सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ बिन आडनावाची पोर – भाग – 4 … श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(आजीचे हे सगळे बोलणे ऐकून मोहनच्या मनात आजीविषयी  प्रचंड आदर निर्माण झाला …) इथून पुढे —

“ ठीक आहे आजी ! तुम्ही तुमचं नाव लावू शकता…. बरं आडनाव?”… पुन्हा शांतता.. “आडनाव कोणाचे लावणार गुरुजी?… तिच्या बापाचा तर मला पत्ता नाही.. कारण मी गावात कधी जात नाही.. त्या दिवशी कोणाच्या घरी तिचा जन्म झाला हे माहिती नाही.”…. मोहनने मोठा सुस्कारा सोडला.. “आजी मग तुमचं आडनाव लिहा “…. 

“ माझं आडनाव?.. काय आहे माझं आडनाव?… मला तर नवऱ्याने सोडली… आणि.. माझ्या सख्या आई -वडिलांनी सख्या भावा- बहिणींनी भूताळी म्हणून आसरा दिला नाही… मग माझे आडनाव तरी काय?…” आजीचं  ते सगळं बोलणं मोहनचे काळीज चिरून टाकत होते…. अंधश्रध्देने हा समाज किती खालच्या पातळीला गेला आहे याची त्याला जाणीव झाली ..काहीवेळ तो निशब्द झाला….    “ ठीक आहे आजी ! मी तिचं नाव पार्वती शांता.. असेच टाकतो आणि आडनावाचा रकाना तसाच ठेवतो…पार्वतीला स्पेशल केस म्हणून मी शाळेत दाखल करतो.”

मोहनने रजिस्टरवर ‘पार्वती शांता’ इतकंच नाव लिहून आडनावाचा रकाना रिकामाच ठेवला…

एव्हाना ही बातमी गावात आगीसारखी पसरली की ,नवीन गुरुजी त्या भुताळीच्या मुलीचे शाळेत नाव दाखल करण्यासाठी गेला आहे..

“ माळी सर !.. मी तुम्हाला सांगितले होते.. थोडे नियमात काम करत जा !.. आता त्या भूताळीच्या  मुलीच्या प्रकरणावरून ग्रामशिक्षण समितीने तातडीची मीटिंग लावायला सांगितलीय मला..आता तुम्हीच काय ती उत्तरे द्या! “ मुख्याध्यापक रागा – रागात बोलत होते….

मीटिंग सुरू झाली.  सगळे सदस्य चिडलेले होते…” गुरुजी काय गरज होती त्या भूताळी मुलीचे नाव नोंदवण्याची?..ती मुलगी कोण? तिने कुठून आणली?…याची काहीच कल्पना नाही.आणि तिचे नाव तुम्ही नोंदवले? “ अध्यक्षांनी विचारले….त्या म्हातारीकडे ती मुलगी कुठून आली याची गावात कुणालाच खबर नव्हती…ती फक्त त्या आजीला आणि आता मोहनला माहिती होती.मात्र याविषयी त्याने कोणालाच काही सांगितले नाही… कारण पार्वती काटयावरचं राक्षस बाळ आहे असे समजले तर  या प्रकरणाला वेगळे वळण लागले असते.. व पार्वतीचा शाळा प्रवेशाचा मार्ग अजून खडतर झाला असता…. “ साहेब!.. कायद्यानुसार सगळ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे !”. “ आम्हाला कायद्याची भाषा शिकवू नका गुरुजी!.. तुम्ही नवीन आहात.. गावातील कायदे कानून तुम्हाला माहिती नाहीत !…तुम्ही त्या मुलीचे नाव रद्द करा बस !”.. अध्यक्ष रागात म्हणाले..

“ तिचं नाव रद्द होणार नाही !.. तिलाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे !.. बाकी आपली मर्जी.”. मोहनने ठासून सांगितले..

प्रकरण तालुका- जिल्हा पातळीपर्यंत गेले.. मोहनने आपली सगळी शक्ती पणाला लावली. त्याच्या जोडीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती होतीच.. शेवटी.. कायद्याचा बडगा उगारला.. शिक्षण समिती आणि विरोध करणाऱ्या सगळ्यांवर कायदेशीर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले गेले … तेव्हा कुठे पार्वतीला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला……

पार्वतीचा शाळेचा पहिला दिवस.. मोहन तिला स्वतः घरून घेऊन आला..कारण म्हातारीला गावात प्रवेश बंदी होती.. तसंही ती आलीच नसती. कारण गावातील लोकांवर तिचा प्रचंड राग होता …पार्वतीने शाळेच्या गेटमधनं मोहनसोबत आत प्रवेश केला.. त्या काळ्याकुट्ट आणि काहीसे मोठे डोळे असणाऱ्या पर्वतीला पाहून कोणी हसले, तर कोणी घाबरले.. तिला पहिलीच्या वर्गात बसवले… बाजूची मुलं तिला घाबरली…त्यामुळे काहीशी दूर सरकली..

एक दोन महिने तर पार्वतीला सगळं निरीक्षण करण्यात व समजून घेण्यात गेले.. कारण तिच्यासाठी सर्वच नवीन होते…. नंतर ती एक एक शब्द बोलू लागली.. वर्गातील मुलांचीही आता तिच्याविषयी वाटणारी भीती कमी झाली होती…

मोहन तिच्या प्रगतीवर नजर ठेऊन होता. त्या मानाने तिने सर्व लवकर आत्मसात केले …ती फारच कमी बोलायची.. ..मात्र अभ्यासात तिने चांगली प्रगती केली.. दिवस चालले होते. पार्वती आता चवथीच्या वर्गांत गेली. अंतर्मुख असली तरी अभ्यासामध्ये फार चांगली होती. गणित विषयात तर नेहमी तिला पैकीच्या पैकी मार्क मिळत.. पार्वती चवथी अतिशय चांगल्या मार्कांनी पास झाली.. आता मोहनने तिला आजीची परवानगी घेऊन एका दूरवरच्या आश्रमशाळेत प्रवेश घेऊन दिला ..जेणेकरून तिची राहण्याची आणि जेवणाची सोय होईल…आश्रमशाळेत तिचा प्रवेश चवथीच्या दाखल्यावर झाला. त्यामुळे तेथेदेखील तिचे आडनाव नव्हते…

मोहनने पार्वतीच्या शिक्षणाची योग्य ती व्यवस्था केल्यामुळे शांताची देखील बरीचशी काळजी मिटली.. मोहनची बदली एका दुसऱ्या शाळेवर झाली…त्यामुळे आता  त्याचा पार्वतीशी संपर्क तुटला… 

क्रमशः…

लेखक : चंद्रकांत घाटाळ

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments