सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ बिन आडनावाची पोर – भाग – 2 … श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(ती भुताळी आहे असे ठरवले.. व अगदी दूर जंगलात हाकलून दिले….) इथून पुढे —-
शांता काहीशी मनोरुग्ण होती. मात्र ठार वेडी नव्हती.. तिने त्या घनदाट जंगलात.. एक तोडकी- मोडकी झोपडी बनवली.. ती जंगलातील फळे व इतर काही बाही खाई..पण त्यामुळे तीच पोट कसं भरणार… तिला भूक असह्य होई..म्हणून तिने रात्री स्मशानात जाऊन टोप ,ताट, ग्लास आणले. सुरुवातीला तिला भीती वाटली… पण पोटातील भुकेने तिच्याकडून हे सर्व करवले…. त्यातच ती कंदमुळे शिजवून खाई..आग पेटवायला ती कधी कधी स्मशानातील जळकं लाकूड घेऊन येई.. आता तर स्मशान म्हणजे तिचं दुसरे घर झालं होत.. कारण तिथे तिला मयतावर टाकलेले पैसे, वस्तू, तर कधी कपडे मिळत होते.. त्यामुळे मयत पेटवले त्या रात्री ती हमखास फेरी मारी… गावकऱ्यांनी तिला कितीतरी वेळा स्मशानात पाहिले होते. त्यामुळे आता तर शिक्कामोर्तब झाले की, शांता भूताळी आहे..
शांता झोपडीत राही. तिच्या गरजा मर्यादित होत्या.. तिच्याकडे पैसे देखील असायचे. त्यामुळे ती बाजूच्या दुसऱ्या गावातून धान्य व इतर गरजेच्या वस्तू घेऊन यायची.. आता तर तिने पैसे जमवून बाजूच्या गावातून एक गाभण बकरी आणली होती.. जंगल भरपूर, त्यामुळे तिला चाऱ्याची अडचण नव्हती… असं करता करता आज तिच्याजवळ पाच बकऱ्या होत्या. त्यांना होणारे बोकड ती बाजूच्या गावातील खाटकाला विकत असे. तिच्या गावातील लोक तिला भूताळी समजायचे, त्यामुळे तिच्या झोपडीच्या आसपास कोणी फिरकत नसे. आणि म्हणून तिच्या बकऱ्या सुरक्षित होत्या…. शांता.. आता बरीच म्हातारी झाली होती.. आज तिला पैशांच्या लोभाने का होईना पण जिवंत बाळ मिळालं होतं ..आणि शांता त्याला काटयावरून उचलून घरी घेऊन आली …. तिची सुप्त ममता आता जागृत झाली होती. तिने त्या बाळाला सांभाळण्याचे ठरवले…..
त्या नवजात मुलीला सांभाळतांना तिचा वेळ कसा जात असे हे शांताला समजत नसे.. तिच्या मायेमुळे आता तिच्या मनात इतर विचार येत नव्हते, आणि त्यामुळे तिची मानसिक स्थिती सुधारली.. तिची स्वतःशीच बडबड करण्याची सवयही बंद झाली. शांता आता बऱ्यापैकी सामान्य झाली…
दिवस जात होते… शांताची मुलगी म्हणजे तिने काटयावरून आणलेली ..आता बरीच मोठी झाली होती.. शांता समाजाच्या भीतीने तिला जंगलाच्या बाहेर कधीच नेत नसे.. बाजूच्या गावात कधी धान्य किंवा इतर वस्तु आणायला ती एकटीच जाई…ती मुलगी शांताला माय म्हणून हाक मारी.. मात्र शांताने अजून तिचं नाव देखिल ठेवले नव्हते.. पोरी म्हणूनच ती तिला हाक मारत असे…शांता पोरीवर फार फार माया करत असे.. आपल्यानंतर या पोरीचं कसं होणार याचा ती नेहमीच विचार करी.. पोरीचं वय जसं वाढत होतं तसं तिचं शारीरिक व्यंग देखिल कमी होत गेलं …. लहानपणी अंगाच्या तुलनेने मोठं दिसणारं डोकं लहान झालं होतं … डोळे जरा मोठेच आणि काळा रंग कायम होता… बाकी सगळे सामान्य झाले होते. पोरगी लहानपणी जितकी विद्रुप दिसायची तितकी आता दिसत नव्हती… आता ती साधारण पाच -सहा वर्षाची झाली होती……..
— मस्टरवर शाळेतील पहिल्या दिवशीची सही करुन मोहन मुख्याध्यापकांना भेटला. “ या! या!! माळी सर आपले स्वागत आहे.बसा! “ मुख्याध्यापक म्हणाले.
मोहन माळी आत्ताच डी. एड. करुन जि. प. शाळेत नोकरीला लागला होता. मोहन हुशार, मेहनती व विज्ञानवादी होता. तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सदस्य होता… आत्तापर्यत त्याने समितीच्या अनेक कार्यक्रमात भाग घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले होते.. आज त्याचा शाळेचा पहिला दिवस होता.. नोकरीची पहिली सही करुन तो मुख्याध्यापकसरांच्या समोर बसला होता..
“ माळी सर !.. आपली ही शाळा आणि गावातील लोकांबाबत थोड सांगतो.. या गावातील लोक फार डांबरट आहेत. कोणाचे काही ऐकत नाहीत .. आपल्या शाळेची ‘ गाव शिक्षण समिती ‘ तर विचारूच नका.. त्यामुळे, आपण आपले काम भले आणि आपण भले….असे रहायचे. महिन्याचा पगार मिळाला की झालं ..बाकी दुनिया गेली तेल लावत…या तत्वावर काम करा. समजले?” मुख्याध्यापक म्हणाले. ‘ हो सर! ‘ म्हणत मोहनने मान हलवली .
क्रमशः…
लेखक : चंद्रकांत घाटाळ
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२