जीवनरंग
☆ उंबराचे फुल- संस्कारमूर्ती श्री. एस.बी. पाटील सर भाग – 2 – लेखक – श्री सुभाष मंडले ☆ प्रस्तुती – श्री मेघशाम सोनवणे ☆
(तितक्यात पुन्हा, ‘किरण दरवाजा उघड’, असा बाहेरून आवाज आला. ) इथून पुढे —–
तसं नाईलाजास्तव किरण पुढे झाला. ‘उघडू का नको, उघडू का नको’ करत दाराची कडी काढली अन् हळूहळू दरवाजा उघडला.
तसं समोर हातात काठी, अन् गंभीर चेहरा करून पाटील सर उभे…!!!
सरांना अशा अवतारात समोर पाहिलं आणि अंधारात चाचपडत चालत असताना अचानक आलेल्या लाईटच्या प्रखर उजेडाने डोळे दिपून जावेत, अन् पुढचं काही दिसायचंच बंद व्हावं, अशी माझी अवस्था झालेली.
महाभारतातील संजय हा आपल्या दिव्य दृष्टीने कुरूक्षेत्रावर घडत असलेल्या युद्धाचा ‘आँखो देखा हाल’ जसं आंधळ्या धृतराष्ट्रला सांगत होता, अगदी तसंच काहीसं त्यावेळी झालं असावं व वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहामध्ये आम्ही क्रिकेट खेळतोय, हे त्यांना समजलं असावं.
त्यांच्या हातातली काठी बघून काळजात धस्स् झालं. त्यांचा आम्ही सर्वच जण आदर करत होतो. त्यामुळे त्यांच्या नजरेला नजर द्यायचे आमच्यापैकी कुणाचेच धाडस होत नव्हते.
पाटील सर आत आले. त्यांनी आतून दरवाजा लाऊन घेतला आणि कडी लाऊन घेतली. आता मात्र ते एकेकाला फोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत. भितीने हृदयाचे ठोके वाढायला लागलेले. माराची भिती होतीच, पण आम्ही त्यांच्या नजरेत गुणी विद्यार्थी होतो. त्यांनी आमच्यावर गुणवंतपणाची पांघरलेली झालर त्यांच्याकडूनच अशी उतरवली जाणार. याची मनाला बोचणी लागलेली. मनात नुस्ती कालवाकालव सुरू झालेली.
पाटील सर काही बोलायच्या आत किरण आतून घाबरून गेलेला, तरीही तोंडावर उसने हसु आणत बोलला, ” सॉरी सर, चुक झाली. पुन्हा असे नाही करणार. एवढ्या वेळी माफ करा.” त्याच्या सुरात सूर मिसळून आम्हीही तोंडावर उसने हसु आणत “सॉरी सर, सॉरी सर” म्हणू लागलो.
“हॉलमध्ये क्रिकेट खेळत होतात, तेही तुम्हाला अभ्यास करत बसायला सांगितलेल्या वेळेत.. अभ्यासाचे कुणालाच गांभीर्य नाही. ही तुम्हा सर्वांना चुक मान्य आहे. चुक केली आहे तर शिक्षा ही मिळायलाच पाहिजे.” एकेकाकडे पाहत, “काय संदिप? निलेश? महेश? उद्धव?…? सुभाष? (इतर वेळी प्रेमाने, गंमतशीरपणे ‘सुभाषलाला’ या नावाने संबोधणारे पाटील सर, आज यावेळी फक्त ‘सुभाष’ या एकेरी नावानेच बोलत होते. फक्त या एकेरी नामोल्लेखानेच मीच माझ्या नजरेत अक्षरशः संपून गेलो. पाण्यात ढेकळ विरघळावा तसा विरघळून गेलो.) काय किरण बरोबर ना? “
आम्ही सगळे अपराधीपणाच्या भावनेने माना खाली घालून निशब्दपणे उभे.
“घे. हात पुढे घे.”, असे म्हणत त्यांनी छडी मारायला वर उचलली.
सर्वांत पुढे किरण होता, त्यामुळे सहाजिकच त्याने घाबरत घाबरत हात समोर केला. छडी जोरात उगारलेली बघून त्याने खसकन हात मागे घेतला. पुन्हा एकदा घाबरत घाबरत हळूहळू हात पुढे केला आणि डोळे गच्च मिटून घेतले.
तो क्षण, ती अवस्था बघून आम्हीही फुलांच्या पाकळ्या चुरगळतात तशी बोटं तळ हातावर चुरगाळत, हातावर फुंकर मारत छडीचा मार घ्यायला सज्ज होत होतो. पण घडले वेगळेच.
अनपेक्षितपणे पाटील सर यांनी छडी मारताना हात मागे घेवू नये, यासाठी किरणच्या हाताची बोटे पकडून धरण्यासाठी स्वतःचा हात पुढे केल्यासारखे करून. किरणच्या हाताच्या वरच्या बाजूला हात केला व स्वतःच्याच तळ हातावर जोर जोराने छडी मारायला सुरुवात केली.
आम्हाला समोर काय घडतंय हे कळायच्या आत सलग तीन चार छड्या मारून झाल्या होत्या. हाताला झिणझिण्या आल्याने त्यांनी हात खाली घेत दोन वेळ झिंजडला आणि पुन्हा हात वर घेऊन पुन्हा हातावर छडीचा मार घ्यायला सुरुवात केली.
समोर उभा असलेल्या किरणचे खाडकन डोळे उघडले. किरण आणि अजून दोघा तिघांनी छडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हात धुडकावून लावत पुन्हा जोरजोराने हातावर छडीचा मार देऊ लागले.
आमच्यातल्या एक-दोघांनी पुढे होऊन त्यांचा छडी लागलेला हात पकडला आणि भिजल्या डोळ्यांनी म्हणालो, ” सॉरी सर, सॉरी सर आमची चूक झाली, तुम्हाला असा त्रास करून घेऊ नका? आम्हाला शिक्षा करा.”
“शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, तुम्हाला नव्हे, तर मला. तुम्ही तुमच्या बाजूने बरोबर असाल. तुमचं काहीच चुकलं नाही, माझीच चुक झाली. मीच माझ्या बाजूने तुम्हाला समजावण्यात कमी पडलोय. आम्ही तुम्हाला संस्कार द्यायला कमी पडलोय, त्यामुळे मला शिक्षा व्हायलाच पाहिजे.”
सरांची अशी भावनिक साद ऐकून काळजाला चिमटा बसला. मनात कालवाकालव झाली. कंठ दाटून आला. क्षणात आमच्या सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले.
“सर दोन छड्यांच्या जागी चार मारा. आठ मारा. वाट्टेल तितके मारा. आम्हाला वाट्टेल ती शिक्षा करा, पण सर… आमच्यामुळे तुम्हाला असा त्रास करून घेऊ नकोसा. आम्ही आजपासून अजिबात क्रिकेट खेळणार नाही. फक्त अभ्यासच करणार. आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे कधी आम्ही वागणार नाही.”, असे म्हणत आम्ही सर्वांनी सरांना हात जोडले आणि काळवंडलेल्या मनाने विनवण्या करत, ‘सॉरी सर, सॉरी सर’, म्हणू लागलो.
सरांनी ज्या हातावर छडीचा मार घेतला होता, त्या गोऱ्या हातावर काही क्षणातच छडीच्या माराने लाल निळसर रंगाचा जाड वळ उमटलेला. त्यावेळची ती दाहकता मनाला अजूनही सुन्न करणारी आहे.
आई आपल्या मुलाला शिक्षा करते व नंतर प्रेमाने आपल्या पोटाशी कवटाळून धरते. काहीसे असेच भाव त्यावेळी सरांच्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून मला वाटले.
त्या दिवशी त्यांनी छडीचा त्यांच्या हातावर नव्हे, तर आमच्या भरकटणाऱ्या मनावर वार केला. विद्यार्थी भावनिकदृष्ट्या शिक्षकांशी जोडले गेलेले असतात, पण शिक्षक सुद्धा तितक्याच भावनिकतेने विद्यार्थ्यांशी जोडलेले असतात, हे त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.
आदरणीय एस. बी. पाटील सर यांच्या सोबतच्या अशा अनेक आठवणी आहेत, की ज्यामुळे त्यांना संस्कार मुर्ती, उंबराचे फुल (अतिशय दुर्मिळ व्यक्ती) म्हणावंसं वाटतं. ते माझ्यासह प्रत्येकाला माझेच वाटतात.
ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण होऊन आज पंधरा-सोळा वर्षे झालीत, तरीही तेथे मिळालेल्या पुस्तकी शिक्षणाचा उपयोग पैशाच्या जगात किती होतोय, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, पण बिघडण्याच्या काळात आम्हाला घडवण्याचं काम मात्र पाटील सर आणि तेथील सर्व शिक्षकांनी केले; हे ठामपणे सांगता येईल.
आदरणीय रहमान एम. शिकलगार सर (physics), संजय बी. पाटील सर (Chemistry), शबनम मनेर मॅडम (English), अंजली शिंदे मॅडम( Biology), सुवर्णा पाटील मॅडम (Math’s), विजय सातपुते सर (मराठी), यांनी शिक्षणासोबतच शहाणपणाची, संस्कारांची जी भक्कम शिदोरी दिली आहे. ती अजून भरून उरली आहे, असं मला वाटतं.
— समाप्त —
लेखक : श्री सुभाष मंडले.
(९९२३१२४२५१)
संग्राहक : श्री मेघशाम सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈