्यंत ज्या ज्या मुलांशी तिचा संबंध आला होता, ते तिला पसंत … किंबहुना नापसंत करण्यासाठी आले होते. हा पहिला आहे, जो स्वत:ला पसंत करण्यासाठी आलाय. श्रेष्ठीला वाटलं थोडी चेष्टा , मस्करी करावी. `आमच्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या कल्पना, कामना थोड्या खालच्या स्तरावर आणल्या आहेत का? म्हणजे स्वत:ला पसंत करवण्याची वेळ आली.’  पण ती तसं काही बोलली नाही. आई म्हणाली होती,  `नम्रतेने बोल. वाग.’  मग ती एवढंच म्हणाली, `प्रथम आपण सांगा.’

श्रेयसने भुवया उंचावल्या. मुलगी विचारसंपन्न आहे. सावधपणे उत्तर देते आहे.

`मी आपल्या स्टाईलने प्रभावित झालोय. पण आपण थोड्या जाड आहात. पुढे आणखीही जाड होऊ शकाल. जाडी जरा कमी करायला हवी.’

श्रेष्ठीच्या लक्षात आलं,  मुलांनी आपल्या अपेक्षा किती का खाली आणलेल्या असेनात,  त्यांच्या अहंकारात फरक पडत नाही. आत्तापर्यंतचे अनुभव, अनुमान तिच्या देहात दबाव टाकू  लागले. अजूनपर्यंत बोलणी पक्की झालेली नव्हती. कारण देण्या-घेण्याबद्दल मुलाकडच्यांच्या दृष्टीने काही जमलं नव्हतं. पण आत्तापर्यंत कोणी मुलाने तिच्या तोंडावर ती जाड असल्याबद्दल सांगितलं नव्हतं. हा मोठा धूर्त,  कावेबाज दिसतोय. सरळ जाड म्हणतोय. मागून काय काय म्हणेल?  याला धडा शिकवायलाच हवा.

 `आपण थोडे टकलू आहात.

 `म्हणजे?’

 `मी एक्सरसाइज आणि डाएट कंट्रोल करून माझी जाडी कमी करीन. आपण केस कुठून आणणार?’

`म्हणजे?’

 श्रेयस चकित. त्याची बोटे अभावितपणे आपल्या डोक्यावरून फिरू लागली. त्याला वाटलं होतं,  ही मुलगी प्रफुल्लित होऊन म्हणेल,  `उद्यापासून व्यायाम सुरू करते. ही केसपतनाची गोष्ट कुठून आली?

 `माझ्यातला उणेपणा दाखवतेस?’

 `आपण पण दाखवलात ना?  आपल्याला सगळं चांगलं हवं,  तसं मलाही सगळ चांगलंच हवं.’

बोलता बोलता श्रेष्ठीला वाटलं, आपला आत्मविश्वास परत आलाय. इकडे श्रेयसला वाटलं,  आपण श्रेष्ठता हरवून हीन झालोय. असल्या तोंडाळ मुलीबरोबर आयुष्य काढणं … नो मॅन. ही मुलगी मूर्ख आहे. अहंकारी आहे. असल्या मुली लाईन मारण्यासाठी ठीक आहेत. विवाहासाठी नाही. त्याचं तोंड उतरलं. पुढे काही विचारण्याचं साहस त्याला झालं नाही. मग म्हणाला,     `खाली लोक आपली वाट पाहत असतील.’

खाली येऊन खोलीत गेल्यावर श्रेष्ठीने पाहीलं, पाहुण्यांना द्यायची पाकीटं अनुराधा उचलू लागलीय. श्रेष्ठीने अनुराधाचा हात धरला,

`आई तू नुकसान करून घेतीयस. बोलणं फायनल झालं नाही. हे सगळं द्यायचं नाही.’

`श्रेष्ठी, प्रभाव चांगला पडेल, म्हणून तर…’

`काही पैसे वगैरे देऊन पाठवून द्या. हे कपडे वगैरे मी नाही देऊ देणार!’

अनुराधाने श्रेष्ठीच्या अस्वाभाविक मुद्रेकडे पाहीलं. पण चौकशी वगैरे करण्याची ही वेळ नव्हती. ती रुपये घातलेली पाकीट घेऊन बैठकीत आली. हरेकृष्णंनी कपड्यांबद्दल नजरेच्या भाषेने विचारले. अनुराधाने गप्प बसण्याची खूण केली.

घरात निराशेचं वातावरण. पुन्हा एकदा अपयश. 

क्रमशः…

मूळ हिंदी कथा –  तुम्हारी भी जय, हमारी भी जय – कथा लेखिका – सुश्री सुषमा मुनींद्र  

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments