सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ बिन आडनावाची पोर – भाग – 3 … श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(महिन्याचा पगार मिळाला की झालं ..बाकी दुनिया गेली तेल लावत…या तत्वावर काम करा. समजले? मुख्याध्यापक म्हणाले. हो सर! मोहनने मान हलवली .) इथून पुढे —-

दोन तीन महिने मोहनने गावातील लोकांचा अभ्यास केला. मुख्याध्यापक सरांनी सांगितल्याप्रमाणे येथील लोकं खरंच डांबरट तर होतीच, त्याचबरोबर कमालीची अंधश्रध्दाळू होती… चांगल्या गोष्टीला देखील नाहक विरोध करायची..

राईट टू एजूकेशन कायद्याखाली सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेचे काम मोहनकडे आले..त्याने संपूर्ण गाव फिरून जी जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांची सर्वांची नावे नोंदवली व त्या सर्वं मुलांना शाळेत आणले.. यासाठी मोहनने काय काय कसरत केली ती त्यालाच माहिती होती.. कुणी गुरे चरायला जात होते, कोणी पक्षी मारायला, कोणी विटा पाडायला, कोणी मुलं सांभाळायला, तर कोणाला पालकच पाठवत नव्हते ..कोणाच काय ?तर कोणाच काय?….तरी हे सगळं दिव्य पार करुन त्याने सर्वच मुलांना शाळेत आणले..

मोहनला मिळालेल्या माहितीनुसार जंगलात एक घर आहे. तेथे एक शाळाबाह्य मुलगी आहे..मोहनने अधिक चौकशी केली तेव्हा ती भूताळीची मुलगी असल्याचे समजले.. व तेथे न जाण्याचा सल्लाही त्याला मिळाला.. मोहन आधीच विज्ञानवादी असल्याने त्याचे त्या मुलीविषयीचे  कुतूहल जागरुक झाले व उद्याच जंगलातील त्या झोपडीत जाण्याचा निर्णय त्याने घेतला..

पोर.. माय! माय!! करत धावत येवून  शांताला जाऊन बिलगली.. ती भीतीने थरथर कापत होती.. ‘ काय झाल ग पोरी?’ शांताने तिला विचारले… तेव्हा पोरीने झोपडीच्या आवाराकडे बोट दाखवले… शांताने त्या दिशेला पाहिले तर तिला सुद्धा धक्काच बसला….त्या आवारात चक्क एक माणूस उभा होता. किती किती वर्ष झाली होती…  झोपडीच्या आसपास कोणी माणूस फिरकला नव्हता आणि आज चक्क आवारात… शांताचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.. पोर तर दुसरा एखादा प्राणी पाहिल्यासारखे भ्याली होती.

“ कोणी आहे का घरात?..” मोहनने विचारले… तसं त्याला पाहून आतमध्ये पळताना त्याने त्या मुलीला पाहिलं होतं – पण एक शिष्टाचार म्हणून त्याने विचारले… तशी शांता बाहेर निघाली आणि तिला बिलगून ती पोरही…

“ नमस्कार आजी!..मी मोहन माळी. आपल्या गावातल्या शाळेचा शिक्षक!” ..”आपल्या गावातल्या?” शांताने काहीशा रागात विचारले.. ‘ हो! आपल्या म्हणजे तुमच्या गावातल्या..’  मोहन म्हणाला.. “ हे पहा गुरुजी! ज्या गावाने मला भूताळी ठरवून वाळीत टाकले त्या गावाशी माझा काही संबध नाही- समजल?”… “ठीक आहे आजी! पण तुमच्या मुलीचा तर विचार करा. ती चांगली शिकली तर तिचं भविष्य उज्वल होईल.” मोहनने समजावले… तशी शांता नरमली.. कारण तिला देखिल पोरीच्या भविष्याची फार चिंता सतावत होती.. शांताने मोहनला आत बोलावले.. म्हातारी आणि त्या पोरीनंतर त्या झोपडीत आत जाणारा मोहन पहिलाच माणूस होता… मोहन आत जाऊन पाहतो तर काय?.. त्या लहानश्या झोपडीत कमालीची स्वच्छता होती.. घरात मोजक्याच वस्तू होत्या पण व्यवस्थित जागेवर लावल्या होत्या..  बाजू ला  बकऱ्यांचा गोठा होता.. त्यात एकदोन पिल्ले  म्या.. म्या.. करत होती..म्हातारीने चहा केला त्यात बकरीचे दूध टाकले.. मोहनने चहाचा पहिला घोट घेतला. त्याला आश्चर्य वाटले.चहा मस्त मसालेदार होता… “आजी चहाची चव फार मस्त आहे!..” .” भूताळीचा आहे ना म्हणून!..” ती उपरोधिक स्वरात म्हणाली.. आजीच्या प्रत्येक वाक्यात समाजावर रोष दिसत होता…

“  गुरुजी माझ्या पोरीला शाळेत घेतील का? नाहीतर तिलाही भूताळीची मुलगी म्हणून हाकलून लावतील.”… 

“ आजी! काळ बदलला आहे.. आणि आता तर  सरकारने कायदाच केला आहे की, प्रत्येक मुलाने शिकले पाहिजे..आणि फारच अडचण आली तर मी आहे ना आजी!.. बोला!… मुलीचे नाव काय?..” 

यावर काहीवेळ आजी शांतच राहून म्हणाली.. “ गुरुजी मी या मुलीचे काहीच नाव ठेवलेले नाही… खरं तर याची मला कधी गरजच वाटली नाही.. मी तिला पोरी अशीच हाक मारते!..”……. “असं  कसं आजी?.. काहीतरी नाव तर लिहावंच लागेल?… तुम्ही तिला पोरी म्हणून हाक मारता मग पार्वती लिहू?..”. म्हातारीने मान हलवली…” वडलांचे नाव?”.. पुन्हा आजी शांतच… “आजी वडलांचे नाव?.”. या प्रश्नावर आजी दचकली….तिने मुद्दाम पोरीला बकऱ्या पहायला बाहेर पाठवले… “ काय सांगू गुरुजी.?. “..असं म्हणत तिने त्या मुलीची जन्मकहाणी मोहनला थोडक्यात सांगितली …एखाद्याच्या घरी जर राक्षस जन्माला आला तर.. थोड्याच दिवसांनी तो मोठा होतो आणि घरातील लोकांना व गावातील लोकांना खाऊन टाकतो.. म्हणून त्याला काटयावर टाकून ताणत नेऊन दूर जंगलात नेऊन टाकतात.. ते राक्षसबाळ जोपर्यंत रडत असतं  तोपर्यंत लोक तेथे थांबतात.. रडणं थांबलं की, ‘ काम झालं!’.. असा शब्द बोलून एक नारळ फोडतात.. व निघून येतात…हे सर्वच ऐकून मोहन शॉक झाला…”आजी! हे राक्षस वगैरे असं काहीच नसतं .. स्त्रीच्या गर्भात काही दोष झाला तर विचित्र दिसणारी मुलं जन्माला येतात.त्यात विशेष असे काही नाही! जगात आतापर्यत अशी कितीतरी मुलं जन्माला आली असतील.. पण त्यात कधी ते मूल राक्षस झालं ..आणि त्यांनी माणसं  खाल्ली .. अशी कधी बातमी ऐकिवात नाही आजी!…”  “ हो!…हे मला चांगलंच ठाऊक  आहे गुरुजी !..पण हे गावातल्या लोकांना समजावणार कोण?..कारण तसं असतं  तर पोरीने मला कधीच खाऊन टाकले असते !… आणि आता तुम्हांलाही !”…अस सांगून आजी हसली… आजीचे हे सगळे बोलणे ऐकून मोहनच्या मनात आजी- विषयी  प्रचंड आदर निर्माण झाला …

क्रमशः…

लेखक : चंद्रकांत घाटाळ

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments